Saturday, April 20, 2024

अनुपम खेर यांची शिष्या झालीय साऊथ सुपरस्टार, हिटवर हिट चित्रपटांचा लावलाय सपाटा

सध्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींप्रमाणे दाक्षिणात्य अभिनेत्री सुद्धा आपल्या लूकमुळे नेहमी चर्चेत असतात. यातील काही अभिनेत्रींनी तर बॉलिवूडमधील अभिनेत्रींना देखील आपल्या आकर्षक अशा लूक आणि अभिनयाने टक्कर दिली आहे. मग ती नॅशनल क्रश रश्मीका असो वा साउथची समंथा. साऊथमधील प्रत्येक अभिनेत्री या आपल्या अभिनयामुळे नेहमी चर्चेत असतात आणि बऱ्याचवेळा त्या आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यांपैकी एका अशाच अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत , जीने आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. मंडळी ती अभिनेत्री म्हणजे वरलक्ष्मी सारथकुमार.

चेन्नई आणि तमिळ चित्रपटातील प्रख्यात अभिनेता आणि एआयएसएमचे संस्थापक सारथकुमार यांची ती कन्या आहे. हिंदुस्थान आर्ट आणि सायन्स महाविद्यालयातून तिने मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने बिजनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली, ज्यासाठी तिला स्कॉटलंडला जावे लागले होते. अभिनेत्री होण्यापूर्वी तिने अनुपम खेर यांच्या मुंबईतील प्रशिक्षण केंद्रातून अभिनयाचे धडे देखील गिरवले होते. तिने तामिळ , तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषिक चित्रपटातून काम केले आहे. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर तिने ह्या इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वरलक्ष्मी ही अशी एक गुणी अभिनेत्री मानली जाते, जीने कमी कालावधीत प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने आपलेसे केले आहे. आपल्या प्रत्येक अभिनयातून ती काहीतरी वेगळेपणा दाखवून देण्याच्या प्रयत्नात असते.

वरलक्ष्मीने सन २००३ मध्ये ‘शंकर्स बॉय’ या चित्रपटासाठी ऑडीशन दिले होते आणि त्यात तिची लीड रोलसाठी निवड झाली होती, परंतु वडिलांनी काही कारणामुळे तिला तो चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्याचप्रमाणे बालाजी सकथिवेलच्या ‘कढल’ आणि व्यंकट प्रभूंच्या ‘सरोजा’ या चित्रपटात देखील काम करण्याची संधी तिने गमावली.

त्यानंतर वरलक्ष्मीने २०१२ मध्ये ‘पोडा पोडी’ या तामिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी दिला जाणारा अभिनेत्रीचा पुरस्कारही देण्यात आला होता. या चित्रपटात तिने लंडनमधील एका नर्तिकेची भूमिका निभावली होती. सोबतच तिचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट देखील चांगलाच गाजला. या चित्रपटात तिच्यासोबत आर माधवन आणि विजय सेतुपती सोबत अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश होता.

वरलक्ष्मीने २०१४ मध्ये ‘मानिक्य’ या चित्रपटातून कन्नड चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते तर 2015 मध्ये कसाबा या चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. सोबतच २०१९ मध्ये तिने ‘तेनाली रामकृष्ण’ या चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले होते. तिचे मेधा गजा राजा, राणा, निभुनन, वीसम्या, कट्टू, सरकार, क्रॅक, निया हे चित्रपट विशेष गाजले आहेत.

सध्या ती आपल्या अनेक चित्रपटात काम करण्यात व्यस्त आहे. तिच्या क्रॅक आणि नांधी या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि हे चित्रपट प्रेक्षकांना देखील पसंत पडले होते.

हे देखील वाचा