Saturday, April 20, 2024

‘ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय’, प्रथमेश परबबाबत ‘हे’ काय बोलून गेला दिग्गज अभिनेता

अभिनेता प्रथमेश परबने (Prathmesh Parab) कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात त्याचे खास असे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या ‘टाईमपास’ या सिनेमाने तर प्रेक्षकांना वेड लावले होते. त्यातील त्याची स्टाईल, कपडे, डायलॉग आणि अटीट्युड या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या होत्या. अशातच त्याचा ‘टकाटक 2’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. त्यामुळे देखील त्याची जबरदस्त लोकप्रियता मिळत आहे. अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. टकाटक या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले होते. त्यातील त्याचा अभिनय सगळ्यांना आवडला होता.

अशातच ‘टकाटक 2’ रिलीझ झाल्याने त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. याआधी त्याचा आणि ऋता दुर्गुळेचा (Hruta Durgule) ‘टाईमपास 3’ हा सिनेमा रिलीझ झाला आहे. ‘टकाटक 2’ मध्ये अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची देखील एक छोटीशी भूमिका आहे. अशातच लागोपाठ सिनेमे रिलीझ झाल्याने किरण माने प्रथमेश परबसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांचा फेसबीकवर ही पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “…’टकाटक 2′ मधी या पोरानं धम्माल उडवून दिलीय भावांनो ! प्रथमेश परब ह्या पोराचं पयल्यापास्नंच मला लै लै लै कौतुक वाटतं. मी ह्याला मुंबैतल्या इंटर काॅलेज एकांकिका स्पर्धांपास्नं बघतोय. रूढ अर्थानं ज्याला पिच्चरचा ‘हिरो’ म्हन्लं जातं तसं ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय. उलट रस्त्यावरनं फिरताना एखाद्या पोराला “अय् हिरोS, बाजूला सरक.” असं म्हन्लं जातं, त्या टाईपमधी हे पोरगं येतं…आनि आजकाल तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतबी उंच, गोर्‍यापान, देखन्या, बाॅडीबिल्डर पोरांचं ‘पीक’ आलंय. तरीबी सोत्ताच्या हिमतीवर, अभिनयाच्या ताकदीवर, आत्मविश्वासावर, सगळ्या हॅंडसम हंक पोरास्नी “अय् हिरो, बाजूला सरक.” म्हनत, हे पोरगं ‘हिरो’ झालं ! एक नाय, दोन नाय चार-चार सुप्परडुप्परहिट्ट पिच्चर दिले !!”

पुढे त्याने लिहिले आहे की, .”‘टकाटक’ त्यातलाच एक. तीनचार वर्षांपूर्वी या पिच्चरनं बाॅक्स ऑफिसवर रेकाॅर्डब्रेक धमाका केलावता. मराठीत काॅलेज गोईंग पोरापोरींना ‘टारगेट ऑडीयन्स’ मानून, त्यांची आवडनिवड डोळ्यापुढं ठेवून लै कमी पिच्चर आले. हे लक्षात घेवून दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी टकाटकच्या निमित्तानं ‘सेक्स काॅमेडी’ ह्यो प्रकार लै नादखुळा पद्धतीनं हाताळला. तरून पोरापोरींची भाषा, त्यांचे शब्द, डबल मिनिंग डायलाॅग्ज, सेक्सबद्दल त्या वयातलं मनात असलेलं कुतूहल, त्यातनं होनार्‍या चुका आनि शेवटी माफक उपदेशाचा डोस…अशा पद्धतीचा ‘टकाटक’ काॅलेजच्या पोरापोरींनी डोक्यावर घेतला.”

पुढे किरण माने म्हणतात की, “त्याचाच दूसरा पार्ट ‘टकाटक 2’ काल रिलीज झाला. माझीबी त्यात एक छोटी पण इंट्रेस्टिंग भुमिका हाय. अडनिड्या वयात, या पोरांच्या मनात उधळनार्‍या घोड्यांना लगाम घालायचं काम मी, स्वप्निल राजशेखर, पंकज विष्णू, स्मिता डोंगरे यांच्यावर आहे. काल स्पेशल स्क्रीनिंगला गेलोवतो. अक्षरश: हसून हसून पोटात दुखायला लागलं. ‘ते’ काॅलेजचे दिवस आठवले. हा पिच्चर फक्त काॅलेजला जानार्‍या टीनएजर्ससाठी नाय भावांनो. आपल्यालाबी ‘त्या’ रंगीन,जादूई काळात एक मस्स्त चक्कर मारून यायची आसंल, त्या काळातलं ‘काय काय’ भन्नाट आठवायचं आसंल, आनि मन,मेंदू फ्रेश करायचा आसंल तर ‘टकाटक 2’ नक्की बघा ! प्रथमेश, भावा या पिच्चरच्या शुटिंग, प्रमोशनच्या निमित्तानं तुला जवळनं बघितलं आनि तुझं लैच कौतुक वाटलं. माझ्या करीयरमधी अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले लै लै लै हिरो बघितलेत मी. सिरीयलच्या दुनियेत तर असे पैशाला पन्नास असत्यात. म्हनून मी अशा पोरांपास्नं जरा फटकून लांब असतो. पन तू येगळाच निघालास. ‘सुपरहिट’ असूनबी तुझ्यात कनभरबी गर्व नाय. प्रमोशनला फिरताना ‘सिनीयर’ म्हनून सतत माझी काळजी घेनं… कुठलाबी कमीपना न मानता सोत्ताची खुर्ची मला बसायला देन्यापास्नं, सतत माझ्या चहापान्याची विचारपूस करनं… कॅमेर्‍यापुढं तेवढ्याच एनर्जीनं, आत्मविश्वासानं वावरनं.. हे सगळंच सांगत होतं ‘तू लंबी रेस का घोडा है’ ! लिख ले. आप्पुन ने भौत दुनिया देखेली है…आप्पुन का अंदाज़ा ग़लत होईच नै सकता… लब्यू.”

त्याने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकजण त्यांच्या या पोस्टवर व्यक्त होत आहे. (there is noting in prathmesh parab personality actors statement viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

लग्नाबद्दल होणाऱ्या ट्रोलिंगवर मराठमोळ्या नेहा पेंडसेची प्रतिक्रिया, म्हणाली ‘माझ्या पतीला त्रास…’

हे देखील वाचा