Friday, March 29, 2024

यशस्वी नेता अन् अभिनेता झाल्यानंतर, अमोल कोल्हेंची नव्या क्षेत्रात दमदार एंट्री; अनुभवही केला शेअर

दमदार अभिनेते ते मुसद्दी नेते असा यशस्वी प्रवास करणारे अमोल कोल्हे (Amol Kolhe) मराठी चित्रपट जगतातील एक आघाडीचे अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या आव्हानात्मक भूमिका आणि अभिनय प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतो. मात्र आता राजकारण आणि अभिनय सोडून अमोल कोल्हे यांनी नव्या क्षेत्रात पदार्पण केले की काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कोणते आहे अमोल कोल्हे यांचे नवीन क्षेत्र, चला जाणून घेऊ. 

प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे सध्या एका वेगळ्याच कारणासाठी सगळीकडे चर्चेत आहेत. आणि या फक्त चर्चाच नाही तर अमोल कोल्हे आता नव्या क्षेत्रात काम करणार की काय, अशीही चर्चा रंंगली आहे. ही चर्चा सुरू व्हायला कारण म्हणजे नुकताच अमोल कोल्हे यांनी ‘बाहुबली’ चित्रपटाच्या मराठी व्हर्जनच्या डबिंगसाठी त्यांचा आवाज दिला आहे. त्यामुळे आता राजकारण आणि अभिनयसोडून ते या नव्या क्षेत्रात जाणार की काय, अशी चर्चा रंगली आहे. मात्र या सगळ्या चर्चांना पुर्णविराम देत अमोल कोल्हे यांनी याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

याबद्दल बोलताना ते म्हणतात की, “हे काम करताना मला प्रचंड आनंद झाला. तसेच अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. हा सगळा अनुभव माझ्यासाठी नवीन होता कारण याआधी अभिनय करण्याव्यतिरिक्त काही शिकलो नव्हतो. त्यामुळे हा अनुभव भन्नाट होता. तसेच प्रत्येकाने नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे,” असेही ते यावेळी म्हणाले. ही संधी दिल्याबद्दल त्यांनी प्रविण तरडे यांचे आभारही मानले. या चित्रपटातून त्यांनी डबिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली’ चित्रपट आता लवकरच मराठीत अनुभवायला मिळणार आहे. या मराठी ‘बाहुबली; चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले आहे. यामध्ये अमोल कोल्हे यांनी प्रभासच्या आवाजाचे डबिंग केले आहे.

अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. सध्या अमोल कोल्हे शिरुर मतदार संघाचे खासदारही आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा