पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्माने 4 फेब्रुवारी रोजी आपल्या प्रेयसी शजा मोरानीसोबत लग्न केले. भाग्यश्री, जूही चावला समवेत पद्मिनीच्या अनेक बॉलीवूडमधील मित्रमैत्रिणींनी लग्नाला हजेरी लावली होती. आज बॉलीवूडमध्ये एक दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे.
बॉलीवूडमधील बर्याच सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करून पद्मिनी कोल्हापुरेंनी इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1965 रोजी एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला होता.
वयाच्या 10 व्या वर्षी अभिनयाच्या कारकीर्दीला केली सुरुवात:
वयाच्या दहाव्या वर्षी पद्मिनीने ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘साजन बिना ससुराल’, ‘थोडी सी बेवफाई’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. 1980 साली ‘इंसाफ का तराजू’ या चित्रपटाद्वारे त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी ‘जमाने को दिखाना है’ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. या व्यतिरिक्त त्यांनी ‘प्रेमरोग’, ‘विधाता’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘सौतन’, ‘वो सात दिन’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘प्यार के काबील’, ‘दाता’, ‘फटा पोस्टर निकला हीरो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पळून केले होते लग्न:
वयाच्या केवळ 21व्या वर्षी पद्मिनीने घरातून पळ काढला आणि लग्न केले होते. झाले असे, की एका चित्रपटात काम करताना त्या निर्माता प्रदीप शर्माच्या प्रेमात पडल्या. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते, पण घरातील मंडळी सहमत नव्हती. त्यामुळे शेवटी त्यांनी घरातून पळून जायचे ठरवले.
दोघे ‘ऐसा प्यार कहां’ (1986)या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. मिथुन चक्रवर्ती या चित्रपटामध्ये अभिनेत्याचा रोल साकारत होते. विजय सदाना दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती प्रदीप शर्मा यांनी केली होती. तसेच, प्रदीपसोबतच्या नात्याबद्दल पद्मिनीच्या कुटुंबियांना आनंदी नव्हते.
यामागचे कारण असे होते की ते दोघे वेगवेगळ्या समाजाचे होते. दोघांनीही पद्मिनीच्या कुटुंबाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत. अखेर एक दिवस दोघांनीही पळून जायचे ठरवले. त्यानंतर 14 ऑगस्ट 1986 रोजी दोघांचे लग्न झाले. आता या दोघांना प्रियांक नावाचा मुलगाही आहे, ज्याचे लग्न ४ फेब्रुवारी २०२१ रोजी झाले.
पद्मिनीच्या धाकट्या बहिणीचे नाव तेजस्विनी कोल्हापुरे आहे. तिनेही काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची मोठी बहीण शिवांगीचे लग्न शक्ति कपूरशी झाले आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नात्याने पद्मिनीची भाची आहे. तसेच, लता मंगेशकर पद्मिनीची मावशी आहेत.
प्रिन्स चार्ल्सला केले होते किस:
पद्मिनीचे नाव विवादामध्ये देखील तेवढेच राहिले. 1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत दौर्यावर आले होते. तथापि, प्रिन्सच्या सभोवताली झेड-सुरक्षा होती, परंतु काहीही विचार न करता पद्मिनीने त्यांच्या गालावर किस केले. ही गोष्ट बरेच दिवस चर्चेचा विषय बनली होती.










