Wednesday, December 6, 2023

चेष्टा करताय व्हय! एका एपिसोडसाठी ‘एवढे’ लाख कोण घेतं का? वाचा सीआयडी कलाकार किती रुपये छापायचे

तब्बल २० वर्षे छोटा पडदा गाजवणं म्हणजे खायची गोष्ट नाही. कोणत्याही टीव्ही शोसाठी एवढी वर्षे प्रेक्षकांना खिळवून ठेवणे म्हणजे कमालच. ही खास कामगिरी केली होती ‘सीआयडी’ या शोने. २१ जानेवारी, १९९८ रोजी या शोचा पहिला एपिसोड रिलीझ झाला होता. त्यानंतर शोचा शेवटचा एपिसोड २७ सप्टेंबर, २०१८ रोजी रिलीझ झाला. तब्बल २० वर्षे चाललेल्या या शोने आपले १५४७ एपिसोड्स पूर्ण केले. आणि प्रेक्षकांचा निरोप घेतला. इतका मोठा काळ गाजवलाय म्हणजे या शोची कास्टही तितकीच तगडी असणार, आणि तगडी स्टारकास्ट म्हणजे त्यांचे एका एपिसोडसाठी मानधनही तितकेच तगडे. आता तुम्ही म्हणाल, त्यांचे मानधन होते तरी किती?? गुरुवारी (दि. २१ जुलै) याच मालिकेत काम करणारा अभिजीत म्हणजेच आदित्य श्रीवास्तव त्याचा ५४ वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया सीआयडी कलाकार एका एपिसोडसाठी किती रुपये मानधन घ्यायचे.

शिवाजी साटम
सीआयडीत एसीपी प्रद्युम्न हे मुख्य पात्र साकारणारे अभिनेते म्हणजे शिवाजी साटम. शिवाजी यांनी मराठी तसेच हिंदी सिनेमातही काम केलंय… त्यांच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्यात ‘नायक’, ‘दे धक्का’, ‘सूर्यवंशम’, ‘वास्तव’ यांसारख्या अनेक सिनेमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवलाय. वयाची सत्तरी ओलांडलेले शिवाजी साटम सीआयडी या शोच्या एका एपिसोडसाठी जवळपास १ लाख रुपये मानधन घ्यायचे. ‘सीआयडी’तील त्यांचे ‘कुछ तो गडबड है दया’, ‘दया पता करो’ यांसारखे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडात आहेत.

दयानंद शेट्टी
‘दया दरवाजा तोड दो…’ असं म्हणताच कोणताही दरवाजा असूद्या तो दरवाजा एका फायटीत तोडणाऱ्या दयानंद शेट्टीला सीआयडीमुळे एक वेगळीच ओळख मिळाली. हे तर सोडाच सुपरस्टार अजय देवगणच्या ‘दिलजले’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ या सिनेमातही त्यानं काम केलंय. सिंघम रिटर्न्समध्ये जेव्हा दरवाजा तोडायचा असतो, तेव्हा अजय जोरात म्हणतो… ‘दया दरवाजा तोड’. मग काय धिप्पाड शरीरयष्टी असणारा दया एकाच किकमध्ये दरवाजाचे दोन भाग करतो. शोमध्ये दया जसा तगडा अभिनय करायचा. तसेच तगडे मानधनही घ्यायचा. त्याला सीआयडी शोमध्ये एका एपिसोडसाठी ८५ हजार रुपये मिळायचे.

आदित्य श्रीवास्तव
‘सत्या’, ‘सुपर ३०’, ‘दिल से’ यांसारख्या सिनेमात झळकलेल्या आदित्य श्रीवास्तवने ‘सीआयडी’ शोमध्ये अभिजीत हे पात्र साकारलं होतं. या पात्रामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तो जेव्हा टीव्हीत गुन्हेगारांना पळवून पळवून मारायचा… ते पाहून प्रेक्षकांना तो भलताच आवडायचा. असा हा आदित्य श्रीवास्तव सीआयडी शोमध्ये एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये मोजायचा.

दिनेश फडणीस
‘सीआयडी’मध्ये कॉमेडी पात्रासाठी ओळखला जाणारा फ्रेड्रिक्स म्हणजेच दिनेश फडणीस आजही सर्वांच्या ध्यानात आहे. तो जरी साईड रोल साकारत असला, तरी त्यानेही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कसलीही कसर सोडली नव्हती. त्याने टीव्ही शोव्यतिरिक्त ‘सरफरोश’, ‘सुपर ३०’ यांसारख्या सिनेमातही काम केलं होतं. विशेष म्हणजे, तो सीआयडीमध्ये एका कलाकाराव्यतिरिक्त काही एपिसोड्सचा रायटरही होता. त्याला या शोमध्ये एका एपिसोडसाठी ७० हजार रुपये मानधन मिळायचं.

नरेंद्र गुप्ता
‘सीआयडी’ शोमध्ये डॉक्टर साळुंखे हे पात्र साकारणारे नरेंद्र गुप्ता आपल्या भूमिकेसाठी आजही ओळखले जातात. शोमध्ये ते नेहमीच आपल्या फॉरेन्सिक लॅबमध्येच गोष्टींचा तपास करताना दिसायचे. ‘सीआयडी’व्यतिरिक्त ते ‘उडान’, ‘तू चोर मैं सिपाई’ या हिट सिनेमातही दिसले आहेत. त्यांना या शोमध्ये एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये मिळायचे.

श्रद्धा मुसळे
‘सीआयडी’त इन्स्पेक्टर तारिका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव आहे श्रद्धा मुसळे. ती एक मॉडेल तसेच टीव्ही अभिनेत्री आहे. तुम्ही सर्वांनी श्रद्धाला ‘खिडकी’, ‘क्या दिल में है’, ‘कहानी घर घर की’, ‘मिली जब हम तुम’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये पाहिले असेल. यासोबतच ती ‘ऑल द बेस्ट’, ‘मेड इन चायना’ या बॉलिवूड सिनेमातही दिसली आहे. श्रद्धाला या शोमध्ये ४० हजार रुपये मानधन मिळायचं.

मंडळी हे आहेत सीआयडीतील काही कलाकार, जे आपल्या तगड्या अभिनयासारखेच, एका एपिसोडसाठी तितकेच तगडे मानधनही घ्यायचे. जाता जाता ‘सीआयडी’ या शोविषयी रंजक माहिती देऊन जाते. ‘सीआयडी’ या शोचा पहिला एपिसोड हा १९९२ साली शूट करण्यात आला होता. मात्र, तो सहा वर्षांनंतर १९९८ साली प्रसारित करण्यात आला. आणखी एक रंजक माहिती म्हणजे, अभिनेत्री यामी गौतम ही बॉलिवूड पदार्पण करण्यापूर्वी सीआयडीमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला सीआयडीच्या ‘अभिजीत’ने मिळवून दिली ओळख

अश्लील म्हटल्याबद्दल जान्हवी कपूरला वाटते चिंता; म्हणाली, ‘अशा प्रश्नांमुळे माझं चारित्र्य…’

ललित मोदींसोबतच्या नात्यावरून ट्रोल झालेल्या सुष्मिता सेनने शेअर केला ‘असा’ फोटो, स्माईलने दिलं उत्तर

हे देखील वाचा