Thursday, March 28, 2024

‘तो’ बॉलिवूड अभिनेता नसता, तर रजनीकांत यांनी कधीच हवेत फेकली नसती सिगारेट

साऊथच्या हिरोंमध्ये सगळ्यात स्टाईलिश हिरो कोण? असं म्हणलं तर डोळ्यापुढं पहिलं नाव येतं ते म्हणजे रजनीकांत. सिनेमात सिगारेट पिणे असो, चष्मा घालणं असो किंवा मग शर्टचा कॉलर टाईट करणं असो. या सर्व स्टाईलने रजनीकांत यांनी आपली वेगळीच छाप सोडलीये. छोट्या मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण रजनीकांत यांची स्टाईल कॉपी करताना दिसतात. अलीकडचे लोक स्टायलिश स्टार म्हणून अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांसारख्या कलाकारांची नावं घेतात, पण मंडळी तुम्हालाही माहितीये, तुमच्या मनात स्टायलिश स्टार म्हणून रजनीकांत यांचेच नाव असेल, बरोबर ना. कदाचित या नवख्या स्टार्सनी रजनीकांत यांनाच कॉपी करून या स्टाईल शिकल्या असतील, पण तुम्हाला माहितीये का? स्टाईलचे बादशाह रजनीकांत यांनीदेखील त्यांची सिगारेट पिण्याची स्टाईल आता जगभरात फेमस आहे. ही स्टाईल त्यांनी एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याकडून शिकली होती. कोण होते ते अभिनेते. चला जाणून घेऊया…

साऊथमध्ये देवासमान पूजले जाणारे रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर, 1950 रोजी बंगळुरूत एका मराठी कुटुंबात झाला होता. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांच्या वडिलांचं नाव रामोजी राव गायकवाड होतं, ते हवालदार होते. चार भावंडांमध्ये रजनीकांत सर्वात छोटे होते. जेव्हा ते फक्त चार वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, त्यांच्या आईनं जगाचा निरोप घेतला होता. त्यामुळे त्यांचं कुटुंब बंगल्यासारखं कोसळलं होतं. रजनीकांत यांना त्यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यांनी कुलीचं काम करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुढं त्यांना बंगळुरूच्या परिवहन सेवेत बस कंडक्टरची नोकरी मिळाली.

रजनीकांत काम तर करत होतेच, पण त्यांचं मन त्यांना दुसरं काही काम करण्यास सांगत होतं. खरं तर त्यांना पडद्यावर येऊन अभिनय करायचा होता. कंडक्टरची नोकरी करत करत त्यांनी कन्नड रंगमंचावर काम करायलाही सुरुवात केली. यानंतर सिनेमात काम करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या मित्राची मदत घेतली आणि १९७३ ला मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेतले आणि ऍक्टिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला.

पुढे वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला तमिळ सिनेमा होता ‘अपूर्वा रागनगाल.’ या सिनेमात त्यांच्यासोबत कमल हासन आणि श्रीविद्याही होती.1975 ते 1977 दरम्यान त्यांनी सर्वाधिक सिनेमात कमल हासनसोबत व्हिलनचीच भूमिका साकारली. शेवटी तो दिवस उजाडलाच. तो दिवस होता 2 जून, 1978. याच दिवशी ‘भैरवी’ हा सिनेमा रिलीझ झाला होता. हा रजनीकांत यांचा मुख्य भूमिका असलेला पहिलाच तमिळ सिनेमा होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि रजनीकांत स्टार बनले.

या सिनेमानंतर रजनीकांत यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी एकापाठोपाठ एक अशा सुपरहिट सिनेमांचा जणू पाऊसच पाडला. त्यांची वेगळी स्टाईलच त्यांची ओळख बनली. लवकर आपल्या बोलण्याच्या वेगवेगळ्या अंदाजाने आणि अभिनयाच्या दमावर ते साऊथचे सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. साऊथमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी बॉलिवूडचीही वाट धरली. त्यांनी 1983 साली रिलीझ झालेल्या ‘अंधा कानून’ हिंदी सिनेमातून पदार्पण केलं. बॉलिवूडमध्येही त्यांच्या स्टाईलने कमाल केली. त्यांच्या स्टाईलने चाहत्यांना भुरळ घातली. त्यांची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाईल असो किंवा कॉईन वर फेकण्याची वेगळी स्टाईल असो, किंवा मग चष्मा पकडणे आणि हसण्याची स्टाईल. या सर्वांनीच प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या या सर्व स्टाईल फक्त भारतातच नाही, तर परदेशातही कॉपी केल्या जाऊ लागल्या.

त्यांच्या सर्व स्टाईलमध्ये सर्वात फेमस स्टाईल होती, सिगारेट हवेत फेकून ओठांनी पकडणे आणि ती पेटवण्याची, पण ही स्टाईल त्यांनी पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांना ‘खामोश’ करणारे शत्रुघ्न सिन्हांची होती. आपल्या सिगारेट स्टाईलबद्दल ते सांगतात की, ही स्टाईल सर्वात आधी शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्वात आधी हिंदी सिनेमात केली होती. जेव्हा त्यांनी शत्रुघ्न सिन्हांचा हा अंदाज पाहिला, तेव्हा ते त्याने थेट फिदाच झाले आणि ते एकदम परफेक्ट करण्यासाठी मला हजाराहून अधिक वेळा सराव करावा लागला. हे एक टॅलेंट आहे, पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे त्याची वेळ. फक्त सिगारेट पकडायची नव्हती, तर तुमचे डायलॉग्सही बोलायचे होते. काही वेळा अभिनय करताना सिगारेट फक्त फेकायची आणि ती परत पकडायची एवढंच करायचं होतं.”

तर असा आहे हा किस्सा. आता तुम्हालाही समजलंच असेल की, रजनीकांत यांना सिगारेट पकडण्याच्या स्टाईलची प्रेरणा ही बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडूनच मिळाली होती. (rajinikanth learnt his signature cigarette flip style from this bollywood actor)

अधिक वाचा-
दिलीप कुमार आणि मधुबाला प्रेमकहाणी: फक्त एका हट्टामुळे तुटली बॉलिवूडची सर्वात रोमॅंटिक आणि चर्चित प्रेमकहाणी
रजनीकांत यांनी राज कुमारचे नाव ऐकल्यावर का दिला होता चित्रपटात काम करण्यास नकार, वाचा कारण

हे देखील वाचा