एका तीन तासांच्या सिनेमाच्या बजेटमध्ये तयार झालं होतं साडेसहा मिनीटांचं एक गाणं, रिलीझ झाल्यावर मोडले होते सर्व विक्रम


मुग़ल-ए-आज़म हिंदी सिनेमांमधील सुवर्णाची झळाळी असलेला सिनेमा. ज्या सिनेमाने चित्रपटाची परिभाषचं बदलून टाकली आणि नवी उडी मारू पाहणाऱ्या सिनेसृष्टीला थेट झेप घेण्याची प्रेरणा दिली. ५ ऑगस्ट १९६० साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज ५ दशकं होऊनही हा सिनेमा आजच्या तंत्रज्ञानालाही जोरदार टक्कर देऊ शकतो. दिग्दर्शक के आसिफ़ यांच्या नजरेतून तयार झालेल्या या सिनेमाने सर्वानाच अचंबित केले होते. भव्य दिव्य सेट, अतिशय सुमधुर गाणी, दमदार कलाकार, प्रभावी अभिनय आदी अनेक सर्वोत्कृष्ट गोष्टींची उत्तम सरमिसळ असलेल्या या सिनेमाने त्याकाळी इतिहास रचला होता.

या ऐतिहासिक सिनेमाला पन्नास वर्षांपूर्वी तयार व्हायला दीड कोटी रुपये इतका खर्च आला होता. हा खर्च त्याकाळी डोंगराएवढा मोठा होता. या सिनेमातील ‘जब प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे आज ही सर्वांच्या तोंडात गुणगुणले जातेच. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याला आजही कोणीच विसरू शकत नाही. मधुबाला यांचे बोलके डोळे, चेहऱ्यावरील प्रभावी भाव आजही गाणे ऐकताना डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. या गाण्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गाण्याचा भव्य आणि डोळे दिपवणारा सेट.

‘जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याला चित्रित करण्यासाठी १० लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते. ज्याकाळी १० लाख रुपयांमध्ये संपूर्ण सिनेमा तयार होत होता, त्याच रकमेमध्ये या सिनेमातील फक्त एक गाणे चित्रित केले गेले होते. पाण्यासारखा पैसा या सिनेमासाठी खर्च केला गेला. हा खर्च सिनेमा बघतांना नक्कीच सर्वांना जाणवतो.

अनेक आरशाचे तुकडे जोडून जोडून या गाण्याचा सेट तयार झाला होता. हा सेट तयार व्हायला अनेक दिवस लागले. संगीतकार नौशाद यांनी १०५ गाणी ऐकल्यानंतर त्यांनी ‘जब प्यार किया तो डरना क्या’ गाणे निवडले होते. या गाण्याला खरा इफेक्ट येण्यासाठी नौशाद यांनी लताजी यांच्याकडून गाण्याचे रेकॉर्डिंग बाथरूममध्ये करून घेतले होते.

एवढी प्रचंड मेहनत अखेर फळाला आली आणि १.५ कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने ११ कोटींचा बिजनेस केला. आजही मुग़ल-ए-आज़म हा सिनेमा कथा, कलाकार, अभिनय, गाणी यांसोबतच त्यातील भव्यतेसाठी ओळखला जातो.


Leave A Reply

Your email address will not be published.