जेव्हा करण आणि अर्जुनवर बरसला होता आमिर; म्हणाला होता, ‘तुम्ही जे केले त्याबद्दल मला…’


मनोरंजन क्षेत्र नेहमी मनोरंजनासोबतच आपल्या समाजाला आणि खासकरून तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देखील ओळखले जाते. आपल्या देशात कलाकारांना तरुण- तरुणी आपले आदर्श मानतात, आणि त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी कलाकारांची देखील जबाबदारी असते की, त्यांनी विचारपूर्वक आणि समजदारपणे समाजासमोर वागावे, बोलावे. मात्र, कलाकरांकडून अनेकदा अशा काही चुका होतात ज्यांमुळे त्यांना खाली मान घालावी लागते. मजामस्ती करताना कलाकार त्यांची मर्यादा विसरतात आणि मस्करीची कुस्करी होऊन जाते.

असेच २०१५ साली ‘एआयबी नॉकआउट’ (AIB Knockout) कार्यक्रमानंतर कलाकारांची मान शरमेने खाली जाईल इतकी चुकीची वागणूक त्यांच्याकडून घडली होती. या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या सर्वच कलाकारांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले गेले होते. याच प्रकरणावरून बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने देखील करण जोहर आणि अर्जुन कपूर यांना चांगली समज दिली होती.

आमिरने त्यांना समज देताना म्हटले होते की, “मी तुम्हाला हिंसा दाखवण्यात बिल्कुल रस ठेवत नाही. या कार्यक्रमाला अनेक तरुणांनी आवडीने पाहिले. मात्र, माझ्या मते हा एक हिंसक शो होता. मी माझे मित्र असलेल्या करण आणि अर्जुन यांना सांगितले की, मी तुमच्या कामावर अजिबात प्रभावित नाहीये. मी असा व्यक्ती नाहीये जो शिव्या आणि अभद्र भाषेच्या वापरावर हसेल. मी माझे ते वय पार केले आहे, ज्या वयात मी अशा गोष्टीवर हसलो असतो किंवा प्रभावित झालो असतो. तुम्ही जे केले त्याबद्दल मला वैयक्तिकरीत्या खूप आक्षेप आहे. मी शो पहिला देखील नाही, कारण मला जाणवले की हा शो माझ्या टाईपचा नाहीये.”

पुढे आमिर म्हणाला, “मी अजूनपर्यंत रोस्ट पाहिले नाहीये, पण मी त्याबद्दल भरपूर नक्कीच ऐकले आहे. शिवाय मी त्याच्या काही क्लिप्स देखील पाहिल्या. त्या क्लिप्स पाहून मला खूप वाईट वाटले. मी नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मात्र, आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या समजायला पाहिजे. जेव्हा माझ्या या शोमध्ये काय म्हणून उल्लेख केला गेला, तेव्हा मला ते खूपच हिंसक वाटले. हिंसा फक्त शारीरिक नसते, तर ती शाब्दिक देखील असू शकते. जेव्हा तुम्ही एखाद्याचा अपमान करता, तेव्हा ती एकप्रकारची हिंसाच ठरते. जेव्हा तुम्ही एखाद्याला शिव्या देतात, तेव्हा तुम्ही जगाला किती हिंसक आहेत, हेच दाखवत असतात.”

आमिर त्याच्या देल्ही बेली सिनेमाबद्दल म्हणाला, “मी देल्ही बेली हा सिनेमा बनवला ज्याला अप्रमाणपत्र मिळाले, तेव्हा मी सर्वाना सांगितले की हा एक ऍडल्ट सिनेमा आहे, यात अनेक शिव्या आणि अभद्र शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे आवडत नसेल तर पाहू नका.”

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तो लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमात करीना कपूरसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.