Thursday, April 25, 2024

वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली अभिनेत्री साई पल्लवी, काश्मिरी पंडितांबद्दल केले हे धक्कादायक विधान

साउथ अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या तिचा आगामी चित्रपट विराट पर्वमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या ती या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. याच प्रमोशनवेळी अभिनेत्रीने एका मुलाखतीत काश्मिरी पंडित आणि मॉब लिंचिंगबाबत वक्तव्य केले होते, त्यावरून वाद आणखी वाढला आहे. साईने काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची तुलना गाय तस्करीच्या आरोपींच्या लिंचिंगशी केली आणि हिंसाचार चुकीचा असल्याचे सांगितले होते. यामुळेच तिला सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

साई पल्लवी ही दाक्षिणात्य सिने जगतातील एक लोकप्रिय म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने स्वतःची एक वेगळ ओळख निर्माण केली आहे. सध्या ती तिच्या आगामी विराट पर्वम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.यावेळी तिने केलेल्या एका वक्तव्याने नव्या वादाला सुरूवात झाली आहे. ग्रेट आंध्र न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत साईने “काश्मीर फाईल्सने 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांचे हत्याकांड दाखवले आहे. जर तुम्ही याकडे धर्माचा लढा म्हणून पाहत असाल तर गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारहाण करून जय श्री रामचा नारा लावण्यास भाग पाडल्याच्या घटनेचे काय? माझ्या मते दोघांमध्ये काही फरक नाही,”अशी प्रतिक्रिया दिली होती.

याबद्दल पुढे बोलताना तिने “मी तटस्थ कुटुंबातील आहे. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच चांगला माणूस व्हायला शिकवले आहे. संकटात सापडलेल्यांना मदत करायला त्यांनी मला शिकवले आहे. ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे पीडितांच्या पाठीशी उभा राहण्याचा माझा प्रयत्न आहे. माझा विश्वास आहे की भांडण फक्त दोन सारख्या लोकांमध्ये होऊ शकते भिन्न लोकांमध्ये नाही,”सईच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक सईला पाठिंबा देत आहेत. साईने हिंसाचार करणारे आणि ज्यांना त्रास दिला जातो त्यांच्यातील फरक केला आहे आणि अहिंसेला पाठिंबा देण्याचे बोलले आहे. तर काही लोक त्यांच्या वक्तव्यावर टीका करत आहेत. साईंचे विधान काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेचे चुकीचे चित्रण करत असल्याचेही अनेकांनी म्हणले आहे.

हे देखील वाचा