×

आचार्य चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, दाक्षिणात्य सुपरस्टार असणाऱ्या बाप लेकाची जोडी करणार बॉक्स ऑफिसवर धमाका

अभिनेता चिरंजीवी( Chiranjeevi)  हा दाक्षिणात्य चित्रपट जगतातील सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने चिरंजीवीने अनेक दशके दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले होते. त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवत मुलगा राम चरणनेही ( Ram Charan) आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या दोन्हीही दिग्गज कलाकारांचा ‘आचार्य’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्याचा ट्रेलर नुकताच समोर आला असून ट्रेलरमधील धमाकेदार कथा आणि अभिनय यावरुन हा चित्रपट चांगलाच सुपरहीट ठरणार असल्याचे दिसत आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की सुपरस्टार राम चरण आणि चिरंजीवी या पिता पुत्राची जोडी असलेला आचार्य चित्रपट लवकरच सिनेमागृहात धडकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आला आहे. चित्रपटात राम चरण आणि चिरंजीवी यांच्यासोबतच अभिनेत्री काजल अग्रवाल, पूजा हेगडे, सोनु सूद अशा दिग्गज अभिनेत्यांचा भरणा असणार आहे त्यामुळेच या चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.

या बहुचर्चित चित्रपटात चिरंजीवी आणि राम चरण  नक्षलवाद्यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट पदघट्टम भागावर आधारित आहे. जो अत्यंत शांत प्रदेश म्हणून ओळखला जायचा मात्र या प्रदेशात नक्षलवाद्यांच्या प्रवेशानंतर इथे जोरदार संघर्षाला सुरूवात होते. अशी या चित्रपटाची कथा आहे. आचार्य चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धमाकेदार एक्शनसह रोमँटिक मसाला सुद्धा पाहायला मिळत आहे.

खुद्द अभिनेता चिरंजीवीने या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. ‘माझा मुलगा आणि तुमचा सुपरस्टार राम चरणसोबत तयार झालेला ही चित्रपट माझ्यासाठी खूपच खास आहे’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. या पोस्टमध्ये चिरंजीवीने सहकलाकारांनाही टॅग केले आहे. दरम्यान कोराताला शिव यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडला होता. त्यामुळे प्रेक्षक बराच काळ या चित्रपटाची वाट पाहत होते. आता त्यांची प्रतिक्षा संपली असून चित्रपट २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता एकाचवेळी दोन सुपरस्टार बापलेकाची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post