बॉलिवूड हे वरवर जरी ग्लॅमर आणि ऐषआराम, पैसा, प्रसिद्धी असणारे जग असले, तरीही त्यात आभासी बेभरवशीपणासुद्धा आहे. या क्षेत्रात टिकणे आणि मिळणारे अपयश पचवणे खूप अवघड असले, तरीही असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी या सर्व गोष्टींना धीराने तोंड दिले आणि या क्षेत्रात यश मिळवले आहे. कोणाच्याही पाठिंब्याशिवायत केवळ मेहनत आणि चिकाटी याच दोन गोष्टींवर या सिनेसृष्टीत यश मिळवणाऱ्या अनेक कलाकारांपैकी एका म्हणजे अभिनेत्री दिशा पटानी. दिशाने कोणत्याही गॉडफादरशिवाय या क्षेत्रात घवघवीत यश मिळवले आहे. ‘नॅशनल क्रश’ असलेली दिशा पटानी रविवारी (१३ जून) तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया दिशाचा सिनेप्रवास.
दिशाचा जन्म १३ जून, १९९२ रोजी उत्तरप्रदेशच्या बरेलीमध्ये येथे एका सामान्य कुटुंबात झाला. दिशाचे मूळ गाव उत्तराखंडमधील पिथोरागढ़ हे आहे. दिशाचे वडील हे जगदीश सिंग पटानी डीएसपी ऑफिसर असल्याने त्यांच्या बदल्या व्हायच्या. त्यामुळे उत्तराखंडनंतर दिशाचे कुटुंब बरेलीमध्ये आले. दिशाची आई हेल्थ इन्स्पेक्टर असून तिला एका मोठी बहीण आणि एक लहान भाऊ आहे. दिशाने नोएडामधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी संपादन केली.
दिशाला सुरुवातीपासूनच या क्षेत्राचे खूप आकर्षण होते. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. २०१३ साली दिशाने ‘फेमिना मिस इंडिया’मध्ये सहभाग घेतला. दिशा या स्पर्धेची उपविजेती ठरली. त्यानंतर दिशाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. दिशाची डेअरी मिल्कची जाहिरात खूप गाजली.
जाहिराती करत असतानाच दिशाने तिचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला. दिशाने २०१५ साली आलेल्या ‘लोफर’ या तेलुगु सिनेमातून तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. मात्र, तिचे मुख्य लक्ष होते बॉलिवूड. हिंदी सिनेमात काम करण्याच्या प्रयत्नांत असताना दिशाला ‘एम.एस.धोनी’ हा सिनेमा मिळाला. २०१६ साली आलेल्या या चित्रपटात तिने ‘प्रियांका’ ही धोनीच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. छोटी मात्र तरीही लक्षवेधी ठरलेल्या या भूमिकेने दिशाला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. सोबतच तिला या सिनेमासाठी पुरस्कार देखील मिळाले. या सिनेमानंतर दिशांच्या गाडीला मोठा वेग मिळाला.
सन २०१७ मध्ये दिशा ‘कुंग फु योगा’ या चायनीज कॉमेडी सिनेमात जॅकी चॅन या सुपरस्टारसोबत झळकली. या सिनेमाने तिच्या लोकप्रियतेत अधिक भर तर घातलीच शिवाय तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखही मिळवून दिली. चायनीज इंडस्ट्रीमध्ये या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले. यानंतर दिशा ‘बागी’, ‘भारत’, ‘मलंग’, ‘राधे’ आदी सिनेमात दिसली.
दिशा तिच्या चित्रपटांइतकीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली किंबहुना अजूनही राहते. दिशा आणि टायगर श्रॉफ यांचे अफेअर सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून दिशा आणि टायगर नात्यात आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र देखील पहिले जाते, विविध कार्यक्रमांना सुद्धा हे सोबतच हजेरी लावतात. मीडियामध्ये या दोघांबद्दल अनेक बातम्यांदेखील छापून येतात. मात्र, असे असूनही या दोघांनी अजून अधिकृतरीत्या त्यांचे नाते घोषित केले नाहीये.
दिशाचे नाव टीव्ही अभिनेता पार्थ सामथानसोबत जोडले गेले होते. ‘भारत’ चित्रपटात दिशाने एक सर्कस सादर करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी दिशाने खरोखर सर्कसचे प्रशिक्षण घेतले होते. याच प्रशिक्षणादरम्यान दिशाच्या डोक्याला मार लागल्याने सहा महिने तिची स्मरणशक्ती नव्हती. तिला अजूनही सहा महिन्यांचे काही आठवत नाही.
दिशा मुंबईमध्ये फक्त ५०० रुपये घेऊन आली होती. मात्र, आज ती कोट्यवधी रुपये कमावते. माध्यमातील वृत्तानुसार, दिशा एका सिनेमासाठी ५ कोटी रुपये घेते. दुसरीकडे ती जाहिरातींसाठी १ कोटी मानधन घेते. दिशाचा मुंबईच्या वांद्रे परिसरात ५ कोटी रुपयांचा फ्लॅट आहे. वर्षाला १२ कोटी रुपये कमावणाऱ्या दिशाकडे ७४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोबतच तिच्याकडे Mini Cooper, Mercedes Benz, Audi अशा महागड्या गाड्या देखील आहे.
दिशा येणाऱ्या काळात ‘एक विलेन २’ मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा