चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे कोरोनाने निधन; आयुषमान खुरानासोबत केले होते काम

Sad News Dream Girl Actress Rinku Singh Nikumbh Passes Away


देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने सर्वांनाच अडचणीत टाकले आहे. दिवसेंदिवस कोणीतरी जगाचा निरोप घेतल्याच्या बातम्या येत आहेत. अशातच आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेता आयुषमान खुराना अभिनित ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. यामुळे आणखी एका कलाकाराने जगाचा निरोप घेतल्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, रिंकू सिंग निकुंभची चुलत बहीण चंदा सिंग निकुंभने सांगितले की, “२५ मे रोजी तिला कोरोनाची लागण झाली होती. ती होम आयसोलेशनमध्येच होती. तरीही तिचा ताप काही कमी होत नव्हता. त्यामुळे आम्ही काही दिवसांनंतर रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात डॉक्टरांना जाणवलेच नाही की, तिला आयसीयू बेडची आवश्यकता आहे. ती सुरुवातीपासूनच सामान्य कोव्हिड वॉर्डात होती. दुसऱ्या दिवशी तिला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. ती आपल्या निधनाच्या दिवसापर्यंत आयसीयूमध्ये ठीक होत होती. मात्र, ती तिला वाटत होते की, ती जिवंत राहू शकत नाही. तिला दमाही होता.”

चंदाने पुढे सांगितले की, “ती खूपच आनंदी आणि एनर्जेटिक होती. इतकेच नव्हे, तर रुग्णालयात दाखल केल्यानंतरही ती लोकांची मदत करत होती. ती नुकतीच एका शूटिंगसाठी गोव्याला जाणार होती. मात्र, कोव्हिड- १९मुळे आम्ही तिला रोखले होते. तिला घरातच कोरोनाची लागण झाली होती. घरातील अनेकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, जी अद्याप पूर्ववत झालेली नाही.”

रिंकू सिंग निकुंभ शेवटची ‘हॅलो चार्ली’ चित्रपटात झळकली होती. व्हिसलिंग वुड्समधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारी रिंकू सिंग निकुंभ ‘चिडियाघर’ आणि ‘बालवीर’ या मालिकेतही दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.