Wednesday, December 6, 2023

घुंगरांच्या बोलांनी सर्वांना ताल धरायला लावणारे अतुल कुलकर्णी, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी

आपल्या अष्टपैलू आणि बहुआयामी अभिनयाने सिनेसृष्टी गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये अतुल कुलकर्णी हे नाव आग्रहाने घेतले जाते. मराठी कलाकारांचा इतिहास, त्यांची जुनी परंपरा आणि लोककला म्हणजे तमाशा, ज्याने आजवर कित्येक कलावंत घडवले. सध्या हेच कलावंत लोप पावत चालले आहेत. याच कलावंतांच्या आयुष्यावर गुना कागलकर या पात्राला पुन्हा एकदा जिवंत केलं ते अतुल कुलकर्णी यांनी. त्यांचा ‘नटरंग’मधील अंगावर शहारे आणणारा अभिनय रसिक प्रेक्षकांच्या मनात चांगलाच रुतला. ‘नटरंग’मधून घुंगरांच्या बोलांनी सर्वांना ताल धरायला लावणारे अतुल रविवारी (10 सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करतात. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ त्यांचा जीवन प्रवास.

अतुल कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव येथे 10 सप्टेंबर 1963रोजी झाला. त्यांनी सोलापूरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण आभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी.महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची फार आवड होती. इयत्ता 10 वी मध्ये त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला होता. त्यांनतर त्यांनी शाळेमध्ये आणि महाविद्यालयात अनेकदा अभिनय केला. त्यांनी आपल्यातील अभिनयाची आवड लक्षात घेत साल 1992 मध्ये ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. (Atul Kulkarni birthday know interesting things related to actor life)

त्यानंतर त्यांनी 1997साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘भूमी गीता’. साल 2001मध्ये प्रदर्शित झालेला ‘चांदणी बार’ या चित्रपटामध्ये देखील त्यांनी दमदार अभिनय केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले. पत्रकारांच्या आयुष्यावर मार्मिक मत व्यक्त करणाऱ्या ‘पेज 3’ या चित्रपटामध्ये देखील त्यांनी दमदार भूमिका साकारली. ‘वळू’ या चित्रपटासारखे सामाजिक विषयांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट केले.

अभिनयासह ते एक उत्तम लेखक देखील आहेत. त्यांचे विचार हे चार चौकटीच्या बाहेरचे असतात. आमीर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’चे लेखन देखील त्यांनीच केले आहे. अनेक व्याखायनांमध्ये त्यांनी आपले परखड विचार मांडलेले आहेत. एका व्याख्यानात त्यांनी मुलं जन्माला घातलीच पाहिजे का? असा विषय घेतला होता. त्यावेळी ते म्हणाले “मूल जन्माला आले की वस्तूंचा वापर सुरु होतो. पर्यावरणात बदल होत असताना त्याचे संवर्धन करण्यासाठी आता नियम बदलले पाहिजेत. देशाची वाढलेली लोकसंख्या आपण रोखू शकत नाही. मात्र लग्न केल्यानंतर मुल झालंच पाहिजे, हा आग्रह सोडायला हवा. जिवंत असलेल्या पिढीने येणाऱ्या पिढीला खाईत लोटलं आहे. मागे वळून पाहताना आपले काय चुकले हे लक्षात आल्यानंतरही आपण वेगळा विचार करणार आहोत का? यशाच्या व्याख्या आपण जशाच्या तशा येणाऱ्या पिढीवर लादणार आहोत?” असे प्रखर मत त्यांनी मांडले होते. तसेच तरुणांनी राजकारणात यावे असेही ते आग्रहाने सांगतात.

‘क्वेस्ट एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट’ या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत शिक्षकांना उद्भवणारे प्रश्न त्यांच्या अडचणी यांवर काम केले जाते. तसेच 14 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतही केली जाते. त्यांच्या पत्नी गीतांजली कुलकर्णी या देखील एक अभिनेत्री आहेत. अतुल कुलकर्णी यांनी मराठी, हिंदी, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये देखील अनेक चित्रपट केले आहेत. ‘भेट’, ‘वास्तु स्पर्श’, ‘चकवा’, ‘माती माय’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘हॅपी जर्नी’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी मराठमोळ्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ते ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ या पुरस्काराचे मानकरी देखील आहेत.

अधिक वाचा-
अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली खास भेट; ‘वेलकम टू द जंगल’चा टीझर प्रदर्शित…
विषयचं हार्ड! हिरव्या गाऊनमधील अवनीतचा घायाळ करणारा लूक

हे देखील वाचा