हिट सिनेमाची शाश्वती असणाऱ्या आजच्या काळातील दबंग स्टार सलमान खानने दिली अनेकांच्या करिअरला उभारी


बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज (२७ डिसेंबर) आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खान आज बॉलिवूडमधील एक ब्रँड आहे. त्याचा बॉलिवूडमध्ये किती मोठा दबदबा आहे हे तर सर्वश्रुत आहेच. आज सलमान ज्या सिनेमात काम करतो त्या सिनेमाचे सोनं होत आहे. सिनेमा फ्लॉप जरी झाला तरी १०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त व्यवसाय करतो. टेलिव्हिजन, सिनेमा या दोन्ही माध्यमांमध्ये सलमानचे मोठे वर्चस्व पाहायला मिळते. सलमानने त्याच्या करिअरमध्ये जे यश आणि फॅन्सचे प्रेम पाहिले ते खूपच कमी कलाकारांच्या नशिबात असते.

सलमानने सांगितलं तर त्याला नाही म्हणण्याची हिंमत अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच व्यक्तींमध्ये आहे. कुणाचं बॉलिवूडमध्ये करियर घडवणं असो किंवा कुणाचं करियर बिघडवणं! सलमानच्या नादाला फारसं कुणी लागत नाही. तसं पाहायला गेलं तर या दबंग अभिनेत्याबद्दल सगळ्यांनाच सारं काही ठाऊक आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु तरीही आपण सलमानच्या या इतक्या मोठ्या करियरचा एक धावता आढावा घेणार आहोत.

सलमान खान हा सुप्रसिद्ध लेखक सलीम खान आणि सलमा खान यांचा मुलगा आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेला सलमान, अरबाज, सोहेल, अल्विरा आणि अर्पिता यांचा मोठा भाऊ आहे. लहानपणापासूनच सलमान खान खूप खोडकर होता. कपिल शर्मा शो दरम्यान सलमानने सांगितलं की त्याने लहानपणी दिवाळी साजरी करताना नोटांची गठ्ठी जाळली होती. ही नोटांची गठ्ठी म्हणजे वडील सलीम खान यांचा पगार होता. त्यावेळी बरंच आर्थिक नुकसान झालं होतं तरी सलीम खान हे सलमानवर रागावले नाहीत की त्याला मारलं नाही. त्यांनी त्याला शेजारी बसवून शांतपणे पैशाचं महत्त्व समजावून सांगितलं होतं.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानला नेहमीच अभिनेत्याऐवजी दिग्दर्शक व्हायचं होतं, परंतु स्टायलिश लुकमुळे त्याला सर्वांकडून अभिनयाचा सल्ला मिळाला. १९८८ मध्ये आलेल्या ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर त्याला सूरज बडजात्या यांचा रोमँटिक सिनेमा ‘मैने प्यार किया’ मिळाला. या चित्रपटामुळे सलमानला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील सलमान आणि भाग्यश्रीची जोडी देखील लोकांना खूप आवडली होती. हा चित्रपट १९८९ मध्ये बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता, ज्यासाठी सलमानला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पण या पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं.

ब्लॉकबस्टर ठरलेल्या मैने प्यार कीया केल्यानंतर सलमानने बाघी, ​​पत्थर के फूल, सनम बेवफा, कुर्बान और साजन, हम साथ साथ हैं, प्यार किया तो डरना क्या, तेरे नाम, करण-अर्जुन, चोरी-चूपी चुपके-चुपके, हम आपके है कौन, हम दिल दे चुके सनम यासारख्या अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केलं. यानंतर सलमानने स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुद्धा काढलं. त्यात त्याने चिल्लर पार्टी, बजरंगी भाईजान, भारत, लव्हयात्री, रेस ३, दबंग ३ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

अभिनय कारकीर्दीसोबतच, सलमान आपल्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत होता. चित्रपटात येण्यापूर्वी सलमान आणि संगीता बिजलानी रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांचं नातं तब्बल १० वर्षे टिकलं. सलमान आणि संगीता यांचा साखरपुडादेखील झाला होता, १९९६ मध्ये परस्पर मतभेदांमुळे दोघांनी हे लग्न मोडलं. यानंतर सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. १९९९ मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमान दिसला होता, या चित्रपटानंतर सलमान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील जवळीक खूप वाढली. ऐश्वर्यासाठी सलमान खूप पझेसिव्ह होता, ज्यामुळे तो अचानक तिच्या सेटवर पोहोचायचा. यावेळीही दोघांमध्ये मतभेद वाढु लागल्याने ऐश्वर्याने सलमानसोबत ब्रेकअप केलं. यानंतर सलमान कतरीना कैफ सोबत रिलेशनशिपमध्ये आला होता. कालांतराने तिच्यासोबतही सलमानचं ब्रेकअप झालं.

सलमान साल १९९९ मध्ये पुन्हा एकदा चर्चेत आला होता. मात्र यावेळी त्याच्या चित्रपटाची चर्चा नव्हती तर त्याने काळविटाची शिकार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. चित्रपट हम साथ साथ है च्या चित्रीकरणा दरम्यानच सलमान चर्चेत आला होता. या प्रकरणी सलमानला बऱ्याचदा तुरुंगवास देखील भोगावा लागला आहे. याशिवाय सलमान हिट एंड रन केसमुळे देखील बऱ्याच वादात अडकला होता परंतु काही वर्षांपूर्वीच त्याची हिट अँड रन केसप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

एक चांगला अभिनेता असण्याव्यतिरिक्त सलमान खान एक उत्तम चित्रकार देखील आहे. आपल्या फावल्या वेळात सलमानला बहुतेक वेळा चित्र काढायला आवडतात. सलमानची सर्व चित्रं अत्यंत महाग विकली जातात, ज्यातून मिळालेला नफा त्याच्या बिंग ह्यूमन या एनजीओला जातो. सलमान खानच्या अनेक चित्रांची आमिर खानने त्याच्या घरात सजावट केली आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या जय हो चित्रपटाचं पोस्टरही सलमानने स्वतःच तयार केलं होतं.

स्वतःची कारकीर्द घडवण्याबरोबरच सलमानने इंडस्ट्रीतील अनेक उगवत्या तार्‍यांना ओळख दिली आहे. सलमानने हिमेश रेशमिया, कतरिना कैफ, जरीन खान, सई मांजरेकर, आदित्य पांचोली, अथिया शेट्टी अशा अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. यातील अनेक जण हे बॉलिवूडमध्ये सुपरस्टार झाले आहेत तर काही तितकीशी चमक दाखवू शकलेले नाहीत.

अगदी सुरुवातीच्या काळात सलमानचा सडपातळ अवतार पाहायला मिळाला होता परंतु भाईजानने आपल्या बॉडी ट्रान्स-फॉर्मेशनने सर्वांना अनेक वेळा आश्चर्यचकित केले. अर्जुन कपूर आणि हृतिक रोशन यांनीही सलमान खानकडून फिटनेसची प्रेरणा घेतली आहे. फिटनेस फ्रीक भाईजानने बर्‍याच लोकांना फिटनेसचं प्रशिक्षणही दिलं आहे.

रुपेरी पडद्यावर एकहाती वर्चस्व असणाऱ्या सलमान खानने टीव्ही क्षेत्रातही पाऊल ठेवलं. २००८ मध्ये त्याने ‘१० का दम’ या रियॅलिटी शोचं निवेदन तो करत होता. यानंतर त्याने २०१० मध्ये ‘बिग बॉस’ या शोचं निवेदन करायला सुरू केलं आणि तिथून आजपर्यंत सलग सलमान या शोचं निवेदन करत आला आहे. बरेच जण बिग बॉस फक्त सलमानच्या निवेदनासाठी पाहत असतात.

दैनिक बोंबाबोंब कडून सलमानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

हेही वाचा :

मीनल शाहच्या रंगतदार परफॉर्मन्सने रंगला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले, पाहा झलक

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकी श्रॉफ यांनी ‘या’ कारणामुळे लगावली होती अनिल कपूर यांच्या कानशिलात

कलाकारांनी चित्रपटांमध्ये वापरलेल्या ‘या’ वस्तूंचा झाला लाखोंमध्ये लिलाव


Latest Post

error: Content is protected !!