अक्षय कुमारसोबत काम करणारी अभिनेत्री झालीय बेरोजगार; दोन मुलींची आई झाल्यामुळे कुणीच देत नाही काम


आज २१ व्या शतकात जगताना आपण किती स्वतःला आधुनिक विचारांचे म्हटले, तरीही खरंच आपण मॉडर्न विचारांचे आहोत का? हा प्रश्न सर्वप्रथम स्वतःलाच विचारा. कारण अतिशय मॉडर्न वाटणारी आपली विचारसरणीच आपल्याकडून कळत, नकळत आधुनिक विचारांना छेद देणाऱ्या अनेक चुका करून घेते. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात नेहमीच स्त्रीपुरुष समानतेबद्दल बोलतच असतो. मात्र, जेव्हा खरंच अशी समानता दाखवायची वेळ येते, तेव्हा आपण मागे हटतो. आजच्या काळात सर्वात मॉडर्न आणि स्वतंत्र विचारांचे जग म्हणजे काळासोबत चालणारे आणि पारिस्थितीनुसार बदलणारे हे आपले मनोरंजन क्षेत्र खरंच आधुनिक विचारसरणीचे आहे का? याचा विचार करायला लावणाऱ्या घटना घडल्या. त्यामुळे पुनःपुन्हा या गोष्टींचा विचार करायची गरज भासते.

आता अभिनेत्रींचेच बघा. त्या एकट्या आहे तोपर्यंत सर्व सुरळीत असते, जेव्हा त्या लग्न करतात, तेव्हा थोड्या फार फरकाने त्यांच्या लोकप्रियतेत आणि मागणीत घट होते. मूल झाल्यानंतर तर तिला कोणी साधे विचारायला देखील तयार होत नाही. आता ही बाब सर्वानाच लागू होते असे नाही. याला काही अभिनेत्री अपवाद देखील आहेत. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री चाहत खन्ना सध्या याच संबंधित तिने केलेल्या तिच्या एका पोस्टमुळे आणि मुलाखतीमुळे प्रकाशझोतात आली आहे.

‘बडे अच्छे लगते हैं’ आणि ‘कबूल है’ सारख्या मोठ्या आणि गाजलेल्या मालिकांचा भाग असणाऱ्या चाहतने नुकतेच ती आई असल्यामुळे तिला काम मिळत नसल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. चाहतने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आई होण्याला चुकीच्या पद्धतीने समजले जात आहे. मी एक सिंगल आई आहे. मी माझ्या दोन मुलींना थोड्या मदतीने आणि थोड्याच पैशांवर सांभाळत आहे. मी आई झाल्यामुळे आता मी पूर्वी इतक्या क्षमतेने आणि ताकदीने काम करू शकत नसल्यचे मेकर्सला वाटते. मात्र, मला असे वाटते की, आई झाल्यावर तुम्ही आधीेपेक्षा मजबूत होतात आणि अधिक जबाबदारीने काम करतात. कारण आई झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांसाठी काम करत असता. मी खूप मजबूत आहे. त्यामुळे जे आहे ते समोर ठेवा.”

चाहतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, पुन्हा एकदा लग्न झालेल्या किंवा आई झालेल्या अभिनेत्रींच्या कामाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका मोठ्या न्यूज वेबसाईटने जेव्हा चाहतला तिच्या या व्हायरल झालेल्या पोस्टबद्दल आणि तिच्या एकूण अनुभवाबद्दल विचारले, तेव्हा तिने मनमोकळे उत्तर दिले. ती म्हणाली, “जेव्हा लग्न झालेल्या अभिनेत्रीची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा निर्माते दोनदा विचार करतात. मी तर जोहर आणि अमायरा या दोन मुलींची आई आहे. मी दुप्पट मेहनत करण्यास तयार आहे. परंतु मला कोणतीही ऑफर मिळत नाही. जेव्हा मी ऑडिशन देते, तेव्हा मला सरळ नाकारले जाते. नकार देण्याचे कारण म्हणजे त्यांना असे वाटते की, मला दोन मुली असल्याने मी काम करू शकणार नाही.”

लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरबद्दल बोलताना चाहत म्हणाली, “आई झालेल्या अभिनेत्री मुख्य भूमिकेसाठी योग्य नसतात असेच मेकर्सला वाटत असते. जेव्हा मी माझ्या मुलींबरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर करते, तेव्हा अनेक लोकं मला सांगतात की, मी असे फोटो टाकायला नको. त्यांना वाटते की मी माझ्या मुलींसोबत फोटो शेअर केले, तर निर्माते मला कोणत्याही प्रोजेक्टसाठी विचारणार नाहीत. पण मी मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, कारण मला वाटते की मी एक आई आहे आणि मला ते दडवून ठेवण्याची गरज भासत नाही. आज कालची कास्टिंग ही इंस्टाग्राम प्रोफाईलवरून होते. मला असे वाटते की एखाद्या कलाकाराला त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईवरून नाही, तर त्याच्या योग्यतेनुसार आणि क्षमतेवरून काम मिळायला पाहिजे.”

चाहत पुढे म्हणते, “अनेक विवाहित किंवा आई झालेल्या अभिनेत्रींना काम मिळते मग मलाच का नाही. यांबद्दल मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांचा गैरसमज झाला आहे. बर्‍याच लोकांना असे वाटते की, मी उद्योजक झाल्यापासून माझ्याकडे खूप पैसा आहे. हे देखील खरे आहे की, आपण वास्तविक जीवनात सोशल मीडियावर जे दिसतो ते आपण नाही आहोत. तुम्ही जे पाहता ते खरे नाही. कोरोनाचा माझ्या व्यवसायावरही मोठा दुष्परिणाम झाला आहे. मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागत असल्याने मला चांगल काम मिळाव अशी अपेक्षा आहे.”

चाहतने ‘थँक यू’ या चित्रपटात काम केले आहे. यामध्ये सुपरस्टार अक्षय कुमार आणि दिवंगत अभिनेता इरफान खान यांची मुख्य भूमिका होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार

-अनिल कपूरच्या ‘वो सात दिन’ चित्रपटाला ३८ वर्षे पूर्ण; मुख्य अभिनेता म्हणून ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती


Leave A Reply

Your email address will not be published.