Friday, April 19, 2024

पद्मभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान काळाच्या पडद्याआड! दिग्गजांकडून शोक व्यक्त; वाचा त्यांचा संगीतमय जीवनप्रवास

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एक दुःखद बातमी आली आहे. संगीत क्षेत्रातील दिग्ग्ज नाव गुलाम मुस्तफा यांचे १७ जानेवारीला दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. जगभरात प्रसिद्ध असणारे शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथे निधन झाले. मागच्या अनेक वर्षांपासून ते ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने ग्रस्त होते.

गुलाम मुस्तफा यांच्या सुनेने त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावरून सर्वाना दिली. त्यांनी लिहिले की, “जड अंत:करणानं हे सांगावे लागत आहे की, काही मिनिटांपूर्वीच माझे सासरे, आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ आणि देशातील ज्येष्ठ, पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी अखेरचा श्वास घेतला”.

मुस्तफा खान यांचा जन्म ३ मार्च, १९३२ साली उत्तर प्रदेशाती बदायूं येथे झाला होता. रामपूर-सहसवान घराण्याशी त्यांचे नाव जोडले गेले होते. त्यांनी मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’ चित्रपटमधून गायकीच्या करिअरची सुरुवात केली होती. गुलाम मुस्तफा खान यांनी ‘उमराव जान’, ‘आगमन’, ‘बस्ती’, ‘श्रीमान आशिक’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या गायकीचा नजराणा प्रेक्षकांसाठी सादर केला. त्यांना संगीत क्षेत्रातील ‘ज्युनिअर तानसेन’ म्हणून ओळखले जायचे.

उस्ताद गुलाम मुस्तफा यांनी आजच्या अनेक प्रसिद्ध गायकांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. त्यांच्या शिष्यांच्या यादीत सोनू निगमसोबतच हरिहरन, शान, आशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे, ए आर रहमान आणि लता मंगेशकर यांच्या नावांचा समावेश होतो.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना १९९१ मध्ये पद्मश्री, २००६ मध्ये पद्मभूषण आणि २०१८ मध्ये पद्मविभूषणसारख्या भारत सरकारच्या सर्वोच्च अशा आणि मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लता मंगेशकर, ए आर. रहमान, अमजद अली खान, आदी दिग्गजांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उस्ताद गुलाम मुस्तफा यांना तिरंग्यामध्ये गुंडाळत सन्मानाने त्यांची अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

गायक सोनू निगमने त्यांच्या अर्थीला खांदा देखील दिला. आपल्या गुरूंना निरोप देताना सोनू खुप भावुक झाला होता. पोलिसांनी त्यांना सलामी देत श्रद्धांजली अर्पण केली. मुस्तफा यांना सांताक्रूझच्या कब्रिस्तानमध्ये राजकीय सन्मानसह दफन करण्यात आले.

हे देखील वाचा