Thursday, November 30, 2023

अभिनयासह आयुष्मानने गिरवलेत पत्रकारितेचेही धडे; तर ‘हे’ आहे अभिनेत्याचं खरं नाव

एकपेक्षा एक दमदार आणि सुपरहिट चित्रपट देऊन आयुष्मान खुराणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सुरुवातीला चुकीच्या वाटणाऱ्या त्याच्या चित्रपटांनी शेवटी समाजात हिताचाच संदेश दिला आहे. समाजामध्ये असलेल्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्ये, त्याने आपल्या अभिनयाने त्या पात्राला पूर्ण पणे न्याय दिला आहे. त्याच्या चित्रपटांमधून त्याने यशाचे मोठे शिखर गाठले असून, गेली अनेक वर्षे तो यशस्वी चित्रपट देण्यास सज्ज झाला आहे. 14 सप्टेंबर तो त्याचा वाढदिवस साजरा करतो. वाढसदिवसानिमित्त जाणून घेऊ त्याचा आतापर्यंतचा जीवन प्रवास.

आयुष्मानचा जन्म पंजाबच्या चंडीगडमध्ये साल 1984रोजी झाला. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. त्याने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि पंजाब विद्यापीठातील कम्युनिकेशन स्टडीज स्कूलमधून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्याने पत्रकारितेची पदवी प्राप्त केल्यानंतर ‘बिग एफएममध्ये रेडिओ’मध्ये पहिली नोकरी मिळवली. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने त्याने आपल्या शैक्षणिक आयुष्यात खूप छान पद्धतीने रंगमंच गाजवला आहे. एखाद्या उत्तम नटामध्ये असणाऱ्या सर्व गुणांनी तो तेव्हापासूनच पारंगत होता. डीएव्ही कॉलेजच्या ‘आगाझ’ आणि ‘मंचतंत्र’चा तो संस्थापक सदस्य होता. त्याने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍंड सायन्स, पिलानी आणि सेंट बेडेस शिमला यासारख्या राष्ट्रीय महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये बक्षिसे जिंकली आहेत. लहानपणापासूनच त्याचा अभिनयामध्ये हात खंडा होता. (Birthday special Ayushman Khurana path-breaking film like Vicky donor To shubhamangala jyada savdhan)

या कुशल अभिनेत्याने साल 2021 मध्ये बॉलिवूडध्ये पदार्पण केले. ‘विकी डोनर’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. यामध्ये त्याची सहकलाकार यामी गौतम होती. या अभिनेत्रीचा देखील बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट होता. दोघांनी या चित्रपटामध्ये दमदार अभिनय केला. या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट खूप हिट झाला. रुपेरी पडद्यावर झळकताच त्यांनी चाहत्यांच्या टाळ्यांचा आणि कौतुकाचा पर्वत पार केला होता. या नंतर त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपट केले.

अभिनेत्री भूमि पेडनेकरसह ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटामध्ये त्याने कमालीची भूमिका बजावली. या चित्रपटामध्ये त्याचे एका स्थूल मुलीबरोबर लग्न झाले होते. त्याच्या मनाविरूद्ध त्याला हे लग्न करावे लागले. त्यामुळे तो आपल्या पत्नीचा म्हणजेच भूमि पेडनेकरचा खूप तिरस्कार करतो. परंतु शेवटी चित्रपटामध्ये आपल्या पत्नीच्या बाह्य रूपापेक्षा तिचे मन पाहणे किती महत्वाचे आहे असा संदेश दिला आहे. आपल्या आजूबाजूला काही कारणास्तव स्थूल असलेल्या अनेक मुली आहेत. त्यांना त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये किती अडचणींचा सामना करावा लागतो हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.

साल 2017 मध्ये आलेला चित्रपट ‘शुभ मंगल सावधान’ यामध्ये देखील त्याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. या चित्रपटामध्ये महिलांना असलेल्या लैंगिक व्याधी आणि त्याचा एका पुरुषावर तसेच समाजावर होणाऱ्या परिणामावर बोट ठेवले गेले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. तसेच अभिनेत्याचे या चित्रपटामधील अभिनयासाठी विशेष कौतुकही केले गेले.

त्यानंतर साल 2018 मध्ये आलेला चित्रपट ‘बधाई हो’मध्ये समाजातील वृद्ध व्यक्तींच्या मनावर भाष्य केले गेले. यामध्ये आयुष्मानच्या आईची भूमिका नीतागुप्ता यांनी साकारली. या चित्रपटामध्ये वृद्ध असलेली महिला गरोदर असल्याचे दाखवण्यात आले आहे. एवढ्या वृद्ध वयामध्ये गरोदर झाल्याने या महिलेला समाजामध्ये खूप वाईट नजरेने पाहिले जाते. तसेच अनेक जण तिची मस्करी आणि टिंगल करताना दिसत आहेत. या सर्वांचा आपल्या मोठ्या मुलांवर कसा परिणाम होतो, हे देखील या चित्रपटामध्ये दिसत आहे. परंतु शेवटी एका चौकटीच्या बाहेर समाजाने विचार केला पाहिजे असा संदेश देण्यात आला आहे.

‘आर्टिकल 15’ या चित्रपटाने, तर सर्वच विक्रम मोडून ठेवले. यामध्ये आयुष्मानाने आयपीएस अभिकाऱ्याची भूमिका निभावली आहे. आपल्या भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. तसेच एखाद्या व्यक्तीची जाती वरून नाही, तो एक माणूस आहे म्हणून त्याची कदर केली पाहिजे असे यामध्ये सांगण्यात आले आहे. तसेच चित्रपटामध्ये मोठ्या जातीचे लोक त्यांनीच बनवलेल्या छोट्या जातीवरील लोकांवर असे अन्याय अत्याचार करतात हे दाखवले आहे.

आयुषमानने आजवर समाजातील अनेक छोट्या आणि मोठ्या मुद्यांवर काम केले आहे. त्याच्या अभिनयाने आणि त्याच्या हटके विचारांनी तो नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्याने या चित्रपटांसह ‘बाला’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाची मोठी छाप पडली आहे. तो सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असतो. तसेच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. सिनेसृष्टीतील दमदार आणि तरुण असलेल्या या अभिनेत्याने आता ३७व्या वयात पदार्पण केले आहे. त्याला लहानपणी निशांत खुराना म्हणून ओळखले जात होते. तो ३ वर्षांचा असताना त्याच्या आई बाबांनी त्याचे नाव आयुष्मान ठेवले. त्याच्या दमदार अभिनयाने तो एका चित्रपटासाठी १० कोटी एवढे मानधन घेतो.

हेही नक्की वाचा-
अभिनेत्री पूजा हेगडेच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा; फोटो व्हायरल
‘सिंगल’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हे’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

हे देखील वाचा