बिग बॉसच्या घरातील नाती… किती खरी आणि किती खोटी?


बिग बॉसचं घर जे देशातलं असं घर आहे जिथे १५ जण येतात, १०० दिवस राहतात, दर आठवड्याला एक माणूस घराबाहेर जातो, मग अंतिम आठवड्यात कुणीतरी एक विजेता होतो. हा जरी शोचा फॉरमॅट असला तरी सुद्धा या घरात इतरही गोष्टी होत असतात.

वाद विवाद तर या शोचा अविभाज्य घटक आहे. परंतु या शोमध्ये अनेक जोड्यांचे सूत देखील जुळताना आपण पाहिले आहेत. यातील काहींनी पुढे लग्न केलं तर काही शो संपल्यावर वेगळे देखील झाले. बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या १४ पर्वांमध्ये अशा किती जोड्या आल्या हेच आता आपण पाहणार आहोत.

करिश्मा तन्ना – उपेन पटेल

बिग बॉस सिझन ८ मध्ये हे दोघे स्पर्धक म्हणून आले होते. घरात एकत्र राहताना हे दोघे खूप जवळ आले होते. या दोघांचं एक नातं तयार झालं होतं. परंतु या दोघांमध्येही पुढे काय बिनसलं काही माहीत नाही. दोघेही शो मधून बाहेर पडल्यानंतर एकमेकांपासून वेगळे झाले.

एजाज खान – पवित्रा पुनिया

एजाज आणि पवित्रा हे बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या खूप जवळ होते. खरं तर दोघांनी कधीच एकमेकांवर प्रेम असल्याचं कबुल केलं नव्हतं. हा हे मात्र नक्की की या दोघांनीही एकमेकांची सवय झाल्याचं कबुल केलं होतं.

तनिशा मुखर्जी – अरमान कोहली

बिग बॉसच्या ७ व्या पर्वात या दोघांनी स्पर्धक म्हणून घरात शिरकाव केला होता. शो मध्ये या दोघांची जवळीक वाढली दोघांच्या या नात्यांची खूप चर्चा देखील होऊ लागली. परंतु शो मधून बाहेर पडल्यावर मात्र कौटुंबिक कारणांमुळे हे दोघेही वेगळे झाले.

जास्मिन – अली

बिगबॉस च्या विद्यमान पर्वातील ही जोडी सर्वांना दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगते. त्या दोघांमध्ये मैत्रिपेक्षाही पुढचं नातं असल्याचं ते दोघे कबुल करत आहेत. परंतु शो मध्ये या दोघांची जी जवळीक दिसतेय त्या नुसार यांचं नातं प्रेमाचं असल्याचं घरातील इतर सदस्य म्हणत आहेत. जास्मिनने हे प्रेम असल्याचं कबुल तर केलं आहे परंतु अली ने यावर अजूनही काही भाष्य केलेलं नाही. तो ते कधी करणार हे फक्त तोच जाणतो.

राहुल महाजन – पायल रोहतगी

बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात हे दोघेही घराचे सदस्य म्हणून आले होते. या वेळी घरात त्यांच्यात इतकी जवळीक वाढली होती की स्विमिंग पूल मध्येदेखील दोघे एकत्र असायचे. परंतु घरातून बाहेर पडल्यानंतर या दोघांचेही मार्ग विरुद्ध दिशेला गेले होते.

रोशेल राव – किथ सिक्वरा

हे दोघेही बिग बॉसच्या ९ व्या पर्वात दिसले होते. स्पर्धेत पुढे ते एकत्र आले. त्यांच्यात इतकी जवळीक वाढली की एकमेकांच्या प्रेमात पडले. घराबाहेर पडल्यानंतर या दोघांनीही लग्न केलं. आजही दोघांचा राजा राणीचा सुखी संसार सुरू आहे.

बंदगी कालरा – पुनिश शर्मा

बिग बॉस ११ मध्ये दिसलेल्या बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा यांच्या नात्याची सुरुवात या शोपासून झाली. शोमध्ये त्यांच्यामध्ये बरीच जवळीक दिसली. शो संपल्यानंतर दोघांनीही लगेच लग्नाची घोषणा केली होती.

गौहर खान – कुशाल टंडन

बिग बॉस च्या ७ व्या पर्वात ही जोडी आपल्याला दिसली होती. सुरुवातीला भयंकर भांडणारे हे दोघेही नंतर एकमेकांच्या जवळ आले. इतके की त्यांच्यात प्रमाची कळी खुलली. शो संपल्यानंतरही काही वर्षे हे दोघेही एकत्र होते. परंतु नंतर मात्र दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

प्रिंस नरूला – युविका चौधरी

बिग बॉसच्या नवव्या पर्वात आपल्याला हे दोघे एकत्र दिसले होते. घरात आल्यानंतर दोघांनाही एकमेकांसोबत प्रेम झालं. प्रिंस ने बदामाच्या आकाराची चपाती बनवत युविका ला प्रपोज केलं होतं. शो मधून बाहेर पडल्यावर या दोघांनीही लग्न केलं आणि आज हे दोघेही आनंदात राहत आहेत.

अश्मित पटेल – वीणा मलिक

बिग बॉसच्या चौथ्या पर्वामध्ये अश्मित पटेल आणि वीणा मलिक यांच्यातील रोमान्सची खूप चर्चा झाली होती. दोघांना शो मध्ये एकमेकांच्या अत्यंत जवळ पाहिलं गेलं होतं. पण शोच्या आत सुरू झालेलं हे नातं फार काळ टिकलं नाही. बिग बॉस सोडल्यानंतर हे दोघेही वेगळे झाले.


Leave A Reply

Your email address will not be published.