जेव्हा जॅकी श्रॉफ यांना घेरले होते गुंडानी, तेव्हा पत्नी आयेशाने वाचवला होता जीव, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा


आपल्याकडे नेहमी नवरा बायकोच्या नात्यावर अनेक विनोद केले जातात. जगातील प्रत्येक नवरा त्याच्या बायकोला थोड्याफार फरकाने का होईना मात्र घाबरतच असतो. मग याला कलाकार कसे अपवाद असतील. मनोरंजन विश्वात अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोड्या आहेत. ज्यांनी या ग्लॅमर जगात राहूनही विश्वासाच्या जोरावर आपले नाते टिकवले आहे. अशीच एक जोडी म्हणजे जॅकी श्रॉफ आणि आयेशा श्रॉफ.

बॉलिवूडचा प्रसिद्ध ‘जग्गू दादा’ हा बाहेर जरी दादा असला, तरीही घरात तो नेहमी त्याच्या बायकोला घाबरतो. याचा खुलासा नुकताच स्वतः जग्गू दादाने केला आहे. ‘हिरो’ सिनेमातून चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या जॅकी श्रॉफ यांनी खूपच कमी काळात त्यांचे बळकट स्थान या क्षेत्रात निर्माण केले. चित्रपटांमध्ये हिट असलेले जग्गू दादा त्याच्या खऱ्या आयुष्यातील दिलदारपणामुळे देखील ओळखले जातात. जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी नुकतीच कलर्स चॅनेलवरील ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये हजेरी लावली होती. माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि धर्मेश हे या शो चे परीक्षण करतात.

या आठवड्यातील खास भागात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी आलेले असताना त्यांना या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेल्या राघवने या दोघांना एक प्रश्न विचारला की, हे दोघं त्यांच्या बायकोला घाबरतात का? यावर दोघांनीही हो असे उत्तर दिले. दरम्यान जॅकी श्रॉफ म्हणाले, “जेव्हा मी माझ्या बायकोला गुंडांना मारताना पाहिले आहे, तेव्हापासून मी तिला खूप घाबरतो.”

पूर्ण किस्सा सांगताना जग्गू दादा म्हणाले, “मी फक्त नावाला दादा आहे, पण मी माझ्या बायकोला खूप घाबरतो. आज नाही तर खूप आधीपासूनच. मी माझ्या बायकोला मित्रासाठी नेपेंसी रोडवर फाईट करताना पाहिले आहे. काही अशा गोष्टी घडल्या होत्या ज्यामुळे तिथे काही गुंड मला आणि माझ्या मित्राला मारायला आले होते, तेव्हा माझ्या बायकोने त्या गुंडाना जबरदस्त धुतले होते. तेव्हापासून मी तिला खूप घाबरतो.”

जॅकी श्रॉफने त्यांची पत्नीला म्हणजेच आयेशा श्रॉफ यांना त्या १३ वर्षाच्या असतानाच पाहिले होते. आयेशा यांना भेटल्यावर जॅकी श्रॉफ यांनी ठरवले होते की, ते त्यांच्याशीच लग्न करणार.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.