मित्रांनो, गेल्या काही वर्षांत मराठी इंडस्ट्री मोठे बदल घडल्याचे दिसले आहे. हळूहळू मराठी चित्रपट मोठी प्रगती करताना दिसत आहेत. तसेच अगदी पूर्वीपासूनच मराठीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनत आलेत, पण कमाईच्या बाबतीत कुठेतरी मराठी चित्रपट मागे पडत असल्याचे पूर्वी दिसत होते. मात्र, आता याबाबतीही मराठी इंडस्ट्री पुढे जात असल्याचे दिसले आहे. कमाईच्या बाबतीत अनेक गेल्या काही वर्षांत आलेल्या मराठी चित्रपटांनी अगदी ट्रेंड सेट केल्याचेही दिसले. त्याचमुळे आता अगदी बॉलिवूड, टॉलिवूडलाही मराठीची भूरळ पडल्याचे दिसत आहे. या लेखातून आपण जरा त्या मराठी चित्रपटांवर नजर टाकू ज्यांनी सर्वाधिक कमाई केली आहे.
सैराट
या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे सैराट. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला सैराट चित्रपट कमाईच्या बाबतीतच सैराटच ठरला. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेबरोबरच सर्वाधिक कौतुक झालं ते गाण्यांचं. खऱ्याअर्थानं मराठी इंडस्ट्रीमध्ये हा चित्रपट ट्रेंडसेटर ठरला. या चित्रपटाने जवळपास ११० कोटी रुपये कमावले. त्याचमुळे हा १०० कोटीपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला-वहिला चित्रपट ठरला. अगदी गावरान ठसका असलेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास तर घडवलाच त्याचबरोबर या चित्रपटाचं याड लागलं हे गाणं हॉलिवूडमधील स्टुडिओत रेकॉर्ड झालं. त्यामुळे हॉलिवूडमध्ये गाणं रेकॉर्ड होणाराही हा पहिलाच चित्रपट. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिलेलं. विशेष म्हणजे या चित्रपटाचा हिंदी आणि कन्नड रिमेकही झाला.
पावनखिंड
सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये दुसरा क्रमांक लागतो पावनखिंड चित्रपटाचा. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून पावनखिंडीत दिलेली झुंज या ऐतिहासिक घटनेवर आधारीत असलेला हा चित्रपट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची एकनिष्ठा आणि धैर्य या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. चित्रपटाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी, जबरदस्त अभिनय आणि कथा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटाने अनेक आठवडे चित्रपटगृहात टिकून राहत मोठी कमाई केली. पावनखिंडने ७५ कोटी रुपयांची कमाई केली.
नटसम्राट
कोणी घर देत का घर यांसारखे अनेक डायलॉग ज्या चित्रपटातील फेमस झाले तो म्हणजे नटसम्राट. नाना पाटेकरांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला. २०१६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या वाट्याला मोठे कौतुकही आले, तसेच नाना पाटेकरांनी केलेल्या अभिनयानेही अनेकांच्या टाळ्या मिळवल्या. व्हीव्ही शिरवाडकर यांच्या नाटकावर अधारीत हा चित्रपट होता. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाने ४८ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात नाना पाटेकरांव्यतिरिक्त विक्रम गोखले, मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे यांच्या भूमिकांनीही लक्ष वेधले होते.
कट्यार काळजात घुसली आणि लय भारी
यानंतर क्रमांक लागतो तो कट्यार काळजात घुसली, टाईमपास २ आणि लय भारी या चित्रपटांचा. संगीत चित्रपट असलेला कट्यार काळजात घुसली २०१५ मध्ये रिलीज झालेला, तर टाईमपासही २ हा २०१५ मध्येच रिलीज झालेला. लय भारी २०१४ मध्ये प्रेक्षकांसमोर आलेला. या तिन्ही चित्रपटांनी प्रत्येकी ४० कोटींची कमाई केलेली. कट्यार काळजात घुसली मध्ये सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे असे अनेक दिग्गज कलाकार दिसले होते. संगीतावरच अधारीत या चित्रपटातील गाणीही बरीच गाजली होती. तर टाईमपास २ हा चित्रपट टाईमपासचा सिक्वेल होता. लय भारी चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातील डायलॉगही प्रचंड गाजले.
टाईमपास
साल २०१४ मध्ये रिलीज झालेल्या टाईमपास चित्रपटाचाही या यादीत क्रमांक लागतो. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. यातील वैभव मांगलेने साकारलेली शाकालची भूमिका विशेष गाजली होती. तसेच या चित्रपटातील नया है वह असे डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत. रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाने ३३ कोटी रुपये कमावले होते.
दुनियादारी
तब्बल ३० कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दुनियादारीचाही नंबर लागतो. २०१३ साली रिलीज झालेल्या या चित्रपटात मोठी स्टारकास्ट दिसली होती. स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, उदय टिकेकर, सुशांत शेलार, वर्षा उजगावकर असे अनेक मोठे कलाकार होते. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटाने ३० कोटींची कमाई केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आशा भोसले, सुनील दत्त ते बच्चन कुटुंबीय! भारतीय सिनेसृष्टीने केलेले सगळे वर्ल्डरेकॉर्ड एकाच ठिकाणी
चेष्टा करताय व्हय! एका एपिसोडसाठी ‘एवढे’ लाख कोण घेतं का? वाचा सीआयडी कलाकार किती रुपये छापायचे