Thursday, April 18, 2024

नियतीचा खेळ! दिडशे चित्रपटांत हिरो झालेल्या सुपरस्टारवर आली होती ‘टॉयलेट’ साफ करायची वेळ

जेष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनी आजपर्यंत अनेक सुंदर सिनेमे भारतीय चित्रपट सृष्टीला दिले आहेत. ते जरी आता हयात नसले तरी त्यांच्या सिनेमांच्या माध्यमातून ते आजही चाहत्यांच्या हृदयात मानाचं स्थान टिकवून आहेत. भारतातील टॉप अभिनेत्यांमध्ये ज्यांचे अभिमानाने नाव घेतले जाते त्या विनोद खन्नांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६मध्ये पाकिस्तानच्या पेशावर शहरात झाला. तेव्हा तो प्रदेश भारताताच भाग होता. आज याच विनोद खन्नांशी संबंधित काही खास गोष्टी आपल्याला आम्ही सांगणार आहोत.

विनोद खन्नांच्या वडिलांचा कपडे आणि केमिकलचा बिझनेस होता. परंतू भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावर त्यांचे वडील पेशावरवरुन मुंबई शहरात आले व येथेच स्थायिक झाले. त्यामुळे विनोद खन्नांचे शिक्षण मुंबईतील सेंट मेरीज स्कूलमध्ये झाले. परंतू त्यानंतर खन्ना जेव्हा ११ वर्षांचे झाले तेव्हा त्यांचा परिवार मुंबईहून दिल्ली येथे आला. त्यामुळे राहिलेले शिक्षण त्यांना दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये पुर्ण करावे लागले. परंतू त्यानंतर ३ वर्षांनीच त्यांचा परिवार पुन्हा मुंबईत आला. त्यामुळे सीडेनहम महाविद्यालयात त्यांनी कॉमर्सचे शिक्षण घेतले.

महाविद्यालयीन जिवनातच त्यांनी थेटरमध्ये काम करायला सुरुवात केली. याच महाविद्यालयात त्यांची ओळख गितांजली नावाच्या मुलीशी झाली. पुढे त्यांनी याच मुलीशी लग्न केले. तीच खन्ना यांची पहिली पत्नी. त्यांनी २२व्या वर्षी मन की मीत या सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमात ते व्हिलनच्या भूमिकेत दिसले तर या सिनेमाचे हिरो होते सुनील दत्त.

विनोद खन्ना यांना चित्रपटात यश मिळू लागल्यावर त्यांनी गितांजलीशी विवाह केला. पुढे त्यांना राहुल खन्ना व अक्षय खन्ना ही दोन मुले झाली. यशाची एक एक पायरी चढत असलेल्या खन्नांनी जवळपास १५० चित्रपटांत काम केले. ज्या वेळी अभिताभ बच्चन बॉलीवूडमध्ये जबरदस्त कामगिरी करत होते तेव्हा त्यांना तोड देणारा एकमेव अभिनेता म्हणजे विनोद खन्ना होते. शशी कपूर यांच्यानंतर ते असे एकमेव अभिनेता होते, जे रविवारी कधीही शुटिंगला जात नसे. ते रविवारी सुट्टी घेत असे. ते एक सुखवस्तू जीवन जगत होते. तरीही त्यांच्या जिवनात अशा काही गोष्टी होत्या ज्यामुळे त्यांना काहीतरी कमी आहे असे वाटत असे.

विनोद खन्ना यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी आपले अलिशान घर सोडले व सर्व गोष्टींमधून संन्यास घेतला. त्यांनी पुढे एकदा सांगितले होते की त्यांच्याकडे सगळे होते तरी काही गोष्टींची त्यांच्याकडे कमरता होती. त्यांना ते अधुरे असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे संन्यास घेतल्यावर ते थेट अमेरिकेत ओशोच्या आश्रमात गेले. तेथे ते ५ वर्ष राहिले. येथे ते माळी झाले व गार्डनची काळजी घेतली. तसेच वेळ पडले तेव्हा टॉयलेटही साफ केले.

त्यानंतर ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांची पत्नी गितांजलीने त्यांना सोडचिट्टी दिली. त्यानंतर १९९०मध्ये खन्नांनी दुसरे लग्न केले. कविता दफ्तारी असे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून मुलगा साक्षी व मुलगी श्रद्धा अशी दोन अपत्य झाली.

१९९७मध्ये खन्नांनी पंजाबमधील गुरुदासपूरमधून लोकसभेत पाऊल ठेवले. १९९९मध्ये याच मतदार संघातून ते पुन्हा लोकसभेवर गेले. त्यानंतर ते केंद्रिय मंत्रीही झाले. २००४मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून ते लोकसभेत गेले. परंतू २००९मध्ये त्यांना येथे पराभव पाहावा लागला. २०१४मधून ते पुन्हा लोकसभेवर गेले. आजपर्यंत कोणताही बॉलीवूड अभिनेता ४ वेळा लोकसभेत निवडून गेलेला नाही. आजही हा विक्रम विनोद खन्नांच्या नावावर आहे. १९९९मध्ये त्यांना फिल्मफेअर लाईट टाईम अचिवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २७ एप्रिल २०१७ रोजी या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. मृत्यूपश्चात त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे देखील वाचा