चित्रपटसृष्टीत असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांच्या नावामुळे, त्यातील कुठल्यातरी सीनमुळे वादाला तोंड फुटल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, जर चित्रपट आणि त्यात कलाकाराने साकारलेल्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर? असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी २०१७ साली ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे आता या चित्रपटावर आणि त्यातील अमोल कोल्हे यांच्या भूमिकेवर भाजपमधील काही मोठ्या नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. तसेच ‘भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले?’, असा सवालही त्यांनी केला आहे.
भाजपने अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीका केल्याचे मीडियाने सांगितले असता, शरद पवार म्हणाले की, “भाजप कधीपासून गांधीवादी झाले? मी भाजप आणि संघाच्या इतिहासावर बोलू शकत नाही. एकेकाळी गांधीविरोधात वेगळी भूमिका घेणाऱ्या शक्ती आता नक्की कुठे आहेत, हे पाहिले पाहिजे.”
गांधींवरील सिनेमाबद्दल बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “गांधींवरचा एक सिनेमा काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. तो अमेरिकेतही प्रसिद्ध झाला. यामुळे गांधींचे महत्त्व संपूर्ण जगाला समजलं.”
“त्या सिनेमात गोडसेंची भूमिका साकारणारी व्यक्ती हा कलाकार होता. ते खुद्द गोडसे नव्हते. त्यामुळे कलेच्या नजरेतून त्या भूमिकेकडे पाहावे,” असेही अमोल कोल्हे यांची पाठराखण करत शरद पवार म्हणाले.
विशेष म्हणजे, शरद पवार यांनी यावेळी आपल्या वक्तव्याला आधार देतील अशा उदाहरणांचाही वापर याठिकाणी केला.
ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात संघर्ष झाला. त्यावर सिनेमाही बनवला गेला. समजा राजा शिवाजी सिनेमात कोणी एक कलाकार महाराजांची भूमिका साकारतो आणि दुसर कलाकार औरंगजेब साकारतो, तर तो औरंगजेब साकारणार मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही, तर तो कलावंत म्हणून तिथे भूमिका साकारत असतो.”
यानंतर त्यांनी रामराज्याचेही उदाहरण सर्वांपुढे ठेवले. “अशा सिनेमात रावण साकारणारी व्यक्ती प्रत्यक्षात रावण नसून कलाकार असतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी ही भूमिका स्वीकारली असेल, तर ती कलाकार म्हणून स्वीकारली आणि साकारली,” असा विचारही त्यांनी मांडली.
आपली भूमिका मांडत शरद पवार पुढे म्हणाले की, “२०१७ साली जेव्हा त्यांनी ही भूमिका साकारली, तेव्हा ते पक्षातही नव्हते. कलावंत म्हणून भूमिका साकारली म्हणजे ते गांधीजींविरुद्ध आहेत, असा अर्थ होत नाही.”
एक कलाकार आणि एका देशात घडलेला इतिहास या दोन गोष्टींना समोर ठेऊनच आपण व्यक्त झाले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा – खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भुमिकेत! WHY I KILLED GANDHI चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
विशेष म्हणजे, कलाकार म्हणून मी अमोल कोल्हे यांचाच नाही, तर सर्व कलाकारांचा सन्मान करतो. असेही ते पुढे म्हणाले.
यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अमोल कोल्हे यांच्या चित्रपटातील भूमिकेला विरोध केला आहे. आणि त्याबाबत एक पोस्ट देखील केलेली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःची भूमिका मांडली आहे. ज्यात त्यांनी विरोध करण्याचे सकारण दिले आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2022
अमोल कोल्हे यांच्या ‘Why I Killed Gandhi‘ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबद्दल बोलताना अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केली. ज्यात त्यांनी, ‘आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले चित्रिकरण झाले होते’ असे म्हटले आहे.
हे पाहिलं का? प्रेक्षकांवर अभिनयाची जादू करणारे ‘आशिकी’मधील कलाकार कुठे आहेत?
अमोल कोल्हे यांनी अनेक मराठी मालिका आणि सिनेमात काम केले आहे. त्यात ‘राजा शिवछत्रपती’, ‘राज माता जिजाऊ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’, ‘रमा माधव’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांचा समावेश आहे.
हेही वाचा :