कन्नड चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार यश हा आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. यशचा जन्म ८ जानेवारी १९८६ मध्ये कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. यशचे वडील कर्नाटक राज्य रोडवेज परिवहन महामंडळात आजही चालक म्हणून नोकरी करत आहे. या क्षेत्रात आल्यावर यशला सफलता मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
या क्षेत्रात आणि त्याच्या फॅन्समध्ये यश या नावाने ओळखला जाणाऱ्या यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा असे आहे. यशने त्याचे संपूर्ण शिक्षण म्हैसूर येथून पूर्ण केले. त्यानंतर त्याने सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी थेट बंगळुरू गाठले. बंगळुरूमध्ये आल्यानंतर यशने प्रसिद्ध नाटककार बिवी कर्नाथ यांच्यासोबत नाटकं करण्यास सुरुवात केली.
यशाने काही काळ टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले. त्याने प्रसिद्ध मालिका नंदा गोकुळामध्ये काम केले. मग त्याने चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी प्रयत्न सुरु केला. अखेर २००७ साली त्याला पहिला कन्नड सिनेमा जम्बाडा हुडुगी मिळाला. या सिनेमात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान यशची ओळख अभिनेत्री राधिका पंडित हिच्याशी झाली. त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही काळाने म्हणजेच २०१६ मध्ये यश आणि राधिकाने लग्न केले. आज या दोघांना दोन मुलं आहेत. यश आणि राधिकाने मिळून योशो मार्ग नावाची एक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी चार कोटी रुपयांची गुंतवणूक करत कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील तलावांची बांधणी केली.
यशने राजाधानी, मिस्टर अँड मिसेज रामाचारी, किराटका, जानू, ड्रामा, मास्टरपीस आदी हिट चित्रपटांमध्ये काम केले. यशने त्याच्या १२ वर्षाच्या कारकिर्दीत १८ हुन अधिक सिनेमे केले असून आज तो साऊथच्या टॉप अभिनेत्यांमध्ये गणला जातो. केजीफ हा सिनेमा यशसाठी त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलावणारा ठरला. या सिनेमाने यशला प्रचंड लोकप्रियता दिली. या सिनेमाच्या यशामुळे यशने त्याचे मानधन देखील वाढवले आहे. आता लवकरच यशाचा बहूप्रतिक्षीत आणि बहूचर्चित केजीफ २ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अनेक बड्या कलाकारांचे दर्शन होणार आहे.










