Friday, March 31, 2023

‘आई माझ्यासाठी सर्वस्व होती..’, किरण माने यांना आईच्या निधनानंतर केला होता राखी सावंतने फोन

राखी सावंतच्या आईचे २८ जानेवारीला निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून राखीची आई आजारी होती. कॅन्सरने ग्रासलेल्या राखीच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र कॅन्सर, ब्रेन ट्युमर, फुप्फुस आणि किडन्या निकामी झाल्यानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. आईच्या निधनामुळे राखी पूर्णपणे कोलमडली असून, तिच्या या कठीण प्रसंगी तिच्यासोबत बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीला कलाकार देखील उभे राहिले आहे. राखी आणि राखीचे आईवरील प्रेम हे संपूर्ण जगाला माहीत होते. अनेक कलाकारांनी तिला स्वतः भेटून सांत्वना व्यक्त केली, काहींनी फोनवर तिच्याशी चर्चा केली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आईबद्दल आठवणी सांगत श्रद्धांजली वाहिली.

यावर्षी मराठी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात राखीने वाईल्ड कार्ड एन्ट्री मारली. या शोमध्ये ती आल्यानंतर शोला चार चांद लागले. शोमध्ये राखी आली आणि तिची अनेक कलाकारांसोबत तिची ओळख झाली. यातलेच एक अभिनेते म्हणजे किरण माने. किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये त्यांनी राखीने आई गेल्यानंतर त्यांना फोन केला आणि दुःख व्यक्त केले. किरण माने यांनी त्यांचे फोनवर झालेले बोलणे आणि राखीबद्दलच्या त्यांच्या भावना एका पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “माने, माझी आई गेली. माझा आधार गेला. मी पोरकी झाले…तुम्हाला माहीत आहे, माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती..मी काय करू आता???” ओक्साबोक्शी रडणार्‍या राखीचे एकेक शब्द माझ्या काळजात कालवाकालव करत होते…जवळचा मित्र म्हणून फोनवरुन सांत्वन करण्याव्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हतो. खूप हताश झाल्यासारखं वाटलं. आपल्या मैत्रीणीवर दु:खाचा पहाड कोसळलाय आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही ही हतबलता मनाला घेरून टाकत होती…

‘बिग बॉस’च्या घरात विकास आणि तेजस्विनीनंतर माझी खर्‍या अर्थानं कुणाशी मैत्री झाली असेल तर ती राखी सावंतशी! जे कारण विक्याशी मैत्री होण्याचं होतं तेच राखीशी…विपरीत परीस्थितीचा पहाड भेदून उगवून येणारे अंकुर मनापासून भावतात…वरळीतल्या अतिशय गरीब घरात लहानाची मोठी झालेली एक मुलगी वडिलांचा प्रचंड विरोध असूनही बॉलिवूडमध्ये यायचं स्वप्न बघते. पण पोरीची जिद्द आई ओळखते. आपला सगळा सपोर्ट मुलीला देते. तिच्यासोबत घराबाहेर पडते आणि तिला सांगते, “लढ तू. मी आहे खंबीर तुझ्यासोबत.”

छोटं-मोठ्ठं कसं का असेना, पण राखीनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. हे करताना ती एक विसरली नाही की आईचा आधार नसता तर आपण इथे नसतो. राखीनं शेवटपर्यंत आईची मनापासून सेवा केली. शेवटच्या कॅन्सरच्या काळात तर आईला तिनं फुलासारखं जपलं.

राखी, तू बिग बॉसमध्ये माझ्याशी अगदी निरपेक्ष, निर्भेळ, नितळ मैत्री केलीस. ती शेवटपर्यंत जपलीस. आपण एकदा गप्पा मारत बसलो होतो. मी तुला एक शेर ऐकवला. “घर में धन, दौलत, हिरे, जवाहरात सब आए…लेकिन जब घर में माँ आयी, तब खुशियां आयी!” तू अचानक रडायला सुरूवात केलीस. आईच्या आठवणीनं व्याकूळ झाली होतीस तू. राखी, सगळ्यात मोठं, वेदनादायी दु:ख कुठलं असेल तर डोक्यावरून आईची सावली दूर होण्याचं. आम्ही किती आणि कसं सांत्वन करणार तुझं??? तुलाच खंबीरपणे यातून बाहेर पडावं लागेल. पण मला एक माहीतीये राखी, आईनंतर तुझ्या सगळ्यात जवळचं कोण असेल तर तो तुझा देव. त्या देवाजवळ गेलीय हे मनात ठेव. तिथे आता ती कायम ‘महफ़ूज़’ आहे! मी पाहिलंय, रोज डोळे मिटून मनापासून प्रार्थना करतेस तू. त्यावेळी आता तुला देवासोबत आईही दिसेल, भेटेल. तू तिच्याशी खूप बोलू शकशील. हसवू शकशील तिला. तुझ्या खुश रहाण्यातच तिचा आनंद आहे, हे लक्षात ठेव. आम्ही जिवलग मित्र आहोतच तुझ्यासोबत. लब्यू राखी.”

राखी आणि किरण माने यांची मैत्री मराठी बिग बॉसच्या घरात झाली. राखीने जरी बिग बॉसचे पर्व जिंकले नसले तरी तिने सर्वांची मने नक्कीच जिंकली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठ रंगकर्मींवर झाडू मारण्याची वेळ, अंशुमनने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप
‘ते कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केले’, म्हणणाऱ्या हेमांगी कवीची शाहरुख खानबद्दलची ‘ती’ पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा