सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाचा बोलबाला आहे. आणि देशाच्या सर्वच मनोरंजनजगात एकाच सिनेमाची आणि त्याच्या कमाईची चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे केदार शिंदेचा तुफान गाजणारा ‘बाईपण भारी देवा’ बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या या सिनेमाचे विशेष कौतुक होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सिनेमात सहा अभिनेत्री असून, कोणताही मोठा अभिनेता नाही. या सहा अभिनेत्रींनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असून, सिनेमाला आभाळाएवढे मोठे यश मिळवून दिले आहे. या सिनेमासमोर बॉलिवूडच्या हिंदी सिनेमांनी देखील नांगी टाकली.
View this post on Instagram
नुकतीच या सिनेमाच्या यशाची जंगी पार्टी झाली. यावेळी सिनेमाच्या टीमने त्यांचे मनोगत व्यक्त केले. तेव्हा सिनेमात झळकणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितले की, त्यांनी बॉलिवूड सुपरस्टारला देखील मागे टाकले आहे. त्या म्हणाल्या, “बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी चित्रपटाबद्दल भाष्य केले. यावेळी वंदना गुप्ते म्हणाल्या, “बाईपण भारी देवा चित्रपटाला महिला वर्गाचा मिळणारा प्रतिसाद खूपच उत्तम आहे. त्यांचा उत्साह पाहून जाम भारी वाटते. त्या खूप उत्साहाने हा चित्रपट पाहायला जात आहेत. सिनेमा बघताना त्यांचे ओरडणे पाहून उत्साह द्विगुणित होत आहे. आम्हाला आता वाटत आहे की, आम्ही सुपरस्टार झालो असून, अगदी शाहरुख आणि सलामान खानला देखील आम्ही मागे टाकले आहे.”
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. यासोबतच सिनेमात अनेक कलाकार विविध छोट्या छोट्या सरप्राईज भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाने ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. सिनेमाने वेड सिनेमाचे अनेक रेकॉर्ड तोडले आहे.