हुमा कुरेशी (Huma Queresi) तिच्या आगामी ‘बेबी डू डाय डू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटातील ‘इश्क के…’ हे गाणे प्रदर्शित केले आहे. हे गाणे मूळतः २००२ साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘शक्ती: द पॉवर ऑफ ड्रीम्स’ या चित्रपटात होते. यात किरकोळ बदल करून ते पुन्हा प्रदर्शित करण्यात आले आहे.
हुमा कुरेशीने इन्स्टाग्रामवर गाण्याची एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये नवीन व्हिज्युअल्स आणि अप्रतिम कोरिओग्राफी आहे. यात हुमा कुरेशी आणि रचित सिंग दिसतात. हुमाने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, “दिल्लीची मुले म्हणून, आम्ही ९० च्या दशकातील या गाण्यांवर नाचत मोठे झालो. विश्वासच बसत नाही की मला ती गाणी पुन्हा सादर करण्याची संधी मिळाली. शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय, आमचं तुमच्यावर प्रेम आहे.”
या आयकॉनिक गाण्याच्या पुनर्निर्मितीबद्दल बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “जेव्हा हे गाणे आमच्याकडे आले, तेव्हा आम्ही त्याची पुनर्निर्मिती करण्यासाठी खूप उत्सुक होतो. ‘इश्क की…’ हे एक खूप छान गाणे आहे; जवळपास प्रत्येकाने त्यावर नृत्य केले आहे. यासोबत एक मोठी जबाबदारी येते. मी खूप घाबरले होते. आम्ही मूळ गाण्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करत नव्हतो. आम्हाला त्यात आमचा स्वतःचा ट्विस्ट आणायचा होता आणि ज्या गोष्टींमुळे ते इतके प्रसिद्ध झाले, त्या गोष्टींचा उत्सव साजरा करायचा होता. रेमो सरांनी आमच्यासाठी नृत्यदिग्दर्शन केल्यामुळे ते आणखीच खास बनले. मला आशा आहे की, हे गाणे बनवताना आम्हाला जेवढी मजा आली, तेवढीच मजा लोकांना ते पाहताना येईल.”
“बेबी डू डाय डू” चे दिग्दर्शन नचिकेत सामंता यांनी केले आहे. या चित्रपटात सिकंदर खेर, चंकी पांडे, रचित सिंग, मरुधा शेखावत, विद्या मालवदे, अरुण कुशवाहा आणि हिमांशू मलिक यांच्याही भूमिका आहेत. याची निर्मिती साकिब सलीम यांनी ‘सलीम सिब्लिंग्स’ बॅनरखाली ‘पुणे ०४ फिल्म्स’च्या सहकार्याने केली आहे. हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अक्षय कुमार अभिनित ‘हैवान’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर










