Thursday, June 19, 2025
Home बॉलीवूड दुर्दैवच म्हणायचं अन् काय! ‘या’ कलाकारांनी अपघातात गमावलाय जीव, बिग बींच्या अभिनेत्रीचाही समावेश

दुर्दैवच म्हणायचं अन् काय! ‘या’ कलाकारांनी अपघातात गमावलाय जीव, बिग बींच्या अभिनेत्रीचाही समावेश

लाईट, कॅमेरा, एक्शन आणि मग येतं ते पैसा, प्रसिद्धी, फॅन्सची गर्दी. किती छान असते ना बॉलिवूडच्या कलाकारांची लाईफ, पण मंडळी या कलाकारांचं आयुष्य आपल्या दिसतं तितकं सोपंही नसतं बरका. जितका त्यांच्या यशाचा आलेख मोठा, तितकाच या क्षेत्रात संघर्ष आणि रिस्कही मोठीच. चित्रपटाच्या शुटिंगसाठी करावा लागणारा हजारो किलोमीटरचा प्रवास ते प्रत्यक्ष शूटिंग. या दरम्यान कलाकारांना अनेक छोट्या मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळेच सिने जगतात आजवर अशा अनेक घटना, असे अनेक अपघात घडलेत ज्यात कलाकारांना त्यांच्या जीवनाचा रंगमंच कायमचा सोडून जावं लागलंय. कोण होते हे कलाकार, ज्यांचा अपघाती मृत्यू झाला. ज्यांच्या अकाली निधनामुळे चाहतेही दुःखाच्या खाईत कोसळले, पाहूयात या लेखातून.

सोनिका चौहान
मित्रांनो, म्हणतात ना, वेळं कधी कुणावर सांगून येत नाही. एका क्षणाची चूक किंवा एका क्षणात घेतलेला निर्णय अनेकांच्या जीवावरही बेतू शकतो. याची प्रचिती बॉलिवूड कलाकारांच्या अपघाताच्या घटना पाहून येते. बॉलिवूडची एकेककाळची प्रसिद्ध अभिनेत्री सोनिका चौहान हिच्याबाबतही असंच घडलंय. सोनिकाने रस्ते अपघातामुळे या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. सोनिकाचा हा अपघात २९ एप्रिल २०१७ मध्ये झाला होता. यावेळी विक्रम चॅटर्जी नावाचा तिचा मित्रही सोबत प्रवास करत होता. गाडीचा वेग प्रचंड असल्याने आणि विक्रमचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला, तेव्हा या नवोदित अभिनेत्रीच्या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला होता.

जसपाल भट्टी
कार अपघातात जगाचा निरोप घेणारे दुसरे कलाकार म्हणजे जसपाल भट्टी. जसपाल भट्टी हे प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन होते. आपल्या तुफान कॉमडीने त्यांनी सर्वांनाच खळखळून हसवले, पण त्यांचा अपघाती मृत्यू प्रत्येकाच्याच मनाला चटका लाऊन गेला. ऑक्टोंबर २०१२मध्ये चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ते बाहेरगावी निघाले होते. यावेळी प्रवासात त्यांची गाडी झाडाला धडकून अपघात झाला. ज्यात जसपाल भट्टी यांचा जागीच मृत्यू झाला.

सौम्या रघू
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सूर्यवंशम चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सौंदर्या म्हणजेच सौम्या रघू तुम्हाला आठवतचं असेल. आपल्या खास अभिनय शैलीने आणि सौंदर्याने लोकप्रिय ठरलेल्या या अभिनेत्रीचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. २००४ साली अभिनेत्री सौम्या रघू ज्या विमानात बसली होती, त्या विमानाला आग लागली आणि याच आगीत तिचा मृत्यू झाला. सौम्या ही, तेव्हा दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेजगतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती.

अर्जित लवानिया
अर्जित लवानिया आणि गगन कांग हे दोघेही प्रसिद्ध टीव्ही कलाकार. ज्यांच्या मृत्यूने संपूर्ण मनोरंजन जगताला धक्का बसला होता. अर्जुन आणि गगन त्यावेळी ‘महाकाली अंत ही आरंभ है’ मालिकेत एकत्र काम करत होते. या दोन्ही सहकलाकारांचा आणि जिवलग मित्रांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यावेळी ते शूटिंगचे काम संपवून प्रवास करत होते. गाडीवरील ताबा सुटल्याने उभ्या असलेल्या कंटेनरला जावून त्यांची गाडी धडकली. ज्यामुळे या तरुण प्रतिभावान कलाकारांना आपला जीव गमवावा लागला होता.

मंडळी खेळ कुणाला दैवाला कळला, अगदी तसंच या कलाकारांच्या बाबतीतही झालं. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने सर्वांचं आयुष्य व्यापले होते. प्रत्येकाला खळखळून हसवले होते, पण त्यांची तेव्हा अवेळी झालेली एक्झिट मात्र चाहत्यांना रडवून गेली.

हेही पाहा- अपघातात जीव गमावलेले मराठी कलाकार

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा