प्रत्येक गावाची कुठची ना कुठची गोष्ट असतेच. मराठवाड्यातील सालई मोकासा या एका अविकसित मागासलेल्या गावातील इरसाल माणसांची इरसाल गोष्ट म्हणजे, ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात.’ या धमाल चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. येत्या ४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गणपत रावजी म्हैसने, प्रशांत प्रकाश चंद्रिकापुरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या आवडीतून ही सारी मंडळी एकत्र आली आहेत. झिरा फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत बनवण्यात आलेल्या ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक मनोरंजक धमाल कथा पहायला मिळणार आहे.
सालई मोकासा या गावातील गोप्याची ही गोष्ट आहे. मुलखाचा आळशी आणि वेंधळा असणारा गोप्या आपल्या कुटुंबासहित राहत असतो. चुकीच्या आणि अर्ध्या माहितीतून गोप्या सगळ्यांनाच अडचणीत आणतो. त्याच्या एका चुकीने संपूर्ण गावचं गोत्यात येते? ‘प्रत्येकाला १५ लाख मिळणार’ या घोषणेने गावात एकच गोंधळ उडतो. त्यानंतर काय घडतं? हे चित्रपटात बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
प्रकाश भागवत, प्रिया गमरे, डॉ. विलास उजवणे, संजीवनी जाधव, रंगराव घागरे, चांदणी पाटील, विराग जाखड, त्रिग्य चंद्रिकापुरे आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा प्रशांत चंद्रिकापुरे यांची असून पटकथा व संवाद प्रकाश भागवत यांचे आहेत. संकल्पना अनिल खोब्रागडे यांची आहे. संकलन सुबोध नारकर तर छायाचित्रण निखिल कांबळे यांचे आहे. संगीत दिग्दर्शन समीर सोनू तर कलादिग्दर्शन विराग जाखाड यांनी केले आहे.
सतीश कोयंडे आणि प्रकाश भागवत यांनी लिहिलेल्या गीतांना अमित मिश्रा, राहुल सक्सेना, वैशाली माडे, संतोष जोंदळे, यश उन्हवने, तन्मयी घाडगे, माधुरी भालेराव या गायकांचा स्वर लाभला आहे. चित्रपटातील गाण्यांचे हक्क ‘अल्ट्रा मिडिया अँड एन्टरटेंन्मेंट’ कड़े आहेत. नृत्यदिग्दर्शन अश्विनी चंद्रिकापुरे यांचे आहे. रंगभूषा हेमंत पालकर तर वेशभूषा राणी वानखेड़े यांची आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी रंगराव घागरे तर निर्मीती व्यवस्थापनाची जबाबदारी यश उन्हवने यांनी सांभाळली आहे. एम.जी.एम फिल्म या चित्रपटाचे वितरक आहेत.
- हेही वाचा :
- ‘बिग बॉस १५’ फिनालेमध्ये सिद्धार्थ शुक्लाची दिसणार झलक, शहनाझ गिल देणार श्रद्धांजली, व्हिडिओ पाहताच चाहत्यांचे पाणावले डोळे
- प्रजासत्ताक दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांच्या गर्दीसह त्यांचा तिरंग्याच्या रंगात रंगलेल्या दाढीचा फोटो केला शेअर
- सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे बोल्ड फोटो समोर, चाहते म्हणतायेत, ‘इथे आग लागली ना राव’