Monday, October 2, 2023

अक्षय कुमार ते खिलाडी नंबर वन, कोणतीही पार्श्वभूमी नसताना असा केला अक्षयने ३० वर्षांचा फिल्मीस्तानातील प्रवास

बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमार (Akshay kumar) ओळखला जातो. त्याने त्याच्या ऍक्शनने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. या क्षेत्रात त्याला कोणताही पाठिंबा आणि ओळख नसतानाही त्याने फक्त आणि फक्त मेहनतीच्या जोरावर आज बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये जागा मिळवली. आज अक्षय सर्वात जास्त मानधन घेणारा आणि सर्वात जास्त टॅक्स भरणारा अभिनेता म्हणून देखील ओळखला जातो.अशातच आज ९ सप्टेंबर रोजी अक्षय कुमार त्याचा वाढदिवस साजरा करत आहे, जाणून घेऊया काही खास गोष्टी….  

१९९१ साली २५ जानेवारीला अक्षयचा पहिला चित्रपट ‘सौगंध’ प्रदर्शित झाला होता. आज या सिनेमाला प्रदर्शित होऊन आणि अक्षयला चित्रपटसृष्टीत येऊन ३० वर्ष पूर्ण झाले आहेत. या ३० वर्षात अक्षयने अक्षय कुमार पासून खिलाडी कुमार पर्यंतचा अनेक चढ उतारांनी भरलेला प्रवास पार केला. कामाच्या शोधात दिल्लीतून मुंबईत आलेल्या अक्षयने मुंबईत मार्शल आर्ट्सचे क्लासेस चालू केले. त्याच्या क्लास मधल्या एका विद्यार्थ्यांच्या वडिलांनी त्याला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. अक्षयने पैशासाठी मॉडेलिंग केले आणि त्याला दोन तासाचे ५ हजार रुपये मिळाले. एवढे पैसे तो एका महिन्यात कमवायचा. त्यामुळे साहजिकच त्याचा ओढा या क्षेत्राकडे वाढला आणि त्याने अनेक मॉडेलिंगच्या असाइनमेंट केल्या. अशातच त्याला चित्रपटासाठी विचारणा झाली, आणि अक्षयने या संधीचा स्वीकार केला.

जेव्हा अक्षय कुमारने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला, तेव्हा शाहरुख़ ख़ान, सलमान ख़ान, आमिर ख़ान, अजय देवगन ह्या कलाकारांच्या करियरची सुरुवात झाली होती. असे असूनही उंच आणि देखण्या अक्षय कुमारने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला ऍक्शन रोमँटिक सिनेमे करणारा अक्षय त्याकाळी ऍक्शन हिरो म्हणूनच ओळखला जावू लागला. अक्षयचा पहिला सिनेमा ‘सौगंध’ राज सिप्पी यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमातून अक्षय आणि अक्षयची सिनेमातील अभिनेत्री शांतीप्रिया यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हा सिनेमा एक ऍक्शन रोमँटिक सिनेमा होता. मात्र ह्या चित्रपटाला पाहिजे तसे यश मिळाले नाही.

त्यानंतर अक्षयला खरे यश मिळाले ते १९९२ साली आलेल्या ‘खिलाडी’ चित्रपटाने. या सिनेमानंतर पुन्हा त्याला अपयश पाहावे लागले. त्याच्यासाठी सर्वात चांगले साल होते १९९४. ह्यावर्षी अक्षयचे मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मोहरा या ऍक्शन सिनेमांसोबतच ये दिल्लगी या सिनेमातून तो एक रोमँटिक हिरो म्हणून पडद्यावर दिसला. अक्षयने त्याच्या करियरमध्ये खलनायकी भूमिका देखील गाजवल्या आहेत.

१९९२ साली आलेल्या अब्बास-मस्तान यांच्या खिलाडी या सस्पेंस-थ्रिलर सुपरहिट चित्रपटानंतर त्याला खिलाडी नाव देण्यात आले. पुढे जाऊन अनेक निर्माता दिग्दर्शकांनी अक्षयसोबत खिलाडी नावाने अनेक सिनेमे केले. या खिलाडी सिरीजचे सर्व चित्रपट हे कॉमेडी ऍक्शन प्रकारचे होते. या सिरीजचा शेवटचा सिनेमा २०१२ ला आलेला खिलाडी ७८६ हा होता. आतापर्यंत अक्षयने अक्षय आणि सुपरहिट सिनेमा असे समीकरण सेट केले होते. काही काळाने अक्षयने पूर्णतः विनोदी सिनेमाकडे लक्ष केंद्रित केले. अक्षयने प्रियदर्शन या दिग्दर्शकासोबत त्याच्या जवळपास सर्वच विनोदी सिनेमांमध्ये काम केले. प्रियदर्शन आणि अक्षयचा पहिला सिनेमा होता ‘हेरा फेरी’ हा सिनेमा आजही सुपरहिट आहे.

असे सिनेमे करत असतानाच अक्षयने अनेक सामाजिक चित्रपटांमध्ये देखील काम केले. जसा काळ पुढे गेला तसे अक्षयने स्वतःला एक दमदार आणि प्रभावी अभिनेता म्हणून या क्षेत्रात सिद्ध केले. अक्षयने कालानुरूप त्याच्या चित्रपट निवडीमध्ये देखील अनेक बदल केले. मागील काही वर्षांमध्ये त्याने अनेक चांगल्या सामाजिक आणि देशभक्तीवर आधारित चित्रपटात काम केले. ज्यात पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेम कथा, केसरी, एअरलिफ्ट, गोल्ड, लक्ष्मी, मिशन मंगल अशा हिट सिनेमांचा समावेश आहे.

बॉक्स ऑफिसचा खरा राजा म्हणून अक्षय ओळखला जातो. त्याची बॉक्स ऑफिसवरील पकड किती आहे हे त्याच्या सिनेमांच्या कलेक्शनवरून वेळोवेळी समजून येते. अक्षयच्या आतापर्यंत ११ चित्रपटांनी १०० करोड क्लबमध्ये प्रवेश केला आहे. हाऊसफुल २ हा अक्षयचा पहिला सिनेमा होता जो १०० करोड क्लबमध्ये सामील झाला.

सोबतच अक्षयचे २ सिनेमे २०० करोड क्लबमध्ये समाविष्ट आहेत. अक्षय हा आतापर्यंतचा पहिला असा सुपरस्टार आहे ज्याच्या एकाच वर्षात प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी २०० करोडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. त्याने ही कमाल साल २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या मिशन मंगल, हाउसफुल ४ आणि गुड न्यूज़ या सिनेमांमधून केली.

मागच्या वर्षी अक्षयचा कोणताच सिनेमा प्रदर्शित झाला नाही. कोरोनामुळे त्याच्या सूर्यवंशी हा २०२० मध्ये प्रदर्शित होणार सिनेमा पुढे ढकलला गेला. अक्षयने मोठ्या पडद्यासोबतच लहान पडदा देखील जोरदार गाजवला. त्याने टीव्हीच्या अनेक रियालिटी शोचे सूत्रसंचालन केले तर काही शोमध्ये तो जज म्हणून देखील दिसला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता असलेल्या अक्षय कुमारची एकूण संपत्ती ऐकली तर होती डोळे पांढरे
जेव्हा ट्विंकल खन्नाच्या आईने अक्षय कुमारला ‘गे’ समजले तेव्हा लग्नाआधी अभिनेत्यासमोर ठेवली मोठी अट
विराट कोहलीच्या शतकावर अनुष्का शर्मा भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘मी नेहमीच तुझ्यासोबत…’

 

हे देखील वाचा