मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने केला आईचा गाडी चालवतानाचा फोटो शेअर; म्हणाला, ‘जेवढा आनंद मी…’


मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार चित्रपटांव्यतिरिक्त चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर वेळ घालवत असतात. ते यामार्फत नेहमीच आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात. त्यात लग्न, नवीन घर, प्रेमप्रकरण, चित्रपट, नवीन गाडी आणि यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. या कलाकारांपैकीच एक असलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर होय. संतोषने आपल्या अभिनयाने तर सर्वांना वेड लावले आहेच. मात्र, आता तो सोशल मीडिया पोस्टमार्फतही चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. नुकतीच त्याने एक हटके पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (Marathi Actor Santosh Juvekar Shared His Mother Picture And Write Message)

संतोषने फेसबुक अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याची आई गाडी चालवताना दिसत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

संतोषने आईचा फोटो शेअर करत लिहिले की, “जेवढा आनंद मी गाडी घेतली तेंव्हा तिला झाला नसेल तेवढा आनंद आज तिला गाडी चालवतना पाहून मला झालाय. माझ्या सकट माझे बाबा अनंत जुवेकरांना सुद्धा. जा सिमरन जा जिलेअपनी जिंदगी!!!”

त्याच्या या पोस्टवर ३ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या पोस्टवर चाहते कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. तसेच आपल्याला आपल्या आई- वडिलांना साधं दुचाकीवरही बसवता न आल्याची खंतही व्यक्त करत आहेत.

एका चाहत्याने लिहिले की, “जगातले सुवर्ण स्मितहास्य पाहण्याचे भाग्य तुला लाभले… कारण खऱ्या देवाला तू भरभरून हसताना पाहिलेस.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “आईचा आनंद गगनात मावेना… असचं आनंदी ठेवा आईला.”

संतोषने २००४ साली मनोरंजनाच्या क्षेत्रात एन्ट्री केली. त्यानंतर त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक मालिका, नाटकं आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्याने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्याला ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून ओळख मिळाली. त्याने ‘झेंडा’, ‘रेगे’, ‘मोरया’, ‘रॉकी’, ‘रणांगण’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.