Saturday, April 20, 2024

पुण्यातून इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारा वैभव तत्ववादी ‘असा’ बनला प्रसिद्ध अभिनेता; रंजक आहे त्याचा प्रवास

आपल्या मुलांनी चित्रपटसृष्टीत येऊन काम करण्याला अनेक पालकांचा सहसा नकार असतो. सामान्य कुटुंबात मुलांनी जेमतेम शिक्षण घ्यावं आणि एखादी चांगली नोकरी करून लग्न करावं हिचं काय ती पालकांची इच्छा असते. चित्रपटसृष्टीत काम करण्याची जरी मुलांनी इच्छा व्यक्त केली, तरी चित्रपटसृष्टी आपल्यासाठी नसते हे ते त्यांना पटवून देतात. पण म्हणतात ना, काही व्यक्ती स्वप्न केवळ बघत नाहीत, तर ते दर दिवशी ते स्वप्न जगत असतात. ते त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या जगाशी लढतात. असाच सामान्य कुटुंबातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन अभिनय क्षेत्रात एक अभिनेता आला. समाजाशी, शिक्षणाशी लढा देत हळूहळू त्याने त्याच्या स्वप्नाचा प्रवास सुरू केला. आज त्याची ख्याती बॉलिवूडपर्यंत जाऊन पोहोचली आहे. तो अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी होय. शनिवारी (२५ सप्टेंबर) वैभव त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मंडळी जाणून घेऊया त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास…

वैभव तत्ववादीचा जन्म २५ सप्टेंबर, १९८८ साली महाराष्ट्रामधील अमरावती येथे झाला. त्याच्या आईचे नाव शिला तत्ववादी आणि वडिलांचे नाव विवेक तत्ववादी आहे. त्याचे वडील व्यावसायाने शिक्षक असून, ते अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यामुळे घरात आधीपासूनच खूप शिस्तप्रिय आणि अभ्यासू वातावरण होते. वैभवच्या लहान भावाचे नाव गौरव तत्ववादी आहे. त्याने त्याचे शिक्षण एमबीएमधून पूर्ण केले आहे. वैभवने त्याचे शालेय शिक्षण नागपूरमध्ये पूर्ण केले. बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या मुलाने देखील आपल्यासारखे इंजीनिअर व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्या इच्छेचा मान राखून तो त्याचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये आला. (Marathi actor vaibhav Tatwawadi celebrate his birthday, let’s know about his life)

वैभवने पुण्यामधील प्रसिद्ध कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) मध्ये प्रवेश घेतला. शाळेत असल्यापासूनच त्याला अभिनयाची खूप आवड होती. तो शाळेत असताना देखील अनेक नाटकात सहभाग घेत असायचा. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना त्याच्या हे लक्षात आले की, आपण अभिनय खूप मनापासून आणि आवडीने करू शकतो. त्यावेळी ही गोष्ट त्याने त्याच्या वडिलांना सांगितली. त्याचे वडील सुशिक्षित आणि समंजस होते. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा सारासार विचार केला. त्यांनी त्याच्या या निर्णयाला नकार दर्शवला नाही. परंतु वैभवने आधी त्याचे शिक्षण पूर्ण करावे आणि मग अभिनय क्षेत्रात प्रवेश करावा असे त्यांना वाटत होते. त्याने देखील त्याचे शिक्षण पूर्ण केले आणि मग अभिनय क्षेत्राकडे वळला.

याबाबत बोलताना वैभवने सांगितले होते की, त्याचे नातेवाईक अनेकवेळा त्याच्या वडिलांना म्हणायचे की, वैभवचे शिक्षण एका चांगल्या कॉलेजमधून झाले आहे. त्याला कोणत्याही ठिकाणी खूप चांगली नोकरी मिळू शकते. त्याच्या बरोबरीचे मुले आज लाखात कमावतात. परदेशात जाऊन नोकरी करतात. वैभवने हे नको ते खुळ डोक्यात घेतले आहे. परंतु यावर त्याचे वडील कधीच त्याला काय म्हणत नव्हते. वैभव म्हणाला की, “माझ्या शिक्षणासाठी एवढा खर्च करून देखील माझ्या वडिलांनी माझ्या अभिनयातील करिअर निवडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज फक्त त्यांच्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो.”

वैभवने २०११ साली ‘फक्त लढ म्हणा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्याचे काम जास्त नव्हते. त्याने २०१४ संतोष मांजरेकर यांच्या ‘सुराज्य’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून नावारूपाला आला. यानंतर त्याने ‘कुरुक्षेत्र’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘शॉर्टकट’, ‘मिस्टर एँड मिसेस सदाचारी’, ‘चिटर’, ‘कान्हा’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘व्हॉट्सऍप लग्न’, ‘रेडीमिक्स’ या मराठी चित्रपटा कातम केले. यासोबत त्याने अनेक हिंदी चित्रपटात देखील महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत.

वैभवने २०१५ साली ‘हंटर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने ‘बाजीराव मस्तानी’, ‘लिपस्टिक अंडर बुरखा’, ‘त्रिभंगा’, ‘अनटायटल’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने छोट्या पडद्यावर देखील काम केले आहे. त्याने ‘डिसकव्हर महाराष्ट्र’, ‘लक्ष्य’, ‘अमरप्रेम’, ‘पिंजरा’, ‘तुझं माझं जमेना’, ‘प्रेम हे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सोबयात ‘फॉरबिडन लव्ह’ या वेबसीरिजमध्ये देखील काम केले आहे. वैभव सध्या एक लोकप्रिय अभिनेता म्हणून सर्वत्र ओळखला जातो.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिरोज खान यांनी थाटला विवाहीत स्त्रीसोबत संसार; तर लग्न होऊनही मुलीच्या वयाच्या तरुणीला करत होते डेट

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा