Monday, October 14, 2024
Home मराठी “तुझ्या धडावर असलेलं डोकं वापरून…” शरद पोंक्षेच्या पायलट मुलीसाठी किरण माने यांनी केलेली पोस्ट व्हायरल

“तुझ्या धडावर असलेलं डोकं वापरून…” शरद पोंक्षेच्या पायलट मुलीसाठी किरण माने यांनी केलेली पोस्ट व्हायरल

मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय दिग्गज, हुशार आणि विचारी अभिनेते असलेले शरद पोंक्षे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. नुकतीच त्यांच्यासाठी एक अभिमानाची बाब घडली आहे. शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी ही पायलट झाली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सिद्धीने ही भरारी घेतली. तिच्या या यशावर शरद यांनी एक खास पोस्ट शेअर करत तिच्या या कामगिरीची माहिती सर्वांना दिली. मात्र या पोस्टवरून एक नवीनच वाद उद्भवला आहे. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आरक्षण, सवलत नसताना देखील लेकीने मिळवलेले यश खास असल्याचे सांगितल्यामुळे अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवर अनेक राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया येत असताना आता मनोरंजनविश्वातून देखील यावर प्रतिकिया येण्यास सुरुवात झाली आहे. फटकळ अभिनेते अशी ओळख असलेल्या किरण माने यांनी देखील या पोस्टवर नाराजी दाखवली असून, एक पोस्ट शेअर करत त्यांचे मत व्यक्त केले आहे.

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे.
तुझ्या करीयरनं छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील… मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील… घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणार्‍या हादर्‍याची आत्तापासून तयारी कर… जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल… जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल !
ऑस्ट्रेलियात ब्रिस्वेनमध्ये तुला गांधी भेटेल… ताजीकिस्तानमधल्या ड्युशान्बेमध्येही तुला महात्म्याच्या पुतळ्याचे दर्शन होईल… स्पेनच्या बर्गोस शहरात, चायनाच्या बिजिंगमध्ये, माॅरीशस, सुरीनाम, पोलंड, कोरीया जाशील तिथे गांधी,गांधी आणि गांधीच असेल…. इंग्लंडमध्ये लंडन,वेस्टमिन्स्टर अशा अनेक शहरात तुला गांधीपुतळा दिसेल… अमेरीकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल !
गांधीविचारापुढं नतमस्तक होणारं हे सगळं जग वेडं आहे, की या सुर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील…
…हा विचार करेस्तोवर अचानक तुला दुसरा हादरा बसेल. अमेरीकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल.. लंडनला सर्वांगसुंदर डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर मेमोरीयल दिसेल ! हंगेरीला डाॅ. आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वरहॅम्प्टन बुद्ध विहार पाहून डोळे दिपतील… कॅनडाची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डाॅ. आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधांची माहिती देणारे विशेष विभाग स्थापलेत ते ही पहाशील… लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्येही डाॅ. आंबेडकरांचा पुतळा दिसेल.
या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डाॅ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील ! काहीजण ‘Annihilation of Caste’ वाचत असतील, तर काहीजण ‘The Untouchables: Who were they and why they Became Untouchables’ ची पारायणं करत असतील ! तू आंबेडकरांच्या इंडियामधली आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं होतं… गुलामगिरीत पिचवलं होतं, ते शोषित-पिडीत आता या इनमिन पाऊणशे वर्षांत कुठपर्यन्त पोहोचलेत अशीही चौकशी करतील… त्यांना हे सांगू नकोस की ‘मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत…’ अजिबात सांगू नकोस हे… कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे. आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळं तू त्यांना खोटं हसत बळंबळंच सांग ‘सगळं ठीक आहे आमच्याकडे आता.’
…नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर. वाचन कर. पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त ‘माणूस’ दिसेपर्यन्त विचार करत रहा ! तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करीयर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात,धर्म,वंश,रंग,प्रांत,देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात !! तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे ‘मानवता’. बाकी सब झूठ. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी…
तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ! ”

दरम्यान किरण माने यांची ही पोस्ट सध्या कमालीची गाजत असून, त्यावर लोकांच्या आणि कलाकारांच्या विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. काहींनी त्यांना योग्य म्हटले आहे, तर काहींनी त्यांच्या या पोस्टवर नाराजी दाखवली आहे. मात्र अजून त्यांच्या या पोस्टवर शरद पोंक्षेचे काहीही उत्तर आलेले नाही. त्यामुळे ते या पोस्टवर आता काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा