‘त्या’ रात्री सलमानने १९ मजल्यावरून उडी मारण्याची दिली होती धमकी! ऐश्वर्याने नेमकं केलं तरी काय होतं?


बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याचा ५६ वा वाढदिवस आहे. आजपर्यंत भाईजान खूप जणांसाठी गॉडफादर बनला आहे. अनेक अभिनेत्रींना त्याने त्याच्या एका शब्दावर सिनेमांमध्ये घ्यायला लावले होते. अद्यापही लग्न न झालेल्या सलमानचे अनेक अभिनेत्रींनसोबत अफेअर्स राहिले आहेत. अशाच एका अभिनेत्रीबरोबर त्याचं नाव हे दीर्घकाळ जोडलं गेलं होतं. आता सलमानचा बर्थडे आणि त्याच्या लव्ह लाईफ बद्दल चर्चा झाली नाही असं होणार नाही. चला तर मग सलमान आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांचा ब्रेकअप नेमका कोणत्या कारणामुळे झाला होता, ते पाहूयात.

ऐश्वर्या राय ही मिस वर्ल्ड हा किताब जिंकून नुकतीच बॉलिवूडमध्ये आली होती. फार फार तर तिचे एक दोन सिनेमे झाले होते. परंतु हवा तसा प्रसिद्धी देणारा बिग बजेट सिनेमा तिच्या वाट्याला अजूनही आला नव्हता. दुसरीकडे सलमान खान याने या नवख्या ऐश्वर्याचे सिनेमे पाहिले होते आणि तिला पाहताक्षणीच तो तिच्यावर प्रेम करू लागला होता. (salman khan birthday special behind salman khan aishwarya rai breakup)

१९९७ च्या दरम्यान संजय लीला भन्साळी त्यांच्या पुढील सिनेमाचं म्हणजेच ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचं प्रि प्रोडक्शचं काम सुरू करत होते. अशात ते या सिनेमाच्या कास्टिंगच्या शोधात होते. सलमान आणि संजय हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि अजूनही आहेत. सलमानने संजयला चित्रपटाच्या नायिकेसाठी ऐश्वर्याचं नाव सुचवलं आणि अशाप्रकारे ऐश्वर्याला तिचा पहिला बिग बजेट सिनेमा मिळाला, ज्याने तिला खूप पैसा आणि प्रसिद्धी देखील दिली.

या चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात जवळीक वाढू लागली. याच सेटवर त्यांचे सूत जुळू लागले. १९९९ साली जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तोपर्यंत सलमान आणि ऐश्वर्या हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते. बॉलिवूडमध्ये दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू होत्या.

ऐश्वर्या आणि सलमान एकमेकांच्या प्रेमात इतके जवळ आले होते की ऐश्वर्या सलमानच्या घरी ये जा करू लागली होती. तिची सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा खान यांच्याशी विशेष बॉंडिंग तयार झाली होती. ऐश्वर्या सलमानच्या कुटुंबाच्या प्रत्येक समारंभात सहभागी होत होती. परंतु ऐश्वर्याचं सलमान सोबत नात्यात असणं हे तिच्या आई वडिलांना मान्य नव्हतं.

सर्व काही चांगलं सुरू असताना अचानक सलमान आणि ऐश्वर्यामध्ये खटके उडायला लागले. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सलमान रात्रीच्या वेळी ऐश्वर्याच्या घराचं दार जोरजोरात हाताने ठोठावत होता. पण तरीही ऐश्वर्या त्याला घरात घेत नव्हती. दार वाजवून वाजवून सलमानच्या हातातून रक्त येऊ लागलं आणि शेवटचा उपाय म्हणून त्याने १९ व्या मजल्यावरून उडी मारून जीव देण्याची धमकी दिली. तेव्हा कुठे ऐश्वर्याने सलमानला घरात घेतलं.

या सगळ्यामागचं कारण एकच होतं आणि ते म्हणजे सलमानला ऐश्वर्यासोबत लवकरात लवकर लग्न करायचं होतं परंतु ऐश्वर्या लग्नाला नकार देत होती. तरीही सतत सलमानने तिच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. अखेर एक दिवस सलमानसोबतच्या नात्याचा अंत ऐश्वर्याने केला. तिने सलमानसोबत ब्रेकअप केलं.

ऐश्वर्याने ब्रेकअप केल्यामुळे सलमान खानचा राग अनावर झाला होता. सलमान तिच्या खाजगी आयुष्यासोबतच तिच्या प्रोफेशनल आयुष्यात देखील दखल देऊ लागला. ऐश्वर्या ज्या सिनेमात काम करत होती त्या सिनेमाच्या सेटवर जाऊन सलमान तमाशा करायचा आणि तेथील वस्तूंची तोडफोड करायचा.

एक दिवस शाहरुखच्या चलते चलते या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होत. सलमानने तिथे जाऊनही तसाच तमाशा केला कारण चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिका साकारत होती. सलमान आणि शाहरुख यांच्यात खूप घट्ट मैत्री होती. त्यादिवशी सलमानचं वागणं हे शाहरुखला सुद्धा खटकलं होतं परंतु तरीही मित्राच्या आग्रहाखातर त्याने ऐश्वर्याच्या जागी सिनेमात राणी मुखर्जीला घेतलं.

ऐश्वर्या आणि सलमान हे अशा रीतीने वेगळे झाले की पुन्हा कधीच एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही. ऐश्वर्याने पुढे जाऊन अभिषेक बच्चन याच्याशी विवाह केला आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. तर सलमानच्या आयुष्यातही पुढील काही वर्षात अनेक अभिनेत्रींची नावं जोडली गेली परंतु सलमान अजूनही सिंगलच आहे.

काही वर्षांपूर्वी ‘सलमान खान हे माझ्या आयुष्यातील एक वाईट स्वप्नं होतं’, असं वक्तव्य ऐश्वर्या राय हिने माध्यमांसमोर केलं होतं. असो कटू असला तरी सलमानच्या आयुष्यातील हा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता आणि कायम राहणार आहे. ही आठवण इथेच थांबवूयात आणि आपल्या भाईजानला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. हॅप्पी बर्थडे भाईजान सलमान!

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!