भारतीय संघाच्या ‘दादा’ला वेड लावणारी नगमा, जिच्यावर फिदा होते ४ सुपरस्टार


मंडळी, आपल्याला ठाऊक आहेच की भारतीय सिनेसृष्टी आणि राजकारण हे एकमेकांपासून अजिबात दूर नाही आहेत. अनेक कलाकार हे रुपेरी पडदा गाजवल्यावर राजकारणात पाऊल टाकतात. काही जण मग पुढे राजकारणातच काम करतात तर काही जण पुन्हा सिनेसृष्टीकडे वळतात. तर काही या दोन्ही ठिकाणी एकत्रच काम करतात. असे अनेक कलाकार आहेत परंतु आज आपण अशा कलाकाराबद्दल बोलणार आहोत जीचा जीवनप्रवास हा वेगवेगळ्या वळणांवरून जातो. जिने एक अभिनेत्री म्हणून करियरची सुरुवात केली मात्र ती आता राजकारणात तिची नवी इनिंग एंजॉय करतेय. त्या कलाकाराचं नाव आहे अभिनेत्री नगमा! आजच तिच्याविषयी बोलण्याचं मुख्य कारण म्हणजे आज नगमांचा ४६वा वाढदिवस आहे. चला तर मग नगमाच्या या आयुष्यावर एक हलकासा प्रकाश टाकूयात.

नगमाचा जन्मच विचित्र परिस्थितीमध्ये झाला. नगमाचा जन्म २५ डिसेंबर, १९७४ मध्ये मुंबईत झाला. परंतु विचित्र परिस्थिती अशी की नगमाच्या जन्माच्या काही महिने आधीच तिचे जन्मदाते आई वडील हे एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांनी घटस्फोट घेतला. जन्माच्या वेळी नगमाचं नाव हे नंदिता अरविंद मोरारजी हे होतं.

नगमा पुढे तिच्या आई सोबत राहू लागली. पुढील काही काळात तिची आई शमा काझी यांनी चंदर सदनाह जे एक चित्रपट निर्माते होते, त्यांच्याशी दुसरा विवाह केला. चंदर यांच्यापासून शमा याना दोन मुली झाल्या ज्योतिका आणि रोशनी! ज्या आजघडीला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्री आहेत. यानंतर तिचे जन्मदाते वडील यांनीही पुन्हा विवाह केला आणि तिला आणखीन दोन सावत्र भाऊ झाले धनराज आणि युवराज! तर अशापद्धतीने आपल्या आईवडिलांच्या निर्णयांच्या गर्तेत फसलेली ही मुलगी पुढे यशस्वी अभिनेत्री कशी झाली हे पाहुयात!

Nagma
Nagma

१९९० मध्ये आपल्या आईच्या म्हणण्यानुसार नगमा अभिनयाकडे वळाली. तिने १९९० साली सलमान खान सोबत बाघी या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत काम केलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला आणि नगमा ही रातोरात स्टार झाली. आपल्याला सांगायला आवडेल की हे यश अनुभवत असताना नगमा ही केवळ १५ वर्षांची होती.

यानंतर नागमाने मागे वळून पाहिलंच नाही. पुढच्याच वर्षी तिने पेडिन्टी अल्लुडू आणि किलर या दोन तेलगू चित्रपटांसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सन १९९२ मध्ये नगमा तब्बल सहा चित्रपटांमधून झळकली होती, त्यापैकी चार चित्रपट हिंदी होते, तर दोन तेलगू होते. १९९३ मध्ये नगमाने शाहरुख खान, जॅकी श्रॉफ आणि अनु अग्रवाल यांच्यासह किंग अंकल या विनोदी चित्रपटात काम केलं. राकेश रोशन दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही.

१९९४ हे नगमासाठी अत्यंत यशस्वी वर्ष ठरलं कारण तिने कथलन या तमिळ सिनेमासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. त्याच वर्षी तिने सुहाग या हिंदी सिनेमात करिश्मा कपूर, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्यासह मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक हा चित्रपट ठरला होता.

यानंतर तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन, चिरंजीवी, महेश बाबू, प्रभू देवा यांच्यासोबत काम केलं. यानंतर नगमा भोजपुरी सिनेमाकडे वळाली. तिथे सुद्धा तिने रवी किशन, अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या सोबत स्क्रीन शेअर केली आणि अनेक चित्रपट हिट देखील दिले. तिला दुल्हा मिलाई दिलदार या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. यानंतर तिने बंगाली आणि पंजाबी सिनेमांमध्येही काम केलं. सोबतच २००७ मध्ये तिने थांब लक्ष्मी थांब हा एकमेव मराठी चित्रपट देखील केला.

Nagma Saurav Ganguly
Nagma Saurav Ganguly

नगमाचे नाव तेव्हाचा भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीबरोबरही जोडले गेले होते. २००१मध्ये त्या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या मोठ्या चर्चा होत्या. गांगुलीने तेव्हा आंध्रप्रदेशात नगमाबरोबर लग्न केल्याची वृत्तही माध्यमांनी दिली होती. परंतू या वृत्ताचे तेव्हा दोघांनीही खंडन केले होते. जेव्हा जेव्हा भारतीय संघ पराभूत व्हायचा तेव्हा तेव्हा त्यावेळी याचे खापर नगमावर फोडले जायचे. शरथ कुमार, रवी किशन व मनोज तिवारींबरोबरही नगमाचे नाव पुढे जोडले गेले.

यशस्वी चित्रपट कारकीर्द अनुभवणाऱ्या नगमाची राजकीय कारकीर्द काही तितकी खास राहिली नाही. तिला २००४ मध्ये हैदराबाद येथून सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आली होती परंतु ही ऑफर नाकारून नगमाने राजीव गांधी यांच्याविषयी असलेल्या आदरापोटी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आणि २००४ मध्ये आंध्रप्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेससाठी राजकीय स्टार प्रचारक झाली.

यानंतर २०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांमध्ये नगमाने मेरठ मतदारसंघातून निवडणूक लढवली खरी परंतु तिला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ती अखिल भारतीय महिला काँग्रेसची महासचिव म्हणून काम पाहत आहे. सध्या नगमाचे वय ५० वर्ष आहे. चित्रपटांप्रमाणेच तिची राजकीय कारकीर्ददेखील यशस्वी ठरणार का हे येत्या काळात आपल्याला दिसेलच. तोवर दैनिक बोंबाबोंब तर्फे नगमा मोरारजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


Leave A Reply

Your email address will not be published.