Monday, October 2, 2023

एकेकाळी अभिनयात सलमानला द्यायचा टक्कर; एका घटनेने संपवून टाकले इंदरचे करिअर

चांगल्या चाललेल्या आयुष्याची घडी कधी विस्कटेल याचा कुणालाच अंदाज नसतो. बॉलिवूडमध्ये करिअर बनवत असताना कलाकारांना अनेक कठीण गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक सामान्य व्यक्तींना असे वाटते की, कलाकारांचे आयुष्य किती आरामदायक आहे. परंतु अभिनय साकारताना एखादा स्टंट करताना कलाकारांना अपार मेहनत घ्यावी लागते. त्यांनतर दिलेली भूमिका योग्य पद्धतीने साकारणे शक्य होते. सलमान खानला त्याच्या अभिनयाप्रमाणेच पिळदार शरीरयष्टीमूळे ओळखले जाते. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून सलमानकडे पाहिले जाते. एक काळ होता, जेव्हा इंदर कुमार देखील सलमानच्या तोडीस तोड अभिनय करत होता. त्याचा चेहरा व शरीरयष्टी त्याने सलमान खान सारखीच बनवली होती. परंतु एका घटनेमुळे त्याला बॉलिवूड सोडावे लागले.

सलमान खानला टक्कर देणाऱ्या इंदर कुमारचा शनिवारी (26 ऑगस्ट) 50 वा वाढदिवस आहे. मात्र, हा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो आपल्यात नाही. एका घटनेमुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. त्याला बॉलिवूड सोडावे लागले. दिग्दर्शक पार्थो घोष यांच्या ‘मसीहा’ या चित्रपटासाठी इंदरला एक स्टंट रोलची ऑफर आली होती. त्याने ती स्वीकारली, स्टंट करत असताना त्याला हेलिकॉप्टरला बांधण्यात आले होते. हेलिकॉप्टर उंचावर उडत असताना अचानक मध्येच त्याची दोरी तुटली आणि बऱ्याच उंचीवरून तो खाली पडला. या अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, “इंदरला यापुढे स्वतःच्या पायावर उभे राहता येण्याची शक्यता फार कमी आहे.” डॉक्टरांनी त्याला 3 वर्ष बेडरेस्ट घ्यायला सांगितले होते.

इंदरबरोबर घडलेल्या या अपघातानंतर त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू आणखीनच वाढू लागल्या. त्याच्यावर बलात्कार तसेच ड्रग्ज घेतल्याचे आरोप करण्यात आले. यादरम्यान 2011 मध्ये ‘ये दुरिया’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. त्यांनतर त्याच्या आयुष्यातील अडचणींचा डोंगर वाढतच गेला. तसेच त्याला त्याची तब्येत पण साथ देत नसल्याने त्याने चित्रपटांत काम करणे बंद केलं. आपल्या आयुष्यात सुरू असलेल्या गोष्टींमुळे त्याला खूप मानसिक त्रास देखील होत होता. त्यामुळे 28 जुलै, 2017 मध्ये वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली. त्यावेळी अनेकांना असेही वाटले की त्याने आत्महत्या केली असेल. परंतु शवविच्छेदनानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले.

अभिनेत्याच्या चित्रपटातील कारकिर्दीविषयी बोलायचे झाले, तर त्याने ‘तुमको न भूल पाएंगे’, ‘मां तुझे सलाम’, ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’, ‘कुंवारा’, आणि ‘वाँटेड’ चित्रपटात काम केले. तसेच ‘मासूम’ ‘गजगामिनी’, ‘घूंघट’, ‘कहीं प्यार न हो जाए’, ‘ये दूरियां’ अशा अनेक चित्रपटांमधून अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्याने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमध्ये मिहिरची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या या भूमिकेमुळेच तो घराघरात पोहोचला. सलमान खानला टक्कर देणारा अभिनेता आता या जगात नाही. त्याचे चाहते आजही त्याचे चित्रपट आवडीने पाहतात.

हेही नक्की वाचा-
ऋतिकला सुपरहिट करणाऱ्या दिग्गज व्यक्तीचे निधन; एक दिवसाआधीच चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
‘सुभेदार’बद्दल चिन्मय मांडलेकरांनी प्रेक्षकांना केले आव्हान; म्हणाले, ‘अनेक जण चित्रपट…’

हे देखील वाचा