बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सचे नाते काही नवीन नाही. भारतात बॉलिवूडसारखे लोकप्रिय जर काही असेल तर ते क्रिकेट आहे. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांमधील किस्से नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूड आणि क्रिकेट जगतात अशी अनेक जोडपी होती, ज्यांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली. यापैकी काही जोडप्यांना त्यांचे प्रेम मिळाले आणि त्यांनी लग्न केले. जसे की, शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी, झहीर खान आणि सागरिका घाटगे, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. हे झाले भारतीय क्रिकेटर्स, पण काही पाकिस्तानी क्रिकेटर्सही बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे झाले होते. परंतु त्यांचे प्रेम कधीच फळाला आलेच नाही. काहींमध्ये फक्त प्रेमाच्या कहाण्या होत्या, काही जोडप्यांमध्ये प्रेमही होते, पण ही जोडपी कधीच एकमेकांची होऊ शकली नाहीत आणि त्यांच्या प्रेमाची कहाणी अपूर्णच राहिली. चला या लेखातून जाणून घेऊया, बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे झालेल्या पाकिस्तानी क्रिकेटर्सबद्दल.
रेखा आणि इम्रान खान
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा (Rekha) यांचे आयुष्य नेहमीच वादांच्या भोवऱ्यात असते. त्यांच्या जीवनातील अनेक कथा चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांचे नाव नेहमीच अमिताभ बच्चन यांच्यासोबत जोडले जात असले, तरी एक काळ असा होता की, रेखा यांचे नाव पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्यासोबतही जोडले जात होते. त्यांच्यात प्रेमही असल्याचे सांगितले जाते. इम्रान यांचे रेखांवर खूप प्रेम होते, पण त्यांना कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करायचे नव्हते. त्यामुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. इम्रान खान हे सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.
तमन्ना भाटिया आणि अब्दुल रज्जाक
हिंदी आणि साऊथ सिनेमात झळकलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) हिचं नाव पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाकशी जोडले गेले होते. त्यांच्या अफेअरची चर्चा तेव्हा सुरू झाली, जेव्हा ते एका ज्वेलरी शॉपमध्ये एकत्र दिसले होते. ही गोष्ट २०१७ सालची आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले असून त्यांना लग्न करायचे असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. खुद्द अब्दुलनेच मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की, तमन्ना आणि त्याच्यात चांगले संबंध आहेत आणि ते लवकरच लग्न करणार आहेत, पण त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. विशेष म्हणजे अब्दुल रज्जाकशी लग्न होण्यापूर्वी तमन्नाचं नाव भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशीही जोडलं गेलं होतं. तमन्नानं ‘बाहुबली’ या ऑल टाईम ब्लॉकबस्टर या सिनेमात काम केलंय.
सुष्मिता सेन आणि वसीम अक्रम
सन १९९४मध्ये भारतासाठी पहिल्यांदा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हीदेखील या यादीत सामील आहे. तिचं नाव पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत जोडलं गेलं होतं… त्यांची भेट २००८ साली एका डान्स रिऍलिटी शोदरम्यान झाली होती. दोघेही त्या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत होते. शोदरम्यानच दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. वसीमची पहिली पत्नी हुमा मुफ्तीचे २००९ मध्ये निधन झाल्यानंतर सुष्मितासोबत त्याच्या नात्याची सुरुवात झाली. त्यांचं नातं इतकं पुढं गेलं होतं की, त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या आणि लग्नाच्या बातम्याही त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या, पण मध्येच माशी शिंकली. अशा बातम्या येऊ लागल्या होत्या की, वसीमच्या संशयास्पद स्वभावामुळे त्यांचे नाते बिघडले. यामुळेच वसीम अक्रम आणि सुष्मिता सेन यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर वसीमने ऑस्ट्रेलियन सोशल वर्कर शनैरासोबत संसार थाटला
सोनाली बेंद्रे आणि शोएब अख्तर
अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिच्या सौंदर्याचे कोट्यवधी चाहते आहेत. यातील एक मोठा चाहता होता खुद्द पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर. शोएबने त्याच्या एका मुलाखतीत सोनालीबद्दल बोलताना आपल्या मनातील गोष्ट सांगितली होती. त्याला सोनाली इतकी आवडली होती की, तो तिला किडनॅप करण्यासही तयार होता. याच मुलाखतीत त्याने सोनाली आणि त्याच्या पहिल्या भेटीबद्दलही सांगितले होते. तो म्हणाला होता की, भारत दौऱ्यावर आलो, तेव्हा सोनालीला भेटलो होतो. तिला पाहून शोएब एकदम फिदाच झाला होता. पण तिला भेटण्याआधी त्याने सोनालीच्या ‘इंग्लिश बाबू देसी मेम’ या सिनेमात शोएबने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. तो सोनालीच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, तो पाकिटात सोनालीचा फोटोही ठेवायचा. शोएब त्याच्या एकतर्फी प्रेमाबद्दल खूप गंभीर होता. शोएबने एकदा गंमतीत असेही म्हटले होते की, जर सोनालीने त्याचा प्रस्ताव नाकारला तर तो तिचे अपहरण करेल. पण नंतर सोनालीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती शोएब अख्तर नावाच्या कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटरला ओळखत नाही. तसेच तिला क्रिकेटबद्दल काही माहिती नाही. पण तिला शोएबबद्दल सांगितल्यानंतर तिने सोशल मीडियामार्फत शोएबला धन्यवाद दिला होता. पुढे शोएबने आपल्यापेक्षा १० वर्षाहून लहान पाकिस्तानी मुलीसोबत लग्न केलं.
तर हे होते पाकिस्तानी क्रिकेटर्स ज्यांचं बॉलिवूड अभिनेत्रीवर जीवापाड प्रेम होतं, पण त्यांना त्यांचं प्रेम मिळालंच नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कशी नशिबाने थट्टा मांडली! आलिशान आयुष्य सोडून कलाकार भिकाऱ्याच्या रूपात झाले पब्लिक प्लेसमध्ये स्पॉट
साधीसुधी नव्हती बॉलिवूडमधली ‘ही’ भांडणं, सलमान आणि शाहरुखने खणाखण वाजवलेली कानाखाली
बंदी घातलेल्या ‘या’ जाहिरातींमध्ये मांडला होता अश्लीलतेचा बाजार, अरबाज अन् मलायकाच्या ऍडचाही समावेश