Friday, March 29, 2024

नागराज मंजुळे पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीला देणार 100 कोटींचा सिनेमा? नुकतीच केलीय घोषणा

मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात आतापर्यंत अनेक दिग्दर्शकांनी मोलाचे योगदान दिले आहे. या दिग्दर्शकांमध्ये नागराज मंजुळे यांच्या नावाचाही समावेश होतो. नागराज मंजुळे यांचा सिनेमा म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. नागराज यांनी  आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आगामी सिनेमाच्या शूटिंगबद्दलही भाष्य केले आहे. चाहत्यांसाठी नागराज मंजुळे कोणता सिनेमा घेऊन येणार आहेत, चला जाणून घेऊया.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आगामी सिनेमा
दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा आगामी सिनेमा दुसरा-तिसरा कोणताही नसून ‘नाळ 2’ हा आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाचा पहिला भाग म्हणजेच ‘नाळ’ (Naal) हा सिनेमा 2018 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची निर्मिती नागराज यांनी केली होती. या सिनेमात श्रीनिवास पोकळे याने चैत्या, देविका दफ्तारदार यांनी चैत्याची आई आणि स्वत: नागराज यांनी  चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. चाहत्यांना या सिनेमातील सर्वांच्याच भूमिका आवडल्या होत्या. मात्र, आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागात काय होईल, असा प्रश्न कदाचित चाहत्यांनाही पडला असेल. याचेच उत्तर नागराज मंजुळे देणार आहेत.

नागराज यांनी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
नागराज मंजुळे यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ‘नाळ’ या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. त्यांनाही असा प्रश्न पडला होता की, या सिनेमाच्या दुसऱ्या भागात काय असू शकते. मात्र, या सिनेमाचे दिग्दर्शक- लेखक सुधाकर रेड्डी यक्कंती यांनी नागराज यांना दुसऱ्या सिनेमाची कहाणी सांगून हैराण केले. नागराज यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिग्दर्शक सुधाकर, स्वत: नागराज, देविका आणि श्रीनिवास दिसत आहेत.

नागराज मंजुळे यांची पोस्ट
त्यांनी ही पोस्ट शेअर करत लिहिले की, “मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की, नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटूयात? नाळचा दुसरा भाग काय होऊ शकतो, याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या ‘नाळ’ प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे! ‘नाळ 2’ च्या नावानं चांगभलं!!!”

नागराज मंजुळे यांच्या या सिनेमाचे शूटिंग नुकतेच सुरू झाल्याचे, त्यांच्या पोस्टवरून समजते. नागराज यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्यात ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या ‘सैराट’ या सिनेमाने 100 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला होता. 100 कोटींचा आकडा पार करणारा हा मराठीतील पहिलाच सिनेमा होता. आता हा सिनेमा किती कमाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तोंड जरा सरळ ठेवून नाच’, शहनाज गिलची कॉपी केल्याने मलायकावर भडकले चाहते; पाहा व्हिडिओ
‘बिग बॉस 16’मध्ये येणार वादळ! दोन नवीन स्पर्धकांची झालीय एन्ट्री; एक पॉलिटिशन, तर दुसरा रॅपर

हे देखील वाचा