Saturday, April 20, 2024

राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने स्पृहाने ऐकवली कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ कविता

आपल्या दमदार अभिनयासोबतच अस्मानी सौंदर्याने आणि उत्कृष्ट वक्तृत्वाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या स्पृहा जोशीने नेहमीच तिच्यातली कवियत्री वेगवेगळ्या कारणातून जगासमोर आणली आहे. उत्तम अभिनयासोबतच शब्दांशी खेळणारी स्पृहा किती ताकदीची कवियत्री आहे हे तर सर्वश्रुतच आहे. स्पृहाने नेहमीच तिच्यातल्या अभिनेत्रीला आणि कवियत्रीला सामान स्थान दिले. आता तर तिच्या कविता चित्रपटांमध्ये गाण्याच्या रूपाने देखील पाहायला, ऐकायला मिळतात.

स्पृहा तिच्या यूट्यूब चॅनेलवर सक्रिय असल्याचे सर्वानाच ठाऊक असेल. या चॅनेलच्या माध्यमातून स्पृहा नेहमीच तिच्या चाहत्यांच्या फर्माईशी पूर्ण करताना दिसते. नुकताच स्पृहाने राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने एक सुंदर कविता वाचून दाखवली आहे. मानवाने सागरावरतीच काय तर संपूर्ण निसर्गावरतीच आपल्या बुद्धीने आपल्या पराक्रमाने मात करत आपले स्थान या पृथ्वीवर निर्माण केलेल्या मानवाप्रती ही कविता कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी लिहिली आहे.

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”

– कुसुमाग्रज.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा