Friday, March 29, 2024

सोनाली कुलकर्णी ऐतिहासिक भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ होणार २०२२ मध्ये प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीतील व्यस्त अभिनेत्रींपैकी एक सोनाली कुलकर्णी आहे. तिला नटरंग चित्रपटातून ‘अप्सरा’ म्हणूनही ओळख मिळाली आहे. त्याचबरोबर ती ऐतिहासिक चित्रपटात काम करण्यातही मागे हटली नाही. ‘हिरकणी’ सारख्या चित्रपटात दमदार भूमिका साकारून तिने चाहत्यांचे मन जिंकण्यात कोणतीच कसर सोडली नाही. आता तिच्या चाहत्यांसाठी ती एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. ‘हिरकणी’ चित्रपटानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा मोठ्या कौशल्याने सांभाळत मुघलांशी दोन हात करणाऱ्या, छत्रपती ताराराणींच्या शौर्याची गाथा सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता ताराराणींच्या शौर्याची गाथा महाराष्ट्राला वेड लावणार आहे. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ असे या चित्रपटाचे नाव असून, मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. भाऊबीजेचे औचित्य साधून सोनाली कुलकर्णीने या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर तिच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या महाराष्ट्राच्या स्वराज्याचे रक्षण अनेक छत्रपतींनी केलेच. मात्र, या स्वराज्याच्या रक्षणात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या ताराराणींच्या कामाचे प्रथमच कौतुक होणार आहे. ताराराणींने जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला आहे.

अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले आहे की, “मराठी चित्रपटांना अधिक दर्जेदार बनवण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मराठी चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जावी, या दृष्टीने आमचा कायम प्रयत्न असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य अबाधित राखण्यात सिंहाचा वाटा असूनही छत्रपती ताराराणींबद्दल लोकांना इतकी माहिती नाही. त्यांचे धाडस आणि शौर्य असामान्य आहे. त्यांची ही वीरगाथा लोकांसमोर आणण्याचा ‘प्लॅनेट मराठी’चा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा इतिहास सातासमुद्रापार संपूर्ण जगाला कळावा, यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे.”

सोनालीने देखील या चित्रपटात तिला मिळालेल्या भूमिकेबद्दल तिचे मत व्यक्त केले होते. त्यात ती या चित्रपटाबद्दल म्हणाली की, “छत्रपती ताराराणींचं प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचं भाग्य लाभणं, म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणी विषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलं नाही, तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानातमक काम असेल, या जबाबदारीची जाणिवही मला आहे. महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं बास हीच प्रार्थना.”

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपट पुढच्या वर्षी २०२२ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव करणार आहेत. तर याचे कथा लेखन आणि संवाद लेखन डॉ. सुधीर निकम यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिवाळीच्या शुभेच्छा देत, सोनाली कुलकर्णीने साजरा केला तिच्या पतीसोबत पहिला ‘दिवाळसण!’

-लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ

-कातिलाना! सोनालीने सादर केला तिचा ‘हॅलोविन’ लूक; चाहते सोडा, सेलिब्रिटीही पडतायत तिच्या प्रेमात!

हे देखील वाचा