Wednesday, December 6, 2023

पहिलेच गाणे हिट झाल्यानंतर आले होते थेट पंतप्रधानांच्या घरून बोलावणे, वाचा मोहम्मद रफींबद्दलचे रंजक किस्से

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गायक आले आणि गेले, पण असे खूप कमी गायक होते, ज्यांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. याच गायकांमध्ये समावेश होतो, ते म्हणजे दिग्गज गायक मोहम्मद रफी होय. रफी यांची गाणी अजरामर आहेत. त्यांची गाणी ऐकल्यावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. रफी यांची शनिवारी (24 डिसेंबर) 97 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास किस्से. चला तर मग सुरुवात करूया…

अमृतसरच्या कोटला सुल्तानपूर येथे 24 डिसेंबर, 1924 रोजी मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांचा जन्म झाला होता. आपल्या गावातील फकीरासोबत ते गीत गुनगुनायचे. हळूहळू हा सूफी फकीर त्यांच्या गाण्याची प्रेरणा बनत गेला आणि मोहम्मद रफीवरून उस्ताद मोहम्मद रफी बनले.

भारतीयांच्या ‘दिलों की धडकन’ म्हटले जाणारे रफी यांचे निक नेम हे ‘फीको’ होते. रफी यांचा मोठा भाऊ सलून चालवायचा. रफी यांचा अभ्यासात काहीच रस नव्हता. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांनी मोठ्या भावासोबत सलूनमध्ये काम शिकण्यासाठी पाठवले होते.

रफी यांच्या मेहुण्याने मोहम्मद हदीदने त्यांच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्यांचा उत्साह वाढवला. हदीदनेच रफी यांची भेट नौशाद अली यांच्याशी करवून दिली होती. त्यानंतर ‘हिंदुस्तान के हम है, हिंदुस्तान हमारा’च्या काही ओळी त्यांना गाण्याची संधी मिळाली.

रफी यांचा पहिला सार्वजनिक परफॉर्मन्स 13 वर्षांच्या वयात झाला होता, जेव्हा त्यांना महान केएल सेहगल यांच्या संगीत कार्यक्रमात गाण्याची परवानगी देण्यात आली होती.

सन 1948 मध्ये रफी यांनी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेल्या ‘सुन सुनो ए दुनिया वाले बापूजी की अमर कहानी’ गायले. हे गाणे हिट झाल्यानंतर त्यांना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या घरी गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

नौशाद यांच्याव्यतिरिक्त रफी यांनी अनेक बड्या संगीतकारांसोबत काम केले होते. त्यांनी एसडी बर्मन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, ओपी नय्यर आणि कल्याणजी- आनंदजी यांच्यासह त्यांच्या काळातील जवळपास सर्व लोकप्रिय संगीतकारांसोबत गाणे गायले होते.

रफी यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार झाले होते. मुसळधार पाऊस असूनही त्याची रेकॉर्डिंग करण्यात आली होती आणि त्याच रेकॉर्डिंगचा काही भाग नंतर प्रदर्शित झालेल्या एका हिंदी चित्रपटात वापरण्यात आला होता. ही मुंबईतील आतापर्यंतची सर्वात मोठी अंत्ययात्रा होती, ज्यामध्ये 10,000 हून अधिक लोक सामील झाले होते.

मोहम्मद रफी यांनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकापेक्षा एक सदाबहार गाणी दिली आहेत. त्यामध्ये ‘बहारों फूल बरसाओ’, ‘झिलमिल सितारों का आँगन होगा’, ‘ये रेशमी झुल्फें’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘लिखे जो खत तुझे’, ‘आने से उसके आए बहार’, ‘आज मौसम बडा बेईमान है’, ‘कौन है जो सपनों में आया’ यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ दोन अभिनेत्यांनी ‘नायक’ला होकार दिला असता, तर अनिल कपूरांचा झाला असता पत्ता कट

‘बेशरम रंग’ गाण्यावर शेवटी हनी भाऊ बोललाच! ‘पूर्वी स्वातंत्र्य होते….

हे देखील वाचा