मंडळी, आपणा सर्वांना सनी देओलचा चॅम्पियन सिनेमा आठवतोय. जर हो तर मग त्यातला तो खतरनाक व्हिलन नक्कीच आठवत असणार! एका लहान मुलाच्या मागे हात धुवून लागलेला व्हिलन राहुल देव याने ज्या प्रकारे साकारला होता तो खरंच वाखाणण्याजोगा होता. कारण अजूनही लहान मूलं तो सिनेमा पाहताना त्या लांब केस वाल्या व्हीलनला भरपूर घाबरतात.
असो सांगण्याचा मुद्दा हा की राहुल देव हा काय कमालीचा नट आहे. या सिनेमानंतर राहुलने अनेक चित्रपटांमध्ये खलनायक तर अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारल्या. यावर्षी या राहुल देवला इंडस्ट्रीमध्ये येऊन २० वर्षे पूर्ण झाली सुद्धा! परंतु या वीस वर्षांत राहुलने अमाप श्रीमंतीचा काळ देखील अनुभवला तर एक काळ असाही होता की राहुलला एकेक पैसा खर्च करताना हजारवेळा विचार करावा लागत असे.
राहुल त्याच्या संघर्षाबद्दल फार कमी बोलतो, पण जेव्हा तो बिग बॉसचा स्पर्धक म्हणून आला तेव्हा त्याने सांगितले की, काम नसल्यामुळे मी आर्थिक अडचणींसह झगडत होतो. ज्यामुळे राहुलला बिग बॉस १०ची ऑफर आली आणि त्याला ती स्वीकारावी लागली. मात्र, राहुल स्वतः तो कठीण काळ विसरण्याचा प्रयत्न करतो आहे.
राहुल आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीबद्दल म्हणाला, “दोन दशकं झाली. माझ्यासाठी हा एक दीर्घ आणि यशस्वी प्रवास आहे. २० वर्षांत १०० हून अधिक फीचर फिल्ममध्ये काम केल्याच्या अनुभव गाठीशी असल्याने मी अजूनही शिकत आहे. ”
यापुढे राहुल म्हणतो की, “बर्याच वर्षांपासून मला प्रेक्षकांचं अतूट प्रेम मिळालं आहे. मी माझ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे पुरेसे आभार मानू शकत नाही. माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत: ला कठोर बनवणं आणि माझ्या अभिनयात अधिक बदल करून नवीन पात्रांचा प्रयत्न करणे. ”
राहुल देव याने आत्तापर्यंत चॅम्पियन, मास, फुटपाथ, अशोका, अग्निपंख, येवदू, मुबारका, ढिशुम, एक पहेली लीला या आणि अशा अनेक हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमधून राहुल देव याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. याशिवाय राहुलने रॉकी हा मराठी सिनेमा देखील केला आहे, ज्यात आपल्याला राहुल सोबत क्रांती रेडकर आणि अशोक शिंदे हे देखील दिसले होते.










