नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवरील सुपरहिरो मालिका शक्तिमान आपल्याला आठवतच असेल. तर याच मालिकेतून लहान मुलांच्या मनात शक्तिमान म्हणून वसलेले आणि बी आर चोप्रा यांच्या महाभारतातील भीष्म पितामह म्हणून प्रौढांच्या लक्षात असलेले मुकेश खन्ना सध्या इंडस्ट्रीपासून लांब आहेत.
ते सध्या त्यांच्या युट्युब चॅनल वरून अनेकांवर टीका करत असतात. यामुळे ते अनेकदा तोंडघशी देखील पडले आहेत. परंतु त्यांनी टीका करणं काही सोडलेलं नाही. आता त्यांनी अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
मुकेश खन्ना सोशल मीडियावर उघडपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. नुकतेच ते आपल्या वादग्रस्त विधानांबद्दलही चर्चेत होते. आता त्यांनी पुन्हा एकदा नवीन मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओचे शीर्षक आहे ‘ऊंचे लोगों की नीची पसंद’. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी अजय देवगण आणि शाहरुख खानवर टीका केली आहे. यासह त्यांनी ट्विट करून या व्हिडिओशी संबंधित बर्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
“बोलो ज़ुबान केसरी , ऊँचे लोगों की पसंद , मैं यूँ ही नहीं बन जाता , I AM MAN OF ALL SEASONS”। क्या है ये सब ? लोगों को भ्रमित करने का ख़तरनाक रास्ता ! हानिकारक वस्तुओं का नाटकीय ढंग से दुष्प्रचार !कोई नहीं रोकता इसे।ना खाने वाला,ना प्रचारक, ना ही सरकार। किसके बाप का क्या जाता है। pic.twitter.com/FLryMnCEsB
— Mukesh Khanna (@actmukeshkhanna) December 29, 2020
या व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना यांनी कोणत्याही अभिनेत्याचं नाव घेतलेलं नाही, परंतु चित्रपटसृष्टीतील लोकांना सामूहिक आवाहन केले आहे. मुकेश खन्ना म्हणतात की अशी काही हानिकारक पदार्थ लहान मुलं आणि वृद्ध लोकांच्या आजूबाजूला आली आहेत, जी खाल्ल्याने शरीराला हानी पोहचवते.
मुकेश खन्ना पुढे म्हणतात, ‘अनेक चित्रपटांमध्ये अभिनेते धूम्रपान करताना दाखवले जातात, बर्याच वेळा कलाकार मद्यपान करत असल्याचं दाखवलं जातं. सोबत कोपऱ्यात एका माहितीनुसार धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे हे दर्शवले जाते. आपल्या व्हिडिओमध्ये हे उदाहरण देत मुकेश खन्ना पुढे म्हणाले की ‘ही माहिती लिहून आपली कर्तव्य संपतात काय? चित्रपटांमध्येही या गोष्टी अत्यंत निष्काळजीपणाने दाखविल्या जातात असा त्यांचा आरोप आहे.’
या व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना सरकारला या उत्पादनांना संमती देऊ नयेत ही विनंती देखील करत आहेत. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, ‘एखाद्याने मला सांगितले की या सर्व गोष्टींमधून जितका महसूल मिळतो तितका दुसऱ्या कोणत्याही गोष्टींमधून मिळत नाही. हे ऐकून मी आश्चर्यचकितपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणालो, “सरकारला महसुलाविषयी काय चिंता आहे? सरकारकडे उत्पन्नाचे बरेच स्त्रोत आहेत. देशभरातील लोक कर भरतात. दारू सिगारेटमधून कमविण्याइतपत त्यांच्यावर वेळ आली आहे का?”
मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, कोणीही या वस्तू विकत घेऊ नये म्हणून सरकार या सर्व वस्तूंवर अधिक कर लावतात पण दारू पिणारा याचा विचार करीत नाही. तो कोठूनही पैशांची व्याबस्था करतो आणि दारू सिगारेट खरेदी करतो.
व्हिडिओच्या शेवटी, मुकेश खन्ना म्हणतात, ‘मला याबद्दल आक्षेप आहे. अशा उत्पादनांची जाहिरात करणार्या बड्या अभिनेत्यांनी आणि बड्या व्यक्तींनी मला निराश केलं आहे. आपले व्यक्तिमत्त्व विकून तो अभिनेता मॅन ऑफ ऍक्शन, जुबान केसरी असं म्हणत नायक बनतो. छोट्या स्टार्सचं ठीक आहे, परंतु मोठे स्टार्स असं का करतात? खेड्यात बसलेलं एक लहान मुल शाहरूख खानला सिगारेट ओढताना पाहतं त्यावेळी त्यालादेखील हेच वाटतं की धूम्रपान ही चांगली गोष्ट आहे. या मोठ्या स्टार्सनी आपापल्या जबाबदाऱ्या लक्षात घेणं गरजेचं आहे.’
मुकेश खन्ना यांच्या या टिकेला आता अजय देवगण आणि शाहरुख खान काही प्रतिक्रिया देणार की त्यांच्या या टिकेला दुर्लक्षित करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.










