बालमित्रांसाठी गुड न्यूज! तब्बल एक वर्षांनी सिनेमागृहात पाहा बालचित्रपट, ‘टॉम अँड जेरी’ भारतात रिलीझ


मागच्यावर्षी कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने संपूर्ण देशालाच थांबवले होते. मनुष्याच्या जगण्यावर आणि सार्वजनिक आयुष्यवर अनेक मर्यादा आल्या होत्या. अर्थात त्या आपल्या सर्वांच्याच भल्यासाठीच होत्या म्हणा. पण यामुळे सामान्य मनुष्यासोबतच कलाकार आणि मनोरंजनसृष्टीला याचा मोठा फटका बसला. चित्रपटगृह बंद झाल्यामुळे अनेक लहान मोठ्या सिनेमांचे प्रदर्शन आणि चित्रीकरण पुढे ढकलल्या गेले.

मात्र आता तब्बल एक वर्षाने भारतीय चित्रपटगृहात बालचित्रपट प्रदर्शित झाला आहे. १९ फेब्रुवारीला देशात हॉलीवूडचा लाइव्ह ॲक्शन ॲनिमेशन चित्रपट ‘टॉम अँड जेरी’ प्रदर्शित झाला. हॉलीवूड प्रॉडक्शन हाऊस वॉर्नर ब्रदर्सच्या या चित्रपटाच्या माध्यमातून मुलांमध्ये लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर बिल्ला टॉम आणि उंदीर जेरी मोठ्या पडद्यावर आले आहेत. अनेक वर्षांपूर्वी आलेल्या टॉम अँड जेरी या कार्टूनने लोकप्रियतेचे रेकॉर्ड मोडले. अशी एकही व्यक्ती नसेल ज्यांनी हे कार्टून पाहिले नाही.

हा सिनेमा इंग्रजीसह चार भारतीय भाषांमध्ये ६०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर आल्यापासून मुंबईसह देशात या सिनेमासाठी ऍडव्हान्स बुकिंग चालू झाले होते. पहिल्याच दिवशी या सिनेमाने मोठ्या शहरांमध्ये धमाकेदार ओपनिंग केली आहे. सिनेपोलिस मल्टिप्लेक्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल साहनी यांनी सांगितले, ” चित्रपटाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली आहे. या आधी वॉर्नर ब्रदर्सने भारतात लाइव्ह ऍक्शन ऍनिमेशन चित्रपट ‘पोकेमॉन : डिटेक्टिव्ह पिकाचू’ प्रदर्शित केला होता. या चित्रपटाने देखील भारतात चांगला व्यवसाय केला होता.”

६ मार्च २०२० ला डिस्नेचा ऍनिमेशन चित्रपट ‘ऑनवर्ड’ आला होता. लॉकडाऊनआधी प्रदर्शित या चित्रपटाने एका आठवड्यात २.२५ कोटींचा व्यवसाय केला होता. ‘टॉम अँड जेरी’ची कामगिरी चांगली राहील असे चित्रपट समीक्षकांना वाटते. अॅनिमेशन सगळ्यांनाच आवडतो असे गिरीश वानखेडे यांचे मत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.