Sunday, July 14, 2024

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमानंतर ‘हा’ सुपरहिट सिनेमा देखील होणार हिंदीमध्ये डब, २६ जानेवारीला होणार प्रदर्शित

मागील काही काळापासून दाक्षिणात्य सिनेमे हिंदीमध्ये डब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक साऊथमध्ये हिट झालेले सिनेमे हिंदीमध्ये डब करून प्रदर्शित केले जातात. या चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो. मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशात एकाच हिरोची आणि एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन आणि चित्रपट आहे, ‘पुष्पा: द राइज’. सुकुमार दिग्दर्शित या सिनेमाने प्रदर्शनानंतर तुफान यश आणि लोकप्रियता मिळवली असून या सिनेमात अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटगृहांसोबतच ओटीटी माध्यमावर देखील सिनेमा खूपच गाजताना दिसत आहे. सिनेमाची कथा, अल्लू अर्जुनचा अभिनय, गाणी, संवाद आदी सिनेमाच्या सर्वच बाबी सोशल मीडियावर खूपच गाजताना दिसत आहे.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या सिनेमाला मिळणार प्रतिसाद पाहून अल्लू अर्जुनच्याच ‘अला वैकुंठापुरमुलु’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा हा सिनेमा हिंदीमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीला हा हिंदी डब सिनेमा प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट समीक्षक असलेल्या तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून ‘अला वैकुंठापुरमुलु’ सिनेमात हिंदीमध्ये डब केला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन अभिनित ‘अला वैकुंठापुरमुलु’ हा सिनेमा २०२० साली प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा त्या वर्षातील सावंत जास्त कमाई करणारा सिनेमा ठरत ब्लॉकबस्टर हिट झाला. ‘अला वैकुंठापुरमुलु’ सिनेमाने तब्ब्ल १६० कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. सध्या हा सिनेमा नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

‘अला वैकुंठापुरमुलु’ हा एक कमर्शियल एंटरटेनमेंट सिनेमा असून यात अल्लू अर्जुन, पूजा हेगड़े आणि समुथिरकानी मुख्य भूमिकेत होते. याशिवाय तब्बू, जयराम, सुशांत, निवेथा पेथुराज, नवदीप आणि राहुल रामकृष्ण हे देखील सिनेमात महत्वाच्या भूमिकेत होते. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमाने आतापर्यंत ३०० कोटींची कमाई केली असून, अल्लू अर्जुनाचा हा पहिलाच सिनेमा आहे ज्याने ३०० कोटींची कमाई केली.

हेही वाचा-

हे देखील वाचा