Thursday, July 18, 2024

महाभारतातील ‘कृष्णाचा’ घटस्फोट! १२ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त

कलाविश्वातून एकापाठोपाठ एक घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. सोमवारी (१७ जानेवारी) दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्यापासून विभक्त होत असल्याचे सांगितले. यानंतर आता ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज लग्नाच्या १२ वर्षानंतर पत्नी स्मितापासून वेगळे झाले आहेत.

सप्टेंबर २०१९ मध्ये दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. त्यांची आयएएस अधिकारी असलेली एक्स पत्नी सध्या आपल्या जुळ्या मुलींसोबत इंदोर येथे आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या घटस्फोटाबद्दल सांगताना म्हटले होते की, “घटस्फोट हा कधी-कधी मृत्यूपेक्षाही जास्त त्रासदायक असतो.”

त्यांनी असेही सांगितले की, मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. माध्यमांशी बोलताना अभिनेते म्हणाले की, “मला घटस्फोटाच्या कारणांवर जायचे नाही. मी फक्त एवढं म्हणू शकतो की, कधी-कधी घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही जास्त त्रासदायक असू शकतो. कारण तुम्ही तुटलेल्या हृदयासोबत राहता.”

हेही पाहा- १८ वर्षांचा संसार धनुष- ऐश्वर्याने एका ट्विटर पोस्टने संपवला

“मी दुर्दैवी आहे, पण लग्नसंस्थेवर माझा ठाम विश्वास आहे. लग्न तुटण्याची अनेक कारणे असू शकतात, पण जेव्हा कुटुंब तुटते, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे आपल्या मुलांना कमीत कमी इजा होईल याची खात्री करणे ही पालकांची जबाबदारी आहे,” असेही पुढे लग्नाविषयी बोलताना नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) म्हणाले.

‘महाभारत’ या मालिकेव्यतिरिक्त नितीश भारद्वाज यांना बी. आर. चोप्रा यांच्या ‘विष्णू पुराणा’त भगवान विष्णूच्या भूमिकेसाठीही ओळखले जाते. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमात काम केले आहे. त्यात ‘समांतर’, ‘मोहेंजोदारो’, ‘संगीत’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ यांसारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा