Sunday, July 14, 2024

‘पुष्पा’चा हिंदी आवाज ऐकून अल्लू अर्जुन झाला वेडा, श्रेयस तळपदेच्या आवाजाचे कौतुक करत, म्हणाला…

सध्या बॉक्स ऑफिसवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच सिनेमाचा बोलबाला आहे आणि तो सिनेमा म्हणजे ‘पुष्पा: द राईज.’ अल्लू अर्जुनच्या या दाक्षिणात्य सिनेमाने प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ निर्माण केली आहे. साऊथमध्ये तर या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे, शिवाय हिंदीमध्ये देखील या सिनेमाच्या डब व्हर्जनने प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले आहे. सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या दोघांच्या जोडीची अफलातून केमेस्ट्री, तोंडावर राहणारे संवाद, आकर्षक संगीत, कलाकारांचा दमदार अभिनय सर्वांनाच भुरळ घालत आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनने जबरदस्त अभिनय केला असून, हा सिनेमा दाक्षिणात्य भाषेसोबतच हिंदीमध्ये देखील खूपच लोकप्रिय झाला आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

हिंदी भाषेत हा सिनेमा हिट होण्यामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांना आतापर्यंत हे समजलेच असेल की, ‘पुष्पा द राइज’ सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनच्या पात्राला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. आता सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला देखील तुफान प्रतिसाद मिळत असून, या निमित्ताने अल्लू अर्जुनने श्रेयसचे कौतुक करत त्याचे आभार मानले आहे. अल्लू अर्जुनच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या मुलाखतीचा व्हिडिओ श्रेयश तळपदेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन म्हणतो, “श्रेयसजी माझ्या चित्रपटासाठी तुम्ही तुमचा सुंदर आवाज दिल्याबद्दल तुमचे खूप आभार. आपण लवकरच भेटू अशी मी अपेक्षा करतो. ऑन कॅमेरा मी तुमचे आभार मानू इच्छित आहे. ‘पुष्पा’ या पात्रासाठी तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याबद्दल तुमचे खूप आभार” असे अल्लू अर्जुन या मुलाखतीमध्ये बोलताना दिसत आहे.

श्रेयसने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “अल्लू अर्जुन तुझे खरंच खूप मनापासून आभार. सोबतच ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी माझा आवाज योग्य आहे असा विचार माझ्याबद्दल केल्यासाठी मनीष शाह (Manish Shah) तुमचे देखील आभार. माझ्या आवाजातील सुधारणांसाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी डबिंड डायरेक्टर अब्दुल तुमचेही मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचे हे प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे. यासोबतच श्रेयसने खूप अभिमान वाटत असल्याचेही पोस्टद्वारे सांगितले आहे.” श्रेयसच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि फॅन्स कमेंट्स करत त्याचे अभिनंदन करत आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा