Sunday, April 28, 2024

कंगना रणौतपासून ते राँकिंग स्टार यशपर्यंत ‘या’ कलाकारांनी चित्रपटासाठी सोडलं होतं घर, आज आहेत सुपरस्टार

मनोरंजनविश्वात काम, पैसे, प्रसिद्धी मिळावी आणि या पलीकडे जाऊन आपल्यातली कला जगाला कळावी यासाठी हजारो लोकं मुंबईसारख्या मायानगरीत येतात. मात्र, येथे आल्यानंतर प्रत्येकाला यश मिळेल की नाही हे त्या व्यक्तीसोबतच त्याच्या नशिबावर देखील अवलंबून असते. या ग्लॅमर जगात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना सहजासहजी एन्ट्री मिळत नाही. मात्र, चिकाटी आणि प्रतिभेच्या जोरावर या क्षेत्रात यश मिळवणे सोपे नसले, तरी अशक्य देखील नाहीये. अनेक लोकं या क्षेत्रात आणि मुंबईत येण्यासाठी खूप कष्ट घेतात. काही लोकांना या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांचा संपूर्ण पाठिंबा असतो. मात्र, काहींना त्यांचे घरचे या क्षेत्रातील अस्थिरतेमुळे या क्षेत्रात यायला नकार देतात. तरीही घरच्यांच्या विरोधाला झुगारून अनेक मुलं घरातून पळून मुंबईला येतात. यातले काही यशस्वी होतात, तर काही अपयशी होऊन पुन्हा आल्यापावली निघून जातात.

आज आपण जर या क्षेत्राकडे पाहिले, तर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी घरातून पळून येत या क्षेत्रात त्यांच्या लोकप्रियतेचा डंका वाजवला आहे. या लेखातून आपण अशाच काही कलाकारांची नावे जाणून घेणार आहोत.

कंगना रणौत
बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली आणि आजच्या घडीची आघाडीची अभिनेत्री असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कंगनाने खूप मोठा संघर्ष केला आहे. एक अभिनेत्री होण्यासाठी कंगनाने वयाच्या १५ व्या वर्षीच तिच्या आई- वडिलांचे घर सोडले. कंगनाची ही इच्छा किंवा हे स्वप्न तिच्या वडिलांना अजिबात मान्य नव्हते. मात्र, कंगनाने तिला अभिनेत्री व्हायचे हे ठरवले होते. त्यासाठीच तिने घर सोडले. असे सांगितले जाते की, कंगनाला तिच्या संघर्षाच्या काळात अंडरवर्ल्डच्या लोकांनी देखील पकडले होते. अनेक वर्ष कंगनाने संघर्ष केला आहे. आज कंगना एक यशस्वी अभिनेत्री असून, तिला पद्मश्रीने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

सोनू सूद
आज सोनू सूदने चित्रपटसृष्टीसोबतच समाजकार्यात देखील त्याचे नाव मोठे केले आहे. कोरोनाकाळात असंख्य लोकांसाठी धावलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. आज सोनूने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमधेही नाव कमावले आहे. सोनूला आधीपासूनच अभिनयाच्या क्षेत्रात काम करायचे होते. मात्र, त्याच्या आई- वडिलांना हे मान्य नव्हते. एकदा त्याने ट्वीट केले होते की, “मी एका एक्सप्रेसमध्ये बसून, मुंबईत अभिनयात काम करण्यासाठी लुधियाना वरून आलो होतो.” आज सोनूने त्याच्या प्रतिभेच्या जोरावर या क्षेत्रात नाव कमावले आहे.

नसीरुद्दीन शाह
नसीरुद्दीन शाह हे हिंदी सिनेमातील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या अभिनयाचा झेंडा फडकावला आहे. नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले आहे की, त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच घर सोडले होते, कारण त्यांना अभिनेता व्हायचे होते. मात्र, घरच्यांना ते मान्य नव्हते. त्यांनी त्यांच्या जिवंत अभिनयाच्या जोरावर आज या क्षेत्रात स्वतःचे मोठे नाव तयार केले आहे.

मल्लिका शेरावत
हिंदीसोबतच इंग्लिश चित्रपटांमध्ये दिसणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. मल्लिका ही बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तिने अभिनयात येणे तिच्या घरच्यांना आवडत नव्हते, म्हणूनच ती घरातून पळूत मुंबईत आली होती.

हर्षवर्धन राणे
‘सनम तेरी कसम’ सिनेमातून पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे हर्षवर्धन राणे. हर्षवर्धनने देखील घरच्यांच्या विरोधात जाऊन चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी वयाच्या १६ व्या वर्षी घर सोडले होते. आज हर्षवर्धनने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाने आणि दमदार लूक्सने लोकांना वेड लावले आहे.

यश
दाक्षिणात्य सुपरस्टार असलेल्या यशने देखील अभिनयासाठी घर सोडले होते. ‘केजीएफ’ चित्रपटाने यशने फक्त दाक्षिणात्य नाही, तर संपूर्ण जगात त्याच्या अभिनयाने लोकांना त्याची दाखल घ्यायला भाग पडले आहे.

यशच्या वडिलांना त्याने मोठा सरकारी अधिकारी व्हावे असे वाटत होते. मात्र, तो सर्व सोडून निघाला आणि आज तो सगळ्यांचाच आवडता बनला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा