बॉलीवूडच्या या रंगीत दुनियेत अनेक नाव काळानुसार मागे पडले. काही कलाकारांनी अनेक मोठ्या दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांसोबत पदार्पण करूनही आणि त्यांच्यापुढे एक यशस्वी आडनाव असूनही काही कलाकार या इंडस्ट्रीमध्ये पाय रोवू शकले नाही. यातलेच एक नाव म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टी.
यशराज बॅनरच्या ‘मोहब्बते’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी शमिता शेट्टी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. २ फेब्रुवारी १९७९ मध्ये शमिताचा जन्म झाला. शमिताने तिच्या बहिणीच्या शिल्पा शेट्टीच्या पाऊलावर पाऊल ठेवत तिने या चंदेरी दुनियेत प्रवेश केला.
सन २००० साली आलेल्या ‘मोहब्बते’ चित्रपटात उदय चोप्राच्या सोबत नायिका म्हणून तिने भूमिका साकारली. या चित्रपटामुळे शमिता एका रात्रीत स्टार झाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मात्र तिला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
शमिताला लहानपणापासूनच फॅशन इंडस्ट्रीबद्दल प्रचंड आकर्षण होते. तिने तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण करून, मुंबईमधल्या एसएनडीटी कॉलेजमधून तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले. तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत काम केले.
पुढे तिने इंटेरियर डिझायनिंग करण्यासाठी लंडनच्या सेंट्रल मार्टिन्स अँड इंचबाल्ड स्कूल ऑफ डिजा़इन मध्ये गेली. तिथून आल्यावर तिने मुंबईच्या रॉयल्टी क्लब, चंडीगढ़ लॉसिस स्पाला डिझाइन केले. तिला तिच्या उत्कृष्ट कामासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले.
शमिताने तिच्या करियरच्या पहिल्याच सिनेमात यशराज सारख्या मोठ्या बॅनरसोबत आणि अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, उदय चोपड़ा, जिमी शेरगिल, जुगल हंसराज, किम शर्मा, प्रीति झिंगियानी यांसारख्या कलाकारांसोबत काम केले. शमिताला तिच्या या पहिल्या ‘मोहब्बते’ चित्रपटासाठी उत्कृष्ट पदार्पणाच्या IIFA पुरस्कार देखील मिळाला आहे.
शमिताने ‘जहर’, ‘बेवफा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तिचे ‘मेरे यार की शादी हैं’ चित्रपटातील ‘शरारा शरारा’ गाणे सुपरहिट झाले होते. त्यानंतर तिला ‘शरारा गर्ल’ हे नाव देखील पडले. हिंदीसोबतच तिने तामिळ आणि तेलगू सिनेमातही काम केले आहे.
चित्रपटांसोबतच शमिता बिग बॉस, खतरो के खिलाडी, झलक दिखला जा, फियर फॅक्टर आदी रियालिटी शो मध्ये देखील दिसली आहे. आताच तिची ‘Black Windows’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. शिवाय ती अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा दिसत असते.










