Thursday, April 18, 2024

फक्त हिंदीतच नाही, तर मराठीतील स्टार किड्सही गाजवतायेच अभिनय क्षेत्र

बॉलिवूडमधल्या स्टार किड्सची चर्चा आपण नेहमीच ऐकतो. अनेक दिग्गज ऍक्टर्सची मुलं आज बॉलिवूडमध्ये दिसत आहेत. त्यांच्या चित्रपटांची चर्चाही जोरदार होत असते. पण तुम्हाला माहित आहे का मराठी सिनेसृष्टीतही असे अनेक ऍक्टर्स आहेत, जे देखील स्टार किड्स आहेत. त्यांचे आई किंवा वडील देखील कलाकार आहेत. कोण आहेत ते मराठीतील स्टार किड्स चला पाहुयात

सध्या विराजस कुलकर्णीचं (virajas kulkarni) नाव तुम्ही ऐकलं असेलच. तो एक अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. माझा होशील ना या मालिकेतून तो घराघरात पोहचला. त्याने केलेल्या आदित्यच्या भूमिकेला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. पण तो देखील एक स्टार किडच आहे. त्याची आई मृणाल कुलकर्णी (mrunal kulkarni) आहे. मृणाल कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत अनेक सिनेमांत आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांची सोनपरीमधील भूमिका बरीच गाजली. याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी केलेल्या जिजाबाईंच्या भूमिकेनेही चांगलेच कौतुक मिळवले.

या यादीतील दुसरे नाव म्हणजे आशुतोष गोखले. रंग माझा वेगळा या मालिकेतील कार्तिकच्या भूमिकेने आशुतोषला खूप ओळख मिळवून दिली. त्याआधीही त्याने काही चित्रपटांत आणि नाटकांत काम केलं. आत्ताही तो दादा एक गुडन्यूज आहे या नाटकांत काम करतोय. पण अनेकांना हे माहित नाही की तो प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक विजय गोखले यांचा मुलगा आहे. विजय गोखले हे हिंदी आणि मराठी मधील उत्तम अभिनेते म्हणून ओळखले जातात.

अभिनेते-दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीत मोठं नाव असलेले महेश कोठारे (mahesh kothare) यांचा मुलगा आदिनाथ कोठारे (adinath kothare) हा देखील सिनेसृष्टीतील एक जानामाना चेहरा आहे. त्याला खरंतर पहिली ओळख बालकलाकार म्हणून मिळाली होती. त्याने माझा छकुला या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. तो आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्येही दिसला आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) अर्थात आपल्या सर्वांचाच लाडक्या लक्ष्याला कोण विसरणार. एक सो एक शानदार चित्रपट देणाऱ्या लक्ष्याने सर्वांना अनेकदा खळखळून हसायला भाग पाडलं. त्याच लक्ष्याचा आणि त्याची पत्नी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे (abhinay berde) हा देखील अभिनेता असून त्याने ती सध्या काय करते चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अशी ही आशिकी या चित्रपटातही काम केले.

हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार म्हणून ज्यांच नाव घेतलं जातं ते म्हणजे सचिन पिळगावकर. ५० वर्षांहून अधिक काळ अभिनयाचा अनुभव सचिन पिळगावकर (sachin pilgavkar) यांना आहे. त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकरही (supriya pilgavkar) प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या दोघांना श्रिया नावाची एक मुलगी असून तिही अभिनय क्षेत्रात आहे. श्रियाने अनेक चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये काम केले आहे.

अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांचा मराठी-हिंदी सिनेजगतात चांगलाच दरारा आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. आता त्यांची मुलंही याच क्षेत्रात उतरली आहेत. त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर आई या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे. तसेच त्याने वाह लाईफ हो तो ऐसी, फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर (sai manjrekar0 देखील अभिनेत्री आहे. तिनेही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

काहीवर्षांपूर्वी आलेल्या दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने सर्वांचीच मनं जिंकली होती. पण याच मालिकेतील दोन अभिनेत्री या स्टार किड्स आहे. मिनलची भूमिका करणारी स्वानंदी टीकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. तर रेश्मा ही भूमिका निभावणारी सखी गोखले ही मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची मुलगी आहे.

प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी गिरीजा ओक ही देखील अभिनेत्री आहे. गिरीश ओक यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तर गिरिजानेही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय.

कधी व्हिलनच्या भूमिकेत, तर कधी आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकर तावडेही अभिनेता आहे. त्याने फ्रेशर्स मालिकेत काम केलं होतं. तसेच कागर, दिल दोस्ती दुनियादारी आशा चित्रपटांमध्येही तो दिसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“ती चित्रपटात येते नाचते, मार खाऊन…” कंगना रणौतबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ‘या’ अभिनेत्याचे उत्तर आले चर्चेत

उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून ओळख मिळवणारी श्रिया पिळगावकर आहे ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री

हे देखील वाचा