‘काई पो चे’ सिनेमाला झाली आठ वर्ष पुर्ण, राजकुमार रावने ‘सुशांत सिंग रजपुत’च्या आठवणींना दिला असा उजाळा


राजकुमार रावसह दिग्दर्शक अभिषेक कपूरही झाले भावुक; पोस्ट शेअर करत दिला आठवणींना उजाळा!

बॉलिवूडचे अनेक स्टार्स गेल्या वर्षी कायमचे जग सोडून गेले. अनेक चाहत्यांचा आवडता अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे निधन होऊनही आता जवळपास 8 महिने झाले आहेत. तो एक उत्कृष्ट अभिनेता होता. त्यामुळे आजही चाहत्यांच्या मनात तो जिवंत आहे. अभिनयाबरोबरच सुशांतला खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रातही रस होता. काही तंत्रज्ञान आणि सामाजिक संबंधित कंपन्यांमध्ये तो सह-संचालक देखील होता.

सुशांतसिंग राजपूतने 2013 साली ‘काई पो छे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रसिद्ध कादंबरीकार चेतन भगत यांनी लिहिलेल्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटात सुशांतशिवाय राजकुमार राव आणि अमित साध देखील दिसले होते. या चित्रपटाला आता 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा सहकलाकार राजकुमार रावने त्याची आठवण काढत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सुशांतसिंग राजपूत याची ‘काई पो चे’ मध्ये महत्वाची भूमिका होती. या चित्रपटासाठी त्याचे खूप कौतुकही झाले होते. या चित्रपटामुळे राजकुमार आणि सुशांत चांगले मित्र झाले. त्यामुळे, जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला, तेव्हा राजकुमार त्याची शेवटची भेट घेण्यासाठी पोहचला होता.

अशा परिस्थितीत राजकुमारने सुशांतला ‘काई पो चे’ साठी आठवून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये लिहिले की, “‘काई पो चे’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. या चित्रपटाने माझ्यातील अभिनेत्याला अधिक सामर्थ्यवान होण्यास मदत केली. जणू कालचीच गोष्ट आहे, जेव्हा सुशांत, अमित आणि मी चित्रपटाचे शूटिंग करत होतो.” “माझा आवडता सुशांतसिंग राजपूत! तुझी खूप आठवण येत आहे.”

Photo Courtesy: Instagram/rajkummar_rao

राजकुमारने सुशांतला ज्या प्रकारे या चित्रपटासाठी आठवले आहे, त्यास चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनीही सुशांतची आठवण काढत एक पोस्ट शेअर केली होती. अभिषेक कपूर म्हणाले की, “मी या चित्रपटासाठी असे पात्र शोधत होतो, ज्यामुळे हा चित्रपट कायम लक्षात राहू शकेल. राजकुमार राव, अमित साध आणि सुशांतसिंग राजपूत यांनी चित्रपटात उत्तम काम केले आणि हा चित्रपट कायमस्मरणीय बनवला.”

सुशांतबाबत दिग्दर्शक म्हणाले की, “सुशांत एक जबरदस्त अभिनेता होता. त्याची उणीव आम्हाला नेहमी जाणवत राहील. त्याने ‘काई पो चे’ या चित्रपटात ज्या पद्धतीने आपली भूमिका साकारली, ती कधीच विसरता येणार नाही.” तसेच, अभिषेक कपूरने सुशांत सिंग राजपूतसोबत केदारनाथ चित्रपटातही काम केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.